फुटलेल्या काचा, तुटलेली मने !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
भीमा-कोरेगाव प्रकरणावरुन दंगल उसळली. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर ‘बंद’ची हाक देणार्‍या भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना रमेश पतंगे यांनी विचारलेले परखड सवाल...
 
प्रकाश आंबेडकर, जय भीम! तशी ‘जय भीम’ करण्याची मला सवय नाही, मी आपला नमस्कार म्हणतो. परंतु, मी जर नमस्कार म्हणालो, तर तुम्ही तो स्वीकारणार नाही, म्हणून ‘जय भीम’ म्हणतो. ‘नमस्कार’ तुमच्या दृष्टीने, कदाचित ब्राह्मणी संस्कृतीचा अभिवादनाचा प्रकार असेल. वर्षातून काही वेळा मला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे फोन येतात. सवयीप्रमाणे मी ‘नमस्कार’ म्हणतो आणि फोन करणारा ‘जय भीम’ म्हणत राहतो आणि जोपर्यंत मी ‘जय भीम’ म्हणत नाही, तोपर्यंत तो संभाषण सुरू करीत नाही. मला ’जय भीम’ म्हणायला कसलीच अडचण नसते. भारतमातेच्या सुपुत्राला वंदन करण्यात मला ना वैचारिक अडचण आहे, ना भावनिक अडचण...
 
भीमा-कोरेगावच्या प्रश्नावरून ३ जानेवारीला तुम्ही ’महाराष्ट्र बंद’ची हाक दिलीत आणि दहा तासानंतर बंद मागे घेतल्याची घोषणा केलीत. जॉन रीड याचे ‘टेन डेज दॅट शुक दी वर्ल्ड’ हे रशियन क्रांतीवरील अतिशय गाजलेले पुस्तक आहे. तुमच्या दहा तासाच्या ’बंद’वरसुद्धा एक पुस्तक लिहिले पाहिजे. ‘दहा तास ज्याने महाराष्ट्र दुभंगून गेला’ अशा प्रकारचे त्याचे शीर्षक होऊ शकते.
‘बंद’ करण्यासाठी कोणता ना कोणता विषय लागतो. तुम्ही विषय निवडलात तो, भीमा-कोरेगावचा. येथे शौर्यदिनासाठी जमलेल्या नागरिकांवर दगडफेक झाली. त्यात काही वाहने जाळण्यात आली. ही घटना निंदनीय आहे. कायदा कोणालाही हातात घेण्याची परवानगी देण्यात येत नाही. जे दोषी आहेत, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. याबाबतीत दुमत असण्याचे काही कारण नाही. कोरेगाव येथे जमलेल्या नागरिकांवर दगडफेक झाली. या घटनेचा निषेध करण्याचा लोकशाहीने दिलेला तुम्हाला अधिकार आहे. परंतु, त्यासाठी ’महाराष्ट्र बंद’ करण्याचे कारण काय? महागाई वाढली की ‘बंद’ केला जातो, दरवाढ झाली की ’बंद’ केला जातो, कधी कधी सीमा प्रश्नावर ‘बंद’ होतो, असे सगळे प्रश्न या ना त्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला स्पर्श करणारे असतात. मात्र, ‘बंद’चा त्रास सर्वांनाच होतो. परंतु, लोक तो आनंदाने सहन करतात. पण, तुम्ही पुकारलेल्या ‘बंद’ने काय झाले? ‘बंद’ पुकारण्यापूर्वी २ जानेवारीला अनेक ठिकाणी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. काही कामासाठी मी ११च्या सुमारास चेंबूरच्या दै. ’मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयात गेलो होतो. थोड्या वेळातच रस्त्यावर दगडफेक सुरू झाली. एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या, प्रवाशांना खाली उतरविण्यात आले, रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक कारच्या काचा फोडण्यात आल्या. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर बाहेरून मोठा दगड मारून काच फोडण्यात आली. ही दगडफेक पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला. एसटी आणि ‘बेस्ट’च्या बसेसवर दगडफेक कशासाठी? रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक कशासाठी? वाहनातून उतरलेला प्रवासी पहिला प्रश्न करतो की, ‘‘मला कशाला खाली उतरविण्यात आले? आणि हे निळे झेंडे घेऊन लोक दगडफेक का करतात?’’ ज्यांना कोरेगावची घटना माहीत होती, त्यांनी ती सांगायला सुरुवात केली. त्यांनी काय सांगितले?
 
दोनशे वर्षांपूर्वी भीमा नदीच्या काठी, कोरेगाव येथे इंग्रज सेना आणि पेशव्यांची सेना यांची लढाई झाली. त्यात पेशव्यांचा पराभव झाला आणि १८१८ साली मराठी राज्याचा अंत झाला. या मराठी राज्याच्या अंताचा दिवस शौर्यदिवस म्हणून अनेक वर्षे आंबेडकरी जनता पाळते. इंग्रजांच्या सैन्यात महार तुकडी होती. ती शौर्याने लढली आणि त्यातील अनेक जण धारातिर्थी पडले. युद्धात मरणारा प्रत्येक सैनिक शूरच असतो आणि तो कोणत्या बाजूने लढला हे जसे महत्त्वाचे तसेच त्याचे शौर्य महत्त्वाचे. हा शौर्यदिन साजरा करण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोरेगावला जमतात. हा इतिहास अन्यथा सामान्य माणसाला माहीत झाला नसता, तो २ जानेवारीच्या दगडफेकीमुळे आणि ३ तारखेच्या ‘बंद’मुळे आता घरोघरी पोहोचला आहे. महार जमात तशी शूर जमात आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील त्यांचा पराक्रम असाच देदीप्यमान आहे. १९४७ साली पाकिस्तानने जेव्हा काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा डॉ. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून महार बटालियन पाठविण्यात आली. महार बटालियनने काश्मीर वाचविण्यासाठी जो पराक्रम केला आहे, त्याची नोंद सुवर्णाक्षराने करावी लागते. या महार बटालियनच्या शूर सैनिकांनी काश्मीर मुक्तीसाठी जो पराक्रम दाखविला तो तर देशभक्तीचा प्रेरणादायक इतिहास आहे. त्यांनी (महार बटालियन) काश्मीरच्या समरांगणात एवढी मर्दमुकी दाखविली की, लष्करी अधिकार्‍यांनी व खुद्द सरसेनापतींनी ‘महार सैनिक, हिंदी सेनेतील उत्कृष्ट लढवय्ये आहेत,’ असेच गुणगौरवपर उद्गार जाहीरपणे अनेकवेळा काढले. (खैरमोडे खंड ९, पृष्ठ २७६) २४ डिसेंबर १९४७ रोजी झांगर येथे भीषण लढाई झाली. बंदुकीच्या गोळ्या संपल्यानंतरही शूर महार सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला मुष्टीयुद्धाने रोखले. यामुळे त्यांना एक महावीरचक्र आणि पाच वीरचके्र प्राप्त झाली. मी डाव्या विचारसरणीतील देशभक्त नसल्यामुळे माझ्या दृष्टीने २४ डिसेंबर हा खरा शौर्यदिन आहे. प्रकाशजी, हा शौर्यदिन तुम्ही साजरा करणार नाही, हेही मला माहीत आहे. त्याचे कारण असे की, या शौर्यदिनात ब्राह्मणद्वेषाचा दारूगोळा नाही. तुम्ही संघाला ब्राह्मणवादी ठरवून टाकले आहे, म्हणून संघद्वेषाचाही दारूगोळा नाही. पेशवे जन्माने ब्राह्मण. इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला. तुमचे इतिहासकार त्याची मीमांसा ‘ब्राह्मणशाहीचा पराभव झाला’ अशी करतात. एका अर्थाने ते खरेदेखील आहे. कारण, उत्तर पेशवाई ब्राह्मणशाहीतच परावर्तित झाली होती. परंतु, पेशवे हे सार्वभौमराजे नव्हते. सार्वभौम होते, छत्रपती. त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते लढले, म्हणून त्यांचा पराभव मराठी साम्राज्याच्या अस्तात झाला. आम्ही आपले सरळसोट इतिहास जाणणारे आहोत. डाव्यांच्या ऐतिहासिक करामती आमच्या डोक्यावरून जातात आणि माझ्याप्रमाणेच सामान्य जनता विचार करते असे मला वाटते.
 
या ‘बंद’च्या काळात जो नाहक आणि अनावश्यक हिंसाचार झाला, त्याला जबाबदार कोण? तुम्ही त्याची काही जबाबदारी घेणार नाही. तुम्ही म्हणणार कोरेगावमध्ये ज्यांनी हल्ले केले ते जबाबदार आहेत. त्या जबाबदार लोकांवर खटले भरून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी करण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यात कलेक्टर कचेरीवर धरणे आणि मोर्चाचे कार्यक्रम करता आले असते, मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाता आला असता, सरकारला निवेदन देता आले असते. कोरेगावच्या घटनेशी ज्याचा कसलाही संबंध नाही अशा सामान्य माणसाला, रेल्वेतून प्रवास करणार्‍या नोकरदार माणसाला, रेल्वेतून प्रवास करणार्‍या आया-बहिणींना, शाळेत जाणार्‍या आपल्या लहानग्यांना वेठीस का धरण्यात आले? त्यातून काय मिळविले?
 
 
प्रकाशजी, त्यातून दोन गोष्टी तुम्ही मिळविल्या- पहिली गोष्ट, महाराष्ट्रात स्वतःची ‘स्पेस’ निर्माण केलीत. ‘स्पेस निर्माण करणे’ ही राजकीय भाषा आहे. आंबेडकरी जनतेत तुमचेच प्रतिस्पर्धी आहेत रामदास आठवले. ते कधी राष्ट्रवादीत असतात, तर कधी सेना-भाजपबरोबर. आता ते केंद्रात मंत्री आहेत. सत्तेवर असलेला माणूस विरोधी पक्षाची भूमिका घेऊ शकत नाही. जनतेच्या प्रश्नांना तो रस्त्यावर येऊन आवाज देऊ शकत नाही. कोरेगावच्या निमित्ताने तुम्हाला रामदास आठवलेंना शह देण्याची संधी सापडली, तिचा तुम्ही उपयोग केला. राजकारण असेच चालते. म्हणून त्याची तशी चिंता करण्याचे कारण नाही. जर तुम्ही सत्तेवर असता आणि आठवले बाहेर असते तर काय झाले असते?
 
परंतु, ही ‘स्पेस’ मिळविण्यासाठी जी किंमत तुम्ही दिली आहे, ती फार जबरदस्त आहे. २ आणि ३ जानेवारीच्या अघोषित आणि घोषित ‘बंद’मध्ये जो समाज भरडून निघाला आहे, तो तुमचा नजीकच्या काळात मित्र होणे जवळजवळ अशक्य आहे. कोरेगावच्या संघर्षाला ‘मराठा विरुद्ध दलित’ असा रंग देण्याचा जो प्रयत्न झाला, तोदेखील महाराष्ट्राचे सामाजिक संतुलन उद्ध्वस्त करणारा ठरणार आहे. केवळ जातीचे राजकारण केले, तर यापेक्षा वेगळे काही होणार नाही. आज कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता उर्वरित जनतेपासून अलग पडली आहे आणि हे अत्यंत दुःखदायक आहे. तुम्ही म्हणू शकता की, आम्हाला अन्य समाजाची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत, आम्हाला घटनेचे संरक्षण आहे, कायद्याचे संरक्षण आहे, आमचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही, आत्मगौरवासाठी ही भाषा चांगली आहे. परंतु, सामाजिक बंधुभावना निर्माण करण्याच्या दृष्टीने ही भावना अत्यंत घातक आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात बंधुभावनेला सर्वाधिक महत्त्वाचे स्थान दिले. ‘‘बंधुभावना म्हणजेच मानवता आणि हेच धर्माचे दुसरे नाव आहे,’’ असे ते म्हणत.
 
संविधान सभेत बंधुभावनेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘बंधुभावनेचा अर्थ काय होतो? बंधुभावनेचा अर्थ होतो, सर्व नागरिकांमध्ये समान बंधुतेच्या भावनेची जाणीव-भारतीय म्हणजे आम्ही सर्व एक आहोत ही भावना. हे तत्त्व आपल्याला आपल्या सामाजिक जीवनात ऐक्य आणि एकत्त्वाच्या भावनेचे बळ देते. ते प्रत्यक्षात आणणे कष्टदायक आहे.’’ सार्वत्रिक बंधुतेची भावना निर्माण होणे आणि तीही जाती-पातीत विभागलेल्या जनतेमध्ये किती कठीण आहे, याची अनुभूती मी समरसतेचे काम गेली ३० वर्षे करीत असताना घेतो आहे. २ आणि ३ जानेवारीच्या ‘बंद’ने या बंधुतेच्या भावनेला, समरसतेच्या भावनेला तडे गेलेले आहेत. रस्त्यावर तुटलेल्या काचांचा ढीग बघताना तुटलेल्या मनांचे विदारक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि मला पंचतंत्रातील एका गोष्टीची आठवण झाली. एका शेतात एक नाग राहत होता. शेतकरी रोज त्याला श्रद्धेने दूध देई. त्याची भरपाई म्हणून नाग त्याला रोज एक सुवर्णमुद्रा देत असे. काही कामामुळे शेतकरी परगावी गेला. जाताना तो मुलाला म्हणाला,‘‘शेतातील नागाला रोज दूध दे.’’ मुलाने पहिल्या दिवशी दूध दिले, त्याला सुवर्णमुद्रा मिळाली. त्याच्या मनात विचार आला की, या नागाला जर ठार केले तर जमिनीखालचा सुवर्णमुद्रांचा खजिना आपल्याला मिळेल. म्हणून दुसर्‍या दिवशी दूध पिणार्‍या नागावर त्याने वार केला. त्याची फणा तुटली. नागाने वार करणार्‍या मुलाला दंश केला. त्यात मुलगा मेला. शेतकरी परत आला. त्याला दुःख झाले. त्याने नागाच्या बिळासमोर दूध ठेवून त्याला प्रार्थना केली की, ‘‘तू परत ये.’’ नाग त्याला म्हणाला, ‘‘शेतकरी दादा, तुझी माझी मैत्री आता शक्य नाही. मला पाहून तुला तुझ्या मुलाच्या चितेची आठवण येत राहील आणि तुला पाहून मला तुटलेल्या फण्याची आठवण येत राहील. तेव्हा आता आपण आपापल्या ठिकाणी राहणे चांगले.’’ प्रकाशजी, तुमचे राजकारण झाले, ब्राह्मणद्वेषाचा तडका झाला, फडणवीस, मोदी आणि भागवत यांना शिव्या देण्याचा शिमगा झाला, पण तुम्ही काय मिळवलेत? उत्तर तुम्हाला शोधायचे आहे.
 
- रमेश पतंगे 
 
@@AUTHORINFO_V1@@