मॅकोलेपुत्री निधी बहुगुणांचे संघीकरण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 

 
 
कितीही प्रयत्न केले, तरी या भारतभूची स्पंदने नष्ट होत नाहीत. ती हृदयाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात धडकतच राहतात. अनुकूल समय येताच, प्रकट होतात. स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षणपद्धतीने ही भारतीयत्वाची स्पंदने दडपून टाकण्याचे काम केले. खोटानाटा इतिहास, दंतकथा सांगून भारतीय विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचे काम केले. परंतु, ज्या वेळी या तरुणांना, आपल्याला फसविले गेल्याचे लक्षात येते, तेव्हा ही मंडळी ज्या त्वेषाने सक्रिय होतात, हे बघण्यालायक असते. अशीच कथा निधी बहुगुणा यांची आहे. इतिहासाचे अन्वेषण करणे हा त्यांचा छंद आहे. जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांच्या संदर्भात त्या तज्ज्ञ मानल्या जातात. ‘मॅकोलेपुत्री ते राष्ट्रवादी’ हा त्यांचा प्रवास त्यांनी नुकताच प्रकाशित केला आहे. तो वाचण्यासारखा आहे. हा वैचारिक प्रवास त्यांच्याच भाषेत मांडत आहे :
 
 
‘‘शाळा, कॉलेज तसेच पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कारकीर्दीपर्यंत मी बर्‍याच प्रमाणात मॅकोलेपुत्री होती, हे मान्य करायला मला कुठलाही संकोच नाही. शिक्षणासाठी आपली मुले कॉन्व्हेन्टमध्ये भरती केलेल्या कुठल्याही भारतीय मध्यमवर्गीयांचे असेच असते. इंदिरा गांधींची पूजा केली जाते, नेहरूंचा सेक्युलरवाद डोक्यावर घेतला जातो. मेरठमधील माझी सोफिया गर्ल्स स्कूल उत्कृष्ट संस्था होती. विद्यार्थी म्हणून माझ्या मनाची कवाडे या शाळेने उघडली; तसेच नखशिखान्त मॅकोले-पुत्री होण्यापासून या शाळेने मला वाचविले. लहानशा गावातील कुटुंबांसाठी अशी शाळा म्हणजे महत्त्वाकांक्षेचे प्रवेशद्वारच असते! या शाळेने आम्हाला आंतरराष्ट्रीय जगताचे दृश्य खुले करून दिले. स्नेहसंमेलने, मेजवान्या होत्या. बीटल्स, स्वीडिश पॉप ग्रुप- अबा, अमेरिकेचे कारपेण्टर संगीत, लव्ह स्टोरी इत्यादींची ओळख इथेच झाली. त्या काळी या सर्वांची टूमच होती. परंतु, ही आमची शाळा महान संस्था असल्यामुळे तिथे भारतीय संस्कृती, शास्त्रीय संगीत व नृत्य यांनाही आदराचे स्थान होते. वार्षिक उत्सव तसेच क्रीडा दिनी होणारे लोकनृत्य व संगीत यांचाही आम्हाला त्यामुळेच परिचय झाला.
 
वाचनालय तर ज्ञानाचा खजिनाच होता! हिंदी पुस्तकांचा फार मोठा संग्रह होता. अभिजात हिंदी साहित्य वाचण्यासाठी आम्हाला प्रेरित करण्यात येत असे. नववीत असताना माझ्या हाती कन्हैयालाल मुन्शी (के. एम. मुन्शी) यांचे ‘जय सोमनाथ’ हे पुस्तक लागले. सुटीत आम्हाला तीन पुस्तके घरी नेता यायची. मी ‘जय सोमनाथ’ व ‘लोपामुद्रा’ ही दोन पुस्तके नेली. ‘जय सोमनाथ’ने मला अंतर्बाह्य हादरवून सोडले. आम्हाला जो इतिहास शिकविला जातो तो अपुरा आहे, हे लक्षात आले. पुस्तक भारावून टाकणारे होते. मस्तक धडापासून कापून काढेपर्यंत आरती करणार्‍या पुजार्‍याचे वर्णन तर माझ्या स्मरणात कायमचे कोरले गेले. काळ राजकीयदृष्ट्या योग्य नव्हता. इतिहासाच्या तासाला आम्ही सोमनाथबद्दल विचारायचो. सांगण्यात यायचे, हो, ते गझनीने उद्ध्वस्त केले व नंतर ते बांधण्यात आले. आमचे शिक्षक सांगायचे, हो, एकेकाळी आमची संस्कृती महान होती.
 
परंतु, सोमनाथ आणि आमच्या संस्कृतीचा विध्वंस यांची वेदना कुठेतरी सुप्त मनात कोरली गेली. आयुष्य पुढे जात गेले. अहंमन्य मध्यमवर्गीयांच्या मॅकोलेप्रणीत जगात तसेच गांधी घराण्याच्या आदरबुद्धीत मी सुखात होते. १९८४ साल राजीव गांधींमुळे लक्षात राहिले. शाहबानो प्रकरणाचा आमच्यावर काही परिणाम झाला नाही. कारण, आमची महत्त्वाकांक्षा असलेली किशोरवयीनांची आंतरराष्ट्रीय स्वप्ने राजीव गांधी यांनी दाखविली होती. त्यांची हत्या झाली आणि माझी राजकारणातील रुची संपली. आर्थिक उदारीकरणामुळे, जागतिक दर्जाची मॅकोलेप्रणीत स्वप्ने आमच्या निकट आलीत.
 
डिसेंबर महिन्यातील अशाच एका सकाळी, बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्याची बातमी आली. यावेळी माझे लग्न झाले होते आणि मला तान्ही मुलगी होती. मॅकोलेप्रणीत मानसिकतेमुळे आम्ही शरमेने किती दबून गेलो होतो! बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतरच खर्‍या अर्थाने मला समजले की, तिथे राम मंदिर होते. तोपर्यंत आम्हाला वाटायचे, काही संदिग्ध लोकांनी सुरू केलेली ही एक संदिग्ध चळवळ आहे, जी भारताला लाज आणत आहे. मला आठवते, त्या वेळी चर्चा सुरू होती की, आमच्या नेहरूवादी सेक्युलॅरिझम्च्या आदर्शानुसार तिथे शाळा किंवा रुग्णालय बांधावे. कुणी म्हणाले, मंदिर आणि मशीद दोन्ही बांधाव्या. चर्चदेखील बांधावा. मला स्मरते की, एका राम मंदिर समर्थकासोबत वाद घालताना मी म्हटले होते की, राम कधीही मंदिरासाठी लढला नसता. त्याने तर राज्यदेखील सोडले होते.
 
हळूहळू जीवन पुढे जात होते, परंतु राम मंदिराचा मुद्दा माझ्या डोक्यात गुंजत राहिला. हळूहळू मी अयोध्या आणि राम मंदिर यांच्याबाबत अधिक माहिती मिळवीत गेले आणि माझा दृष्टिकोन बदलू लागला. एके दिवशी माझ्या पतीची बदली पोरबंदर येथे झाली. त्यांनी आम्हाला नेले नव्हते. पण, एकदा आम्ही भेट म्हणून पोरबंदरला गेलो. तिथे काहींनी सांगितले की, सोमनाथ मंदिर येथून काही तासांच्याच अंतरावर आहे. शाळेत असताना सोमनाथला भेट देण्याचे माझे स्वप्न एकदम उफाळून वर आले. त्याला उद्ध्वस्त केल्याची सुप्त वेदना ठसठसू लागली. मी साडी नेसली. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. परंतु, अनेक दशकांपासून प्रतीक्षा केलेल्या या स्थानी मी जाणार होते आणि तेही एक खरी भक्त म्हणून! सातत्याने आक्रमकांच्या धाडी येत असताना माझे हिंदू पूर्वज कसे वागले असतील, याचाच विचार दिवसभर माझ्या मनात घोळत होता. काहींना धर्मांतरित केले असेल, काहींना ठार मारले असेल, काही कुठेतरी लपून राहिले असतील.
 
सोमनाथचे मंदिर अतिविशाल आहे. त्याचा भव्य थाट, शोभा पाहून तर मला रडूच कोसळले. के. एम. मुन्शी आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीची मला जाणीव झाली. मंदिराच्या पुनर्उभारणीमुळे हिंदूंच्या मनातील पिढ्यान्पिढ्यांची जखम भरली गेली होती. उद्ध्वस्त शहरे, स्मारके आणि मंदिरांना भेटी दिल्यामुळे हिंदूंच्या मनात जी वेदना आणि दुर्दैवीपणाची भावना निर्माण झाली होती, ती जाऊन आता अभिमानाची भावना आली होती.
 
 
नंतर मनात आले की, जर सोमनाथ पुन्हा बांधले जाऊ शकते, तर राम मंदिर का नाही? हो! सांस्कृतिक वेदनाशमनासाठी तसेच हिंदुत्वाच्या पुनरुत्थानासाठी आम्हाला राम मंदिर परत मिळालेच पाहिजे. समाजातील भेदभाव संपविण्यासाठी राम मंदिर बांधणे गरजेचे आहे. भव्य सोमनाथ मंदिर बघताना वाटते की, शेवटी गझनी पराभूत झालाच आणि हे मंदिर त्याचे प्रतीक आहे. मग राम मंदिर पुन्हा उभारल्यास त्याचा राष्ट्रीय अभिमानावर तसेच भावी पिढीवर काय परिणाम होऊ शकतो, याची कल्पना करा! सोमनाथच्या त्या भेटीपासून माझे ‘संघीकरण’ सुरू झाले.
 
 
होय! मंदिर वही बनायेंगे!
रक्ताचा एक थेंबही न सांडवता!
संताप, क्रोधाने नाही, तर धार्मिक दृढनिश्चयाने!
युगानुयुगे राम मंदिर जिथे उभे होते, तिथेच ते पुन्हा उभे राहील...!’’
 
 
निधी बहुगुणांची ही कहाणी सांगण्याचा उद्देश, किशोरवयात योग्य पुस्तके वाचण्यात आली तर त्याचा, भावी आयुष्यात योग्य दिशा मिळण्यास किती उपयोग होते, हे सांगणे आहे. सुप्त मनात कोरले गेलेले संस्कार, वर कितीही स्वार्थाचे पापुद्रे चढले तरी मिटत नाहीत. कुठल्या तरी एका क्षणी एखादी ठिणगी पडते. चढलेले पापुद्रे क्षणात जळून खाक होतात आणि हे सुप्त संस्कार नवतेजाने झळाळत प्रकट होतात. असे अनेकांच्या बाबतीत झाले आहे. निधी बहुगुणा या त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत. मॅकोलेप्रणीत शिक्षण ही अपरिहार्यता असली, तरी मुलांच्या सुप्त मनात भारतीयत्वाचे संस्कार कोरण्याची जबाबदारी, पालक म्हणून आम्ही पार पाडतो का, हा प्रश्न आहे. तो तुम्हा-आम्हांच्या दिशेने रोखला गेला असल्यामुळे त्याचे उत्तर आम्हालाच द्यावे लागणार आहे. इतिहास याचा जाब विचारणारच, हे निश्चित!
 
 
- श्रीनिवास वैद्य 
@@AUTHORINFO_V1@@