धुळे : शहरात सकाळपासूनच व्यापार्यांनी व्यवहार बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. शहरातील काही शाळांनी सुरक्षेच्या दृष्टीने सुट्टी दिली आहे तर काही शाळा सुरु असल्यातरी पालकांनी पाल्यांना न पाठविल्याने उपस्थिती कमी होती.
बस स्थानकावरुन पोलीस बंदोबस्तात बसेस सोडल्या होत्या. मात्र, प्रवाशांची उपस्थिती कमी होती. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे बंद पाळण्यात येत असून सर्व व्यवहार बंद आहे. बसअभावी प्रवाशांचे हाल झाले होते. भारत मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चातर्फे पिंपळनेर बंदचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार व शांततेत बंद पाळण्यात आला.
बस स्थानक परिसरात शासनाविरुध्द घोषणा देण्यात येऊन घटनेचा निषेध करण्यात आला. महामार्गावर तालुक्यातील कुसुंबाजवळ रस्त्यावर टायर जाळले. आठवडे बाजार बंद केले. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोंडाईचा येथेही कडकडीत बंद असून पोलीस संरक्षणात बस जात आहे. बाजार समितीत खरेदी विक्री सुरु आहे.