माफ करा, बापू...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
सुनील कुहीकर
 
माफ करा, बापू! शौर्याने पराक‘म गाजवीत स्वातंत्र्याची पताका उंचावर फडकाविण्याची लायकी नव्हतीच कधी आमची; पण शेकडो लोकांच्या बलिदानातून हाती आलेले स्वातंत्र्य धड टिकवून ठेवण्याच्या लायकीचेही राहिलेलो नाही आम्ही आताशा.
गांधीके सपनोका भारत
कातील हैं, हत्यारा हैं
फिरभी सारे जहाँसे अच्छा
हिंदोस्ताँ हमारा हैं...
या ओळींमधून व्यक्त होणारे वैफल्य, त्यातून ध्वनित होणारा संताप... हे चित्र बदलण्यासाठी धडपडतानाही दिसत नाही कुणी इथे. उलट, तेच वास्तव असल्याचे सिद्ध करून दाखवण्यासाठीचा निलाजरा खटाटोप चाललाय् सर्वदूर.
तेव्हा बापू, खरंच माफ करा! तुम्हीच कशाला, भगवान गौतम बुद्धापासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, छत्रपती शिवरायांपासून तर राजर्षी शाहू महाराजांपर्यंत, लोकमान्यांपासून तर सावरकरांपर्यंत- सर्वांचीच एकदा मनापासून माफी मागायची आहे आम्हाला आज. अगदी डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी पाय धुवायचेत तुमचे. तसाही हा देश बुद्ध, छत्रपती, गांधी, पटेलांचा राहिलाच कुठे आता? हा देश, विठ्ठलाभोवती कडे करून त्याला भक्तांंपासून दूर ठेवणार्‍या बडव्यांचा झालाय्. तो दंगलीत मृत पावलेल्यांच्या चितेवर आपल्या राजकीय स्वार्थाच्या भाकरी भाजणार्‍या राजकारण्यांचा झालाय्. अन् झालंच, तर ज्यांचा थेट पाच वर्षांच्या बोलीनं लिलाव होतो आणि तरीही ज्यांचा स्वाभिमान जागा होत नाही, अशा बेजबाबदार मतदारांचा झालाय्. आत्मभान हरपलेल्या, भावनेच्या प्रवाहात दिशाहीन भरकटणार्‍या, ज्यांची टाळकी कुणीही भडकावू शकतो अशा बेलगाम तरुणाईचा झालाय् बापू हा देश. खरंच सांगतो शिवबा... बाबासाहेब, तुम्हालाही तेच सांगतोय्, या समाजातल्या तमाम जनांनी केवळ तसबिरीत बंद करून ठेवलं आहे बघा तुम्हाला. तुमची कर्तबगारी, शौर्य, पुस्तकांतून केलेली धारदार विचारांची पखरण केव्हाच मातीमोल ठरवली आम्ही. तुमचा मानसन्मान केवळ पुतळ्यांत धुंडाळत फिरतात इथली माणसं. पुण्यतिथी, जयंतीच्या दिवशी तुमच्या तसबिरी अन् पुतळ्यांना हार घातले, समोर चार-दोन फुलं वाहिली की, तुमच्या विचारांची माती करायला मोकळे होतात सारे...!
 
परवा, भीमा कोरेगावच्या घटनेवरून महाराष्ट्रात बंद पुकारताना ज्या पद्धतीने लोक वागलेत. लोकांना रेल्वे-लोकलमधून बाहेर काढताना, रस्त्यांवरच्या वाहनांवर दगडफेक करताना जी शिवराळ भाषा अनेकांच्या तोंडी होती, आपल्याच बांधवांवर आरोपांच्या फैरी झाडताना जणूकाय शत्रूशीच लढायला निघाल्याच्या थाटातला जो आवेश चेहर्‍यावर उमटला होता तो, ‘सारे भारतीय माझे बांधव’ असल्याच्या भावनेला हरताळ फासणारा होता. खरंतर शाळाशाळांमधून वर्षानुवर्षे नुसतीच घोकंपट्टी चाललीय् प्रार्थनेतल्या त्या शब्दांची. प्रत्यक्षात त्यातून ध्वनित होणार्‍या सामाजिक आशयापेक्षाही इतर जाती-धर्मांविषयी मनामनांत कालवले जाणारे विष अधिक प्रभावीपणे भिनतेय् अलीकडे भारतीय जनमानसात... माफ करा, पण कालचे कुणाचेच वागणे सौजन्याचे वाटले नाही. शरद पवारांचे नाही अन् संताप व्यक्त करायला रस्त्यावर उतरलेल्या जमावाचेही नाही. सोशल मीडियावरून क्षणाक्षणाला आग ओकून मनं पेटवायला निघालेल्यांच्या उतावीळ वागण्यातून जसे सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडले नाही; तसेच मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापुरात शिवसेनेच्या एका आमदाराने काढलेल्या प्रतिमोर्चातील कथित शिवसैनिकांच्या वागण्यातूनही हे सौजन्य झळकल्याचेही कुठे दिसले नाही.
 
इतर कित्येक मार्ग समोर दिसत असताना, लक्षावधी लोकांचा गोतावळा सोबतीला घेऊन बाबासाहेब, भगवान गौतम बुद्धाने दाखविलेल्या मार्गानेच का गेले असतील, हे अजूनही उमगलेच नाही आम्हाला. भीमा कोरेगावच्या स्तंभासमोर नतमस्तक व्हायला लोक मोठ्या सं‘येने यावेत, यासाठी गेली कित्येक महिने नियोजन करणारी आणि जमा झालेल्या समूहाशी दंगलीला कारणीभूत ठरणारी वर्तणूक करणारी सुपीक डोकीही ठेचून काढण्याच्याच लायकीची आहेत. त्यांना कुठे कळले टिळक, सावरकर अन् छत्रपती शिवराय? खरंतर यांपैकी कुणालाही ना बाबासाहेब समजले ना शिवराय उमगले... आपल्याच तालात बेलगाम वागत सुटलेला, बेताल बरळत निघालेला समुदाय बुद्धाच्या अमृतवाणीचा भोक्ता कसा झाला सांगा? त्यांच्याशी अयोग्य वर्तन करणार्‍यांना तरी छत्रपतींचा वारसा कसा सांगता येईल?
 
एका घटनेतून, त्यावरच्या एका प्रतिकि‘येतून पाऽऽर बदलून गेली माणसं. माणुसकीच्या बाता केव्हाच हद्दपार झाल्या होत्या. अन्यायाचा बदला घेण्याच्या इराद्याने पेटून उठलेल्यांकडून माणुसकीची अपेक्षा बाळगणेही दुरापास्त ठरले होते. कालपर्यंत ज्याचा गंधही नव्हता, तो कडवटपणा आता प्रत्येकाच्याच वागण्या-बोलण्यातून झळकत होता. माफ करा बापू, पण तुमच्या अहिंसेवरही विश्वास राहिलेला नाही आता इथे कुणाचा. तुमच्या तर्‍हेने आत्मक्लेश वगैरे करून घेत आंदोलनं करण्याची रीत तर केव्हाच बाद ठरवलीय् लोकांनी इथे. स्वत:ला त्रास करून घेत कुठं आंदोलनं करायची असतात? छे! आता तर आंदोलन, मोर्चे म्हटलं की सर्वप्रथम लोकांना त्रास होईल याची तजवीज. तोडफोड, जाळपोळ तर सर्वांचीच पहिली पसंती! सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर झाले पाहिजे ना! रस्ते अडवून धरले गेले पाहिजेत. बेलगाम तरुणाईने असे जत्थ्याने घराबाहेर पडायचे. हिरवे, निळे, भवगे, असे कुठल्याशा रंगाचे झेंडे हातात धरले की, मग आपसूकच बळ एकवटते झुंडींच्या मनगटात. मग सार्‍या पंचक‘ोशीत थरार माजवणे सहज शक्य होऊन जाते. सर्वसामान्य जनतेच्या मनात जबर धाक, कमालीची दहशत निर्माण झाली नाही तर आंदोलन कसे म्हणायचे त्याला? तत्कालीन विपरीत परिस्थितीशी लढताना खुद्द बाबासाहेबांनी ही असली तर्‍हा कधी उपयोगात आणली नाही. महात्म्यानं केलेली तर सारीच आंदोलनं, त्यानं स्वीकारलेल्या अहिंसेच्या मार्गासाठी प्रसिद्ध पावलीत. माफ करा बाबासाहेब, आम्हाला नाही अनुसरता आला तुमचा मार्ग कधीच. तुम्ही मिळवून दिलेल्या अधिकाराचा उपयोग करताना राखणे अपेक्षित असलेले मर्यादेचे भानही विसरत चाललोय् आम्ही. “आमची आई इतकी सुंदर असती तर...” हे शिवरायांचे वाक्य कुणाच्यातरी तडफदार, आवेशपूर्ण भाषणातून नुसतं कानावर पडलं, तरी धमण्यांतले रक्त सळसळते आमच्या. पण... शिवबा, मनगटातली ताकद सिद्ध करण्याच्या नादात परवा आमची लेकरं बाया-बापुड्यांना हात लावून गेली... महाराज, खरंच लाज वाटली तो घृणास्पद प्रकार बघून.
 
दोनशे वर्षांपूर्वीच्या ज्या युद्धावरून सारा प्रकार घडला, त्याचे साक्षीदार आज हयात नाहीत. ज्यांनी इतिहासातील नोंदी जपून ठेवल्या, त्यांनातरी कुठे माहीत होतं भविष्यात आपलीच पोरं या मुद्यावरून एकामेकांच्या जिवावर उठतील म्हणून?
एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारी, जाती-पातीच्या चौकटीबाहेर पडण्याची गरज वारंवार प्रतिपादित करणारी माणसं, त्या दिवशी नाहीच वागली तशी. एक तारखेलाही नाही अन् तीन तारखेलाही नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणायचे बाबासाहेब, पण इथे तर शिकलेली माणसंच अडाण्यासारखं वागताहेत. पुन्हा एकदा जाती-धर्माच्या वर्तुळात अडकण्याची जिद्द करताहेत. तरीही कॉलर टाईट करून स्वत:ला आधुनिक म्हणून घेताहेत...
 
माफ करा, पण हे वागणे ना बाबासाहेबांना अपेक्षित, ना ही तर्‍हा गांधींना भावलेली. हेही खरेच की, इथली बडी बडी मंडळी, तुमचेच नाव घेऊन राजकारण करतात. असल्या दंगली, गटातटातल्या असल्या वितुष्टातूनही स्वत:च्या राजकारणाच्या नफ्या-तोट्याचे गणित मांडून मोकळे होणारे नेते निपजलेत स्वातंत्र्योत्तर काळात या देशात. शोकांतिका असली तरी दुर्दैवी वास्तव हेच आहे...
इस मुल्क के माथेपर
एक दाग है अंजुम
कुछ लोग फसादोको यहाँ
त्यौहार समझते हैं...
दुसरीकडे, स्वत:चे शहाणपण गहाण ठेवून, बेभान होत अशा बेईमानांसमोर नतमस्तक झालेल्यांच्या दिशाहीन वागण्याचे परिणाम परवा महाराष्ट्राने भोगले...
@@AUTHORINFO_V1@@