थॉमस, तुम्ही खरं बोललात !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |

इस्लामी दहशतवादाच्या जाचामुळे जागतिक स्तरावर जग एकवटून स्वत:च्या राष्ट्रीयत्वाचा शोध घेऊ लागले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या देशाचे राष्ट्रीयत्व रा. स्व. संघानेच नेमकेपणे मांडले आहे. अशा स्थितीत हा देश रा. स्व. संघाच्या विचारांखाली एकवटणे नैसर्गिकच आहे. मात्र, यातून अनेकांची राजकीय रोजंदारी बंद होणार आहे. थॉमस यांना जे समजले ते इतरांना कधीतरी समजेल, अशी आशा बाळागायला हरकत नाही.

 
प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या डाव्या साथीदारांनी महाराष्ट्रातल्या दलित जनतेला त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वापरले. स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणार्‍यांचा एक आवडता खेळ असतो. तो म्हणजे, आधी काड्या पेटवून पाहायच्या आणि मग आगडोंब उसळला की संघाच्या नावाने शिमगा करीत सुटायचे. हा सगळा गदारोळ चालू होण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. टी. थॉमस यांनी काही गौरवोद्गार काढले, जे स्वत:ला ‘घटनेचे तारणहार’ म्हणविणार्‍यांनी थोडे तपासून पाहाण्याची गरज आहे. ‘‘घटना, लोकशाही आणि लष्कर यांच्यानंतर या देशाला जर कुणी सुरक्षित ठेवले असले, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने,’’ असे उद्गार त्यांनी काढले. रविवारी कोट्टायमयेथे थॉमस हे भाषण करीत असतानाच काही लोक महाराष्ट्र कसा पेटवता येईल याची तजवीज करीत होते. थॉमस उपासना पद्धतीने ख्रिस्ती आहेत. पण, त्यांनी संघ समजून घेतलाय. एक उच्चपदस्त ख्रिस्ती माणूस संघाविषयी इतके चांगले कसे बोलू शकतो, असा प्रश्न माध्यमांना पडल्याने त्यांनी थॉमस यांच्या विधानांना मोठी प्रसिद्धी दिली. थॉमस कधीकाळी शाखेत गेल्याचे ऐकवात नाही. अत्यंत नितळ मनाने स्वत:ला कुठलाही ग्रह करून न घेता त्यांनी संघ समजून घेतला आहे. आपल्याकडे तो समजलेला नाही असे मुळीच नाही, मात्र थॉमस यांना जे जमले ते इथल्या मंडळींना करणे शक्य नाही.त्याचे मुख्य कारण म्हणजे, तसे करणे राजकीयदृष्ट्या सोईचे नाही. थॉमस यांनी आपल्या भाषणात ‘सेक्ुयलॅरिझम’ची जी फोड केली ती नक्कीच अनुकरणीय आहे. विचार स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणार्‍यांचा एक मोठा कंपू आपल्याकडे आहे. या सगळ्यांना संघ म्हणजे फॅसिस्ट शक्तीचे आगार वाटतो. मात्र, आणीबाणीसारखे संकट आपल्या देशावर जेव्हा उभे राहिले होते, तेव्हा लोकशाही गिळंकृत केली जाऊ नये, म्हणून जी संघटना उभी राहिली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघच होती. थॉमस यांना हे पटले, मात्र ज्यांनी डोळ्यावर कातडे पांघरले आहे त्यांना कसे समजावून सांगायचे? ‘सेक्युलॅरिझम’ची फोड थॉमस यांनी ज्या प्रकारे केली आहे त्यात ते म्हणतात, सेक्युलॅरिझमला धर्मापासून भिन्न करणे गैर मानले पाहिजे. भारतीय संविधान ‘सेक्युलॅरिझम’चा अर्थ नीट विषद करते. आज अल्पसंख्याक त्यांच्या हितासाठी ‘सेक्युलॅरिझम’चा वापर करतात. एखाद्याचा धर्म टाळून त्याला पाहाणे संविधानाला मुळीच अपेक्षित नाही. प्रत्येक व्यक्तीचा आदर केला गेला पाहिजे, हा सन्मान त्याला देत असताना त्याचा धर्म तपासून हे करणे मुळीच अपेक्षित नाही. धर्माचे रक्षण करण्यासाठी ‘सेक्युलॅरिझम’चा वापर करणे अयोग्यच असल्याचे मतही त्यांनी मांडले. अल्पसंख्याकांची संज्ञा कशी करायची, हा मोठाच प्रश्न. त्यात थॉमस म्हणतात की, ‘‘धर्माच्या आणि लोकसंख्येच्या आधारावर अल्पसंख्याकांचा विचार करणे अयोग्य आहे.’’
 
थॉमस यांचे संपूर्ण भाषणच विचार करायला लावणारे आहे. या देशात जे अनेक समज-गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण केले गेले आहेत, त्यात ‘सेक्युलॅरिझम’च्या बाबतीत जे भ्रमनिर्माण केले गेले ते केवळ आणि केवळ मतपेढ्यांसाठीच! तिहेरी तलाकसारखी खुद्द इस्लामी देशांनी नाकारलेली प्रथा आपल्याकडे निकालात काढली जायला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांहून अधिक काळ जावा लागला. यात देशात जन्मलेल्या एका मोठ्या महिला वर्गाला त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले गेले. त्याचे कारण काय, तर त्यांच्या धर्माची एकगठ्ठा मते नीट मिळाली पाहिजेत. शाहबानो प्रकरण काय होते? वयोवृद्धात्वाकडे झुकलेल्या एका महिलेला तिचा नवरा सोडून देतो आणि या देशात आधुनिकतेचे वारे आणणारे म्हणून संबोधले गेलेले राजीव गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन संसदेत त्यावर मनाई आणतात. हिंदुत्व म्हटले की धर्म आठवायला लागतो. मात्र, त्याचा तसा अर्थ लावणे चुकीचे आहे, असेही थॉमस यांनी म्हटले आहे. धर्माचा खरा अर्थ कोण लावणार, यापेक्षा राजकारणात तो कसा वापरून घ्यायचा, याची कुप्रथाच या देशातल्या राजकारण्यांनी सुरू केली. ब्रिटिशांचे जे ‘फोडा आणि राज्य करा’ हे तत्व आज आपण अनुभवत आहोत, ते ब्रिटिशांपेक्षा कॉंग्रेसनेच अधिक प्रभावीपणे राबविले असल्याचे दिसून येईल. आता त्यात नव्याने भर पडली आहे ती नव्या डाव्यांची. यांना पक्ष नाही, कारण पक्षाचे चिन्ह घेतले तर लोकांकडून काय प्रतिक्रिया येतील हे जगजाहीर आहे. त्यामुळे दलितांच्या वेशात डाव्यांचा नवा डाव निर्माण झाला आहे. आंबडेकरांनाच नाकारणारा जिग्नेश मेवानी याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बाबासाहेबांच्या विचारांशी त्याची असलेली नाळ किती खरी आणि किती खोटी, ते हा व्हिडिओ सांगतो. हा व्हिडिओ या मंडळींचा असली चेहरा आहे. कॉंग्रेसने धर्माच्या आधारावर आपल्याला वेगळे केले. मात्र, आता धर्माच्या वर उठून विकास, स्वत:ची ओळख यांच्या आधारावर स्वत:चे असे अस्तित्व निर्माण करण्याच्या अस्मिता या देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागविली गेली असताना, काही लोकांच्या हितसंबंधात बाधा येऊ लागली आहे. समाज विभागून का होईना, त्यांना त्यांच्या सत्तेची पाळेमुळे पुन्हा एकदा मजबूत होतील का, हे तपासून पाहायचे आहे. काल महाराष्ट्रात झालेली तोडफोड ही त्याच लिटमस टेस्टचा भाग होता. समाज विभागला म्हणजे त्याचे नेतृत्व करून आपले राजकीय स्वार्थ साधता येतात. अन्य समाज यात कितीही होरपळला तरी या मंडळींसाठी काही वावगे नाही. पूर्वी जातीजातीत समाज विभागला जायचा, आता तो एकसंघ होऊ लागलाय. इस्लामी दहशतवादाच्या जाचामुळे जागतिक स्तरावर जग एकवटून स्वत:च्या राष्ट्रीयत्वाचा शोध घेऊ लागले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या देशाचे राष्ट्रीयत्व रा. स्व. संघानेच नेमकेपणे मांडले आहे. अशा स्थितीत हा देश रा. स्व. संघाच्या विचारांखाली एकवटणे नैसर्गिकच आहे. मात्र, यातून अनेकांची राजकीय रोजंदारी बंद होणार आहे. थॉमस यांना जे समजले ते इतरांना कधीतरी समजेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@