महाराष्ट्रात फूट पाडण्याचा ‘साहेबी कावा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018   
Total Views |
 
 
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे २०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांकडून उभारण्यात आलेल्या रणस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून जमलेल्या आंबेडकरी जनतेवर भगवे झेंडे घेतलेल्या काही अज्ञात लोकांनी हल्ला केला, दगडफेक केली, बेसावध असलेल्या निष्पाप लोकांना मारहाण केली आणि राज्यात एकच राळ उडाली. अर्थातच याचे पर्यवसान राज्यभरात जातीय दंगली भडकण्यात झाले नसते तरच नवल. केवळ इतकेच नाही तर हीच योग्य संधी आहे असे समजून अनेक राजकीय पक्षांनीही आपली पोळी भाजली नसती तरच नवल. हा हल्ला हिंदुत्त्ववादी संघटनांनी घडवून आणला असल्याचे सूचक विधान राज्यातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने केल्यामुळे डाव्या संघटनांचे तेवढेच फावले व त्यांनी हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली. तर पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत भडक वक्तव्य केली गेल्यामुळे आंबेडकरी जनता पेटून उठली व त्यातून हा संघर्ष निर्माण झाला असा आरोप हिंदुत्त्ववादी तंबूतून होऊ लागला. एकूणातच दलितांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात झाली.
 
 
या सगळ्यात जे त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांनी काही फोटो व व्हिडिओ काढून सोशल मिडियावर प्रसारित केले आणि वातावरण अजूनच चिघळले. निळे झेंडे घेतलेल्या आंदोलकांवर भगवे झेंडे घेतलेले तरूण दगडफेक करत आहेत अशी दृष्ये त्यातून दिसत होती. त्यामुळे भगवे विरूद्ध निळे असे एक विचित्र वातावरण तयार झाले आणि जातीय तणाव वाढला. त्यातच व्हिडिओमध्ये ‘जय भवानी जय शिवराय’ अशा घोषणा असल्यामुळे भगवे झेंडे घेतलेली मंडळी हिंदुत्त्ववादी आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मग जबाबदार संघटना शोधण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यातूनच मग संभाजी भिडे गुरुजी यांची शिवप्रतिष्ठान ही संघटना व मिलिंद एकबोटे यांची समस्त हिंदू आघाडी ही संघटना यांना लक्ष्य केले गेले. पण हे सर्व वरकरणी दिसते तितके सोपे आणि साधे मुळीच नाही. सत्य काहीतरी निराळेच आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते माहिती झाल्यास राजकीय भूकंप घडेल हे मात्र नक्की.
 

 
 
 
मुळात घडलेल्या घटनाक्रमाकडे पुन्हा एकदा नीट पाहण्याची गरज आहे. वास्तविक भीमा कोरेगावला रणस्तंभावर मानवंदना द्यायला दर वर्षी लोक जात असतात. दर वर्षी साधारणपणे १५-२० हजार लोक जातात आणि शांतपणे मानवंदना देऊन परत येतात. मात्र गेल्या ४-५ वर्षांपासून भीमा कोरेगावला येणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या मनात व्यवस्थेविरोधात विष पसरवण्यासाठी काही नक्षलसमर्थक डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनीही तिथे नियमितपणे जाण्यास सुरुवात केली. साहजिकच भीमा कोरेगाव रणस्तंभ हा शौर्य व पराक्रमापुरता मर्यादित न राहता दलित विरुद्ध सवर्ण या मांडणीकडे झुकवण्यात डाव्या चळवळींना यश आले. परिणामी भीमा कोरेगावला येणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या मनात विष कालवण्याची डाव्यांची योजनाही हळूहळू सफल व्हायला लागली होती. पण डाव्या संघटनांचा हा कार्यक्रम शांततेत व गुप्तपणे चालू होता. याही वर्षी तसेच होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. भीमा कोरेगावच्या युद्धाला यंदा २०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त तेथे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता येणार हे उघडच होते. ती जनता अधिक भडकवून त्यांच्या मनात सरकारविषयी अधिक द्वेष भरवण्यासाठी खरंतर पुण्यात शनिवार वाड्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणा देण्याचा आरोप असलेला कडव्या डाव्या संघटनेचा विद्यार्थी नेता उमर खालिद, गुजरातमध्ये नुकताच झालेल्या निवडणूकीत जातीय विद्वेष पसरवून आमदार झाल्याचा आरोप असलेला व कडव्या डाव्या संघटनांशी संबंध असलेला जिग्नेश मेवाणी, हैदराबाद विद्यापीठात दहशतवादी याकूब मेमनच्या समर्थनार्थ मोर्चा काढलेला व त्यानंतर डाव्या विद्यार्थी चळवळीतील फोलपणा लक्षात येऊन आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाची आई, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व अघोषित कॉम्रेड प्रकाश आंबेडकर, तिहेरी तलाकला इस्लाम व शरियाच्या नावाखाली विरोध करणारे मौलवी अब्दुल हमीद अजहरी यांच्यासह अनेक वादग्रस्त नेते बोलवण्याचा घाट घातला गेला.
 
 
 
अपेक्षेप्रमाणे जिग्नेश, उमर व आंबेडकर यांनी मोदी व फडणवीस सरकारविरोधात जोरदार राजकीय भाषणबाजी केली. त्यांना उपस्थित जनतेकडून चांगला प्रतिसादही मिळाला. दुसऱ्या दिवशी माध्यमांना भरपूर खाद्य मिळेल याची पुरेशी काळजी त्यांनी घेतली होती. दुसऱ्या दिवशी या भाषणांचा परिणाम म्हणून भीमा कोरेगावला जास्त गर्दी होईल, तिथेही भाषणबाजी होईल एवढी माफक अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र इथेच सगळे अंदाज बांधायला चुकले. जिग्नेश, उमर यांनी भाषणे झाल्यावर पुण्यातील डाव्या व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका देखील घेतल्याच्या बातम्या आल्या मात्र तोपर्यंत पुढे काय होणार आहे याची सुतराम कल्पना महाराष्ट्राला नव्हती. ‘जाणतं’ राजकारण सुरु झालं ते नेमके इथेच. जेव्हा सर्वजण आपापलं राजकारण करून निर्धास्त होऊन झोपी जातात तेव्हाच जाणतं राजकारण सुरु झालेलं असतं ... कोणाच्याही नकळत.
 
 
नव्या वर्षाचा पहिला दिवस उजाडला गावागावातून भोळीभाबडी आंबेडकरी जनता रणस्तंभाकडे यायला निघाली. आंबेडकरी चळवळीही मोठ्या उत्साहात शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत होत्या. मात्र अचानकच गर्दी ऐन भरात असतानाच भगवे झेंडे घेतलेल्या दीड-दोन हजाराच्या जमावाने या जनतेवर हल्ला केला आणि एकच कोलाहल झाला. दुकाने जाळली गेली, काचा फोडल्या गेल्या, गाड्यांची तोडफोड केली गेली आणि आंबेडकरी जनतेवर दगडफेक सुरु झाली. आपल्यावर हल्ला झाला आहे हे कळायच्या आतच कितीतरी जण जखमी झाले होते. पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सर्वच जण अनभिज्ञ होते. गर्दी जास्त होईल या अंदाजाने पोलीस तयारीत होते मात्र हल्ला होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. हा जमाव आला कुठून, त्याने हल्ला का केला, दगडफेकीसाठी इतके दगड अचानक आले कुठून आणि आता आपण करायचे काय यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर यात भरडून निघालेल्या आंबेडकरी जनतेपाशी नव्हते. आदल्याच दिवशी जिग्नेश व उमरने रस्त्यावर उतरून हिंदुत्त्ववाद्यांना धडा शिकवा हा दिलेला संदेश लोकांच्या चांगलाच डोक्यात होता. त्यामुळे त्यांनीही मग भगवे झेंडे पाहून प्रत्त्युत्तर देण्यास सुरुवात केली व न भूतो अशा हिंसाचाराला सुरुवात झाली. दोन्ही गटांकडून गाड्यांची, दुकानांची भरपूर मोडतोड व जाळपोळ झाली. अखेर पोलीसांनी राखीव तुकड्यांना बोलवून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पुढचा अनर्थ टळला.
 
 
 
मग आता प्रश्न असा निर्माण होतो की हा भगवे झेंडे घेतलेला जमाव आला कुठून व त्याचा उद्देश नेमका काय होता? आणि या सगळ्या प्रकरणात सातत्याने ज्या गावाचे नाव चर्चेत येत आहे त्या वढू-बुद्रूक गावाचा याच्याशी काय संबंध? याच्या उत्तरासाठी दोन-तीन दिवस मागे जावे लागेल. २९ डिसेंबरला भीमा कोरेगावहून ९ किलोमीटरवर असलेल्या वढू-बुद्रुक गावात ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणाहून जवळ असलेल्या गोपाळ महार यांच्या समाधीजवळ एक फलक अचानक रात्रीतून लावण्यात आला. त्या फलकावर गोपाळ गणपत उर्फ गोपाळ महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा केले व शिवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले याचे वर्णन करण्यात आले होते व समाधीकडे जाण्याचा रस्ता दाखवण्यात आला होता. वढू-बुद्रुकच्या ग्रामस्थांना सकाळी हा फलक दिसल्यावर गावातील वातावरण तणावग्रस्त झाले. त्यातूनच रागावून स्थानिक ग्रामस्थ युवकांनी तो फलक काढून टाकला व तिथे असणाऱ्या गोपाळ महार यांच्या समाधीची मोडतोड केली. यामुळे गावातील आंबेडकरी जनता अस्वस्थ झाली व आसपासच्या गावातून आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते गावात दाखल होऊ लागले. मात्र स्थानिक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे व ग्रामस्थांवर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंबेडकरी चळवळी शांत झाल्या व पुढील प्रसंग टळला. स्थानिक वर्तमानपत्रांतून दुसऱ्या दिवशी याच्या बातम्याही आल्या. मात्र वरकरणी तणाव निवळला असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र गावातील तब्बल ४९ ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांच्या मनात राग धुमसत होता.
 
 
 
३० आणि ३१ डिसेंबरचे दिवस तणावपूर्ण तरीही शांततेत गेले. पण त्याच वेळी ग्रामस्थांच्या मनातील या रागाला खतपाणी घालण्याचे प्रकार सुरु झाले आणि त्यातूनच पुढच्या संघर्षाची बीजे रोवली गेली. आपल्याच गावातील लोक आपल्याला आव्हान देतात हे सहन न झाल्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याचे ठरले आणि त्यातूनच वढू-बुद्रुक ते भीमा-कोरेगाव मोर्चा काढायचा निर्णय झाला. यापूर्वी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था फोडण्याचा व ऐतिहासिक वास्तूमधील पुतळ्यांची विटंबना करण्याचा पुरेसा अनुभव गाठीशी असणाऱ्या कडव्या जातीयवादी संघटनेचे या सर्वाला मार्गदर्शन व खतपाणी होते हे सांगणे न लगे. आणि योगायोग असा की नेमकी हीच संघटना भीमा-कोरेगाव येथील अभिवादनाच्या कार्यक्रमात यंदा पहिल्यांदाच यजमान म्हणून सहभागी झाली होती. ठरल्याप्रमाणे १ जानेवारीला हा देखील मोर्चा भगवे झेंडे घेऊन निघाला व भीमा कोरेगावला येऊन धडकला. झेंडे भगवेच होते मात्र हा भगवा नक्कीच निराळा होता. दगडफेक करण्याची पूर्ण तयारी करून आलेल्या या जमावाने गावात पोहोचता क्षणीच मारहाण सुरु केली, दगडफेक सुरु केली आणि पुढचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. त्यातच या धुमश्चक्रीत एका युवकाचा मृत्यू झाला त्यामुळे वातावरण अधिकच तापले आणि २०० वर्षांत पहिल्यांदा भीमा-कोरेगावला सामाजिक हत्येचे गालबोट लागले.
 

 
 
या घटनाक्रमातील दुसरा योगायोग असा की आदल्या दिवशी एल्गार परिषदेला आलेला एकही जण दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगावला आला नाही. दोन्ही समाजांना आवरू शकेल असा एकही नेता त्या ठिकाणी नव्हता. काही कडव्या डाव्या संघटनांनी व कडव्या जातीयवादी संघटनांनी इशारे दिले असल्यामुळे जादा पोलीस बंदोबस्त तैनात केली होता मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर हे घडेल याची त्यांनाही कल्पना नसावी. पण पोलीसांनी वेळीच बळाचा आणि अक्कलहुशारीचा वापर केला आणि जमाव पांगवला त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला. त्यानंतर जाणत्या नेतृत्वाला अपेक्षित असल्याप्रमाणे भगवे झेंडे पाहून स्वाभाविक आक्षेप हा हिंदुत्त्ववादी संघटनांवर आला आणि मग ठरल्याप्रमाणे ठरलेली वाक्ये माध्यमांमधून जाणते राजकारणी देऊ लागले आणि महाराष्ट्राने पुन्हा एकदा ‘साहेबी कावा’ अनुभवला.
 
 
 
वढू-बुद्रुक या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर ज्या काही हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भक्तिभावाने जात असतात त्यातील एक म्हणजे समस्त हिंदू आघाडी अर्थात मिलिंद एकबोटे आणि दुसरे म्हणजे श्री शिव प्रतिष्ठान अर्थात संभाजी भिडे गुरुजी. वास्तविक भीमा-कोरेगाव हा या दोन्ही संघटनांच्या प्रमुख अजेंड्यावरील विषय नाही. पण केवळ हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून त्यांचे नाव यात गोवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न जाणत्या नेत्यांनी केला. वढू-बुद्रुक गावात गेले ४-५ दिवस काही जातीयवादी संघटनांचे कार्यकर्ते फिरत होते व वातावरण तापवत होते असे माध्यमांमध्ये सांगणाऱ्या या जाणत्या नेत्यांना ती संघटना आपल्याच कळपातील आहे याची चांगलीच जाणीव होती. मात्र तांत्रिकदृष्ट्या चपखल व निर्दोष विधाने करण्याची हातोटी असल्यामुळे अन्य कोणाच्याही हे लक्षात आले नाही. त्यांच्या याच प्रचाराला आंबेडकरी जनता व डावी मंडळी बळी पडली आणि मग या दोघांविरोधात अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले. गंमत म्हणजे असे काही आपल्या विरोधात झाले असेल याची सुतराम कल्पना या दोघांनाही नव्हती. दोघांच्याही संघटनांमध्ये आंबेडकरी समाजातील हजारो कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना आपल्या विरोधात असे काही होईल हे स्वप्नातही वाटले नसावे. अचानक झालेल्या या आरोपामुळे कोणालाच काहीच करता आले नाही व सर्व समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. काय गरज होती तिथे जायची, कोणी सांगितले जायला वगैरे प्रश्न कित्येक हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्याही मनात निर्माण झाले. पण वस्तुस्थिती ही होती की त्या दोघांपैकी कोणीच तिथे गेले नव्हते. इतकेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही गेले नव्हते असे नंतर समोर आले.
 
 
 
या सर्व आरोपांमुळे डाव्या चळवळींनाही आयतेच कोलित हातात मिळाले व त्यांनीही यथेच्छ टीका टिप्पणी सुरु केली. अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या डाव्या पत्रकारांनी यावर ट्वीटचा पाऊस पाडला. आणि त्यावर कळस म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाच्या ‘युवा’ अध्यक्षांनीही यासाठी संघ-भाजपला दोषी धरले आणि एकच धुव्वा उडाला. डाव्यांसाठी ही भूमिका किंवा ही मांडणी नवी नव्हती. येन केन प्रकारेण भाजप सरकार घालवण्यासाठी समाजात जातीभेद निर्माण करणे, अराजक माजवणे, फूट पाडणे हे त्यांच्यासाठी नेहमीचेच असल्यामुळे त्यांना हे तुलनेने सोपे गेले व आपल्या मांडणीशी सुसंगत असल्यामुळे त्यांनी त्यावर फार विचार न करता आपल्या सहकाऱ्यांचीच री ओढणे पसंत केले. दुसरीकडे हिंदुत्त्ववादी चळवळींनी आदल्या दिवशी झालेल्या एल्गार परिषदेतील भडक भाषणांना या घटनांसाठी जबाबदार धरले. जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांनी आंबेडकरी जनतेची डोकी भडकवली, रस्त्यावर उतरण्याची भाषा केली त्यामुळेच असे झाले असे मांडायला सुरुवात केली. डावे आणि उजवे दोघांनीही नेमके काय घडले आहे याची साधी प्राथमिक चौकशीही न करता बावळटपणे एकमेकांवर तोंडसुख घेण्यातच धन्यता मानली. माध्यमांमधून हिरीरीने भूमिका मांडल्या गेल्या, वृत्तपत्रांतून लेख लिहिले गेले. वास्तविक दोघांनाही ही घटना अनपेक्षित होती. त्यामुळे नेमकी भूमिका ठरवायलाच दोघांनाही वेळ लागला. अर्थात भूमिका पुरवण्याचे कंत्राट घेतलेल्या जाणत्या नेत्याने त्यांची ही समस्याही सोडवली आणि दोघांना एकमेकांविरोधात उभे केले आणि आपल्या किर्तीला जागत ते स्वतः मात्र नामानिराळेच राहिले.
 
 
 
राज्यात सत्ताधाऱ्यांना कोणत्याही मुद्द्यावर कोंडित पकडता न आल्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच हे घडवून आणण्यात आले आहे हे उघडच आहे. पण त्यासाठी महाराष्ट्राचं जाणतं राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. सरकार अस्थिर करण्यासाठी चक्क जातीय दंगली घडवून आणायचा खूप मोठा कट होता हा. साहेबी राजकारणाला अपेक्षित असा भडका उडाला असता तर काय अनर्थ राज्यावर ओढवला असता याची कल्पनाच केलेली बरी. या आधीही जातीनिहाय मोर्चे काढण्याची खेळी खेळून, शेतकरी कर्जमाफीवरून वातावरण पेटवून, दुष्काळाचे भांडवल करून या ना त्या प्रकारे सरकार अस्थिर करण्याचे निष्फळ प्रयत्न करून झाल्याचे महाराष्ट्राने पाहिलेलेच आहे. पण महाराष्ट्रातील जनतेने प्रत्येक वेळी दाखवलेल्या समंजसपणामुळे हे सर्व मनसुबे फोल ठरत गेले आहेत. १ जानेवारीला भीमा-कोरेगावला घडलेली आंबेडकरी जनता भरडण्याची घटना ही देखील महाराष्ट्रात फूट पाडण्याच्या याच फसलेल्या साहेबी काव्याचा भाग होती हाच याचा अर्थ.
 
 
@@AUTHORINFO_V1@@