तो ‘मोर्चा’ आणि हा ‘एल्गार’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018   
Total Views |
 
 
 
नुसता मराठा मोर्चा निघणार म्हटल्यावरही अनेकांचे धाबे दणाणले होते. त्याविषयी शंका-कुशंका व्यक्त झालेल्या होत्या. जणू मराठ्यांनी आपल्या मनातला प्रक्षोभ व्यक्त करणेही गुन्हा असल्याचाच सूर लागला होता. कुठे त्या मोर्चाला गालबोट लागले नाही. कुठे हिंसा झाली नाही. त्याच्या तुलनेत कालपरवाचा एल्गार बघितला पाहिजे. मनातला राग वा विरोध व्यक्त करतानाही एकूण समाजाला ओलिस ठेवण्याचे कारण नसते. हिंसाचाराने भीती-दहशत माजवली जाते. उलट नुसत्या संख्याबळावर शक्तीप्रदर्शन होऊन जात असते. हिंसेची गरज नसते. जेव्हा आपल्या शक्तीवर किंवा भूमिकेवर आपलाच विश्वास नसतो, तेव्हा पाठिंबा मिळण्याची खात्री नसते आणि हिंसाचाराचा आश्रय घ्यावा लागतो.
 
 
भीमा-कोरेगावच्या निमित्ताने काही गोष्टी ठळकपणे पुढे आल्या. या निमित्ताने दलित वा आंबेडकरवादी गटांनी आपले शक्तीप्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न केला, तर त्यात काही गैर मानायची गरज नाही. कुठल्याही देशात व समाजात त्यातल्या एखाद्या घटकाला आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वाटत असेल, तर त्याने त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. तसा त्याला अधिकारच असतो. पण, असे आवाज उठवण्यासाठी जेव्हा मोठ्या लोकसंख्येने जमाव एकत्र येतो, तेव्हा त्यावर नियंत्रण राखणे त्याच्या नेतृत्वालाही अशक्य होऊन जाते. म्हणूनच जितका मोठा जनसमुदाय जमतो, तितकी त्याच्या नेतृत्वाची जबाबदारी वाढत असते.
 
 
कायदा व सुव्यवस्था राखणे ही भले सरकारची जबाबदारी असली, तरी त्यात बाधा आणणे हा कुणा जमावाचा किंवा त्याच्या नेत्याचा अधिकार असू शकत नाही. त्यामुळेच अलीकडल्या घटनांमध्ये सरकार वा पोलीस तोकडे पडले, असा दावा करणे शुद्ध लबाडी आहे. खास करून जे बंद यशस्वी झाल्याचे श्रेय घेतात, त्यांना त्यात झालेल्या हिंसाचाराचीही जबाबदारी घेता आली पाहिजे. पण इथे तसे काहीही घडलेले नाही. हिंसेची जबाबदारी घेण्याची वेळ आल्यावर शासन व पोलिसांकडे बोट दाखवणे, ही म्हणूनच लबाडी म्हणायला हवी. कुठलीही हिंसा म्हणजे शक्तीप्रदर्शन होऊ शकत नाही. त्यात भीमा-कोरेगावच्या निमित्ताने झालेला बंद तोकडा पडला, हे मान्यच करायला हवे. प्रामुख्याने त्यात पुढाकार घेतलेल्या नेतृत्वाचे ते अपयश मानावे लागेल. पण, आजकाल अपयशात नैतिक यश सिद्ध करण्याचा जमाना असल्याने असली अक्तव्ये येत असतात आणि युक्तिवादही चाललेले असतात. मोर्चा वा आंदोलनाचे म्होरकेपण करणार्‍यांची जबाबदारी किती व कशी असते, त्याचे म्हणूनच विवेचन व्हायला हवे. या पार्श्वभूमीवर मागल्या वर्षभर निघालेल्या मराठा मूकमोर्चाचे कौतुक सांगावे लागते. किंबहुना, तोच एल्गार व मोर्चा यातला फरक आहे.
 
 
नगर जिल्ह्यात कोपर्डी येथे जी घटना घडली होती, त्यामुळे एकूणच मराठा समाजात अस्वस्थता होती. पण कोणीही मराठा जातीचा, कुठल्याही संघटनेतला नेता त्यावर आवाज उठवण्यासाठी पुढाकार घेत नव्हता. अशावेळी अकस्मात एका जागी संघटित मोर्चा निघाला. पण, त्याला कुठल्याही ख्यातनामनेत्याचे नेतृत्व मिळालेले नव्हते की कुणा पुढार्‍याचे त्यात भाषण झाले नाही. किंबहुना, त्या मोर्चालाच ‘मूक मोर्चा’ असे नाव देण्यात आल्याने त्यात कुठे घोषणांची आतषबाजीही होताना दिसली नाही. मराठा जातीचे नाव घेऊन डझनावारी संघटना व संस्था उभ्या आहेत आणि त्यांनी आरक्षण मिळावे म्हणून अनेक कार्यक्रम आजवर योजलेले होते. पण, कोपर्डीनंतरची घुसमट व्यक्त करण्याची वेळ आली, तेव्हा त्यातला प्रत्येक नेता वा संघटना राजकीय सक्तीमुळे अलिप्त राहिलेले होते. त्यांना झुगारून हा मोर्चा निघाला आणि त्यात सर्व गटातटाच्या नेत्यांना पुर्णपणे बाजूला ठेवण्यात आलेले होते. लाखोच्या संख्येने निघणारे विविध भागातील हे मोर्चे बघून, अनेकांच्या पोटात गोळा उठलेला होता. मराठे संख्येने अधिक आहेत आणि त्यांनीच रस्त्यावर उतरायचे ठरवले, तर इतर लहानमोठ्या लोकसमुहांचे काय होईल, अशी भीती दबल्या आवाजात व्यक्त केली जात होती. मोर्चा वा आंदोलन म्हणजे फक्त हिंसा, अशीच त्या भीतीमागची प्रेरणा होती. पण, लवकरच स्पष्ट झाले की त्या मोर्चात केवळ मराठा नव्हे, तर इतर अनेक जाती समूहाचेही लोक मुक्तपणे सहभागी झालेले होते. पण त्यात कुठेही चुकून कुठल्या अन्य जातसमूह विरोधी वा राजकीय स्वरुपाच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत. सूडभावनेचा कुठलाही लवलेश त्यात नव्हता. म्हणून हा समाज व त्याचा मोर्चा अवघ्या महाराष्ट्राच्या सदिच्छा मिळवून गेला. नुसत्याच गांधीजींच्या नावाने जपमाळ ओढणार्‍यांना त्या मोर्चाने खराखुरा गांधी अवतरून दाखवला.
 
 
अहिंसा म्हणजे हिंसा करायची शक्ती नसताना पांघरलेले कवच नाही, तर हिंसेची कुवत असतानाही हिंसेपासून परावृत्त राहून केलेले शक्तीप्रदर्शन, असे गांधीजी म्हणत. शेळपट वा भित्र्याने अहिंसा बोलण्याने तिचे पालन होत नाही, असेच महात्म्याचे म्हणणे होते. आपल्या नुसत्या जमण्याच्या संख्येतूनच मराठा मूकमोर्चाने आपली शक्ती दाखवून दिली. इतक्या संख्येने कोणी हिंसा करायला सिद्ध झाला, तर त्याच्यासमोर बंदूका व हत्यारेही तोकडी पडतील असा त्यातला संदेश होता. परंतु, नुसता मोर्चा निघणार म्हटल्यावरही अनेकांचे धाबे दणाणले होते. त्याविषयी शंका-कुशंका व्यक्त झालेल्या होत्या. जणू मराठ्यांनी आपल्या मनातला प्रक्षोभ व्यक्त करणेही गुन्हा असल्याचाच सूर लागला होता. कुठे त्या मोर्चाला गालबोट लागले नाही. कुठे हिंसा झाली नाही. त्याच्या तुलनेत कालपरवाचा एल्गार बघितला पाहिजे. मनातला राग वा विरोध व्यक्त करतानाही एकूण समाजाला ओलिस ठेवण्याचे कारण नसते. हिंसाचाराने भीती-दहशत माजवली जाते. उलट नुसत्या संख्याबळावर शक्तीप्रदर्शन होऊन जात असते. हिंसेची गरज नसते. जेव्हा आपल्या शक्तीवर किंवा भूमिकेवर आपलाच विश्वास नसतो, तेव्हा त्याला पाठिंबा मिळण्याची खात्री नसते आणि हिंसाचाराचा आश्रय घ्यावा लागतो. एल्गार पुकारणार्‍यांचा आपल्या शक्ती व भूमिकेच्या न्याय्य असण्यावर विश्वास असता, तर त्यांनी जमणार्‍या लोकसंख्येला नियंत्रणाखाली ठेवून हिंसा होऊ दिली नसती. जनजीवनाला भयभीत केले नसते. चुका झाल्या तर त्याची जबाबदारी उचलली असती. यापैकी काहीही झाले नाही. जमावाने धुमाकूळ घालण्याला कोणी समतेचे आंदोलन व यश समजत असेल, तर तो मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतो.
 
 
एक मात्र खरे आहे की, या एल्गार पुकारणार्‍यांनी आंबेडकरवादी लोकांना पुढे करून बहुजन मराठ्यांच्या मनात नको त्या शंका संशय निर्माण करून ठेवले आहेत. मराठा मूकमोर्चाच्या ज्या मागण्या होत्या, त्यातली पहिली वा प्रमुख मागणी ऍट्रोसिटी कायदा रद्द करण्याची होती आणि कालपरवाच्या हिंसाचारानंतर पुन्हा ऍट्रोसिटी कायद्यानुसार काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ते समाजात वितुष्ट माजवणारे व आंबेडकरी समाजाला अलिप्त एकाकी पाडणारे आहेत. अर्थात, त्याला आंबेडकरवादी नेते वा गट कारणीभूत नाहीत. ज्यांनी भीमा-कोरेगाव विषयाचे अपहरण करून त्यालाच आपला राजकीय अजेंडा बनवला, ते खरे गुन्हेगार आहेत. त्यांनी उच्छाद केला व चिथावण्या देऊन ते परस्पर निसटले आहेत. उमर खालिद वा मेवानी इथे वास्तव्य करणारे नाहीत. पण, त्यांच्या नादाला लागून ज्यांनी धुमाकूळ घातला, त्यांना मात्र इथेच जगायचे आहे. त्या जगण्यात आजवर जपलेल्या सदिच्छांना हरताळ फासला गेला आहे. उपर्‍यांचा एल्गार साजरा करताना आपल्या भोवतीच्या विविध समूहांमध्ये असलेल्या सदिच्छांची होळी होऊन गेलेली आहे. मूक मोर्चाने नुसत्या संख्यात्मक व शांततापूर्ण वर्तनातून नव्या सदिच्छा निर्माण केल्या आणि ‘एल्गार’च्या नावाखाली आंबेडकरवादी मंडळींनी दीर्घकाळ जमलेल्या सदिच्छांचा विध्वंस करून टाकला आहे. त्याचा आंबेडकरी चळवळीशी काहीही संबंध नाही की त्यातून त्या चळवळीला फायदाही मिळणार नाही. पण मूकमोर्चा काढणार्‍या मराठा वा तत्समबहुजन समाजातील विविध घटकांना मौन सोडण्याची वेळ आणली गेली आहे. ज्यांनी अशी आग लावली, ते आपला कार्यभाग सिद्ध करून पळाले आहेत आणि आंबेडकरवादी मात्र भोवतालाच्या सदिच्छा दोन दिवसात गमावून बसले आहेत. डिवचले गेल्यास मूकमोर्चा किती काळ मूक राहू शकेल? मुठभरांनी ब्राह्मणी आरोपांची आतषबाजी केली, पण दुखावला गेलेला बहुजन मराठा समाज आहे. हे अर्थात एल्गार पुकारणार्‍यांना माहितीही आहे. त्यांना जातीयुद्धाची हिंसाच हवी असेल, तर बाबासाहेबांच्या अनुयायांची जबाबदारी वाढत असते. हे विसरून चालणार नाही.
 
 
 - भाऊ तोरसेकर
 
@@AUTHORINFO_V1@@