नाशिकमध्ये बंदचा अल्प परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : भीमा - कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी आज देण्यात आलेल्या बंदच्या हाकेला शहरातून अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात मात्र, काही ठिकाणी बंदचा परिणाम जाणवला.
 
आज एसटी बसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच शाळेच्या बसेस बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थी तसेच पालकांची गैरसोय झाली होती. तसेच काही शाळांनी कामकाज बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांनी घरी थांबणे पसंत केले. दरम्यान, दुकाने व अन्य व्यवहार सुरू होते. शहरातील शालीमार, सीबीएस हे भाग वगळता कुठेही बंदचा परिणाम जाणवला नाही.
 
शालीमारजवळ वाहतुकी बंद ठेवण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही दलित संघटनांचे कार्यकर्ते, समविचारी संघटना, दलित बांधव सकाळपासून शालीमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमले होते. त्यांनी निषेध मोर्चा करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. यावेळी भीमा कोरेगावप्रकरणी समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
 
शहरात पंचवटी, नवीन नाशिक आणि नाशिकरोड परिसरात कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चे काढण्यात आले होते. नाशिक रोड, नवीन नाशिक, पंचवटी परिसरात कार्यकर्ते बंदबाबत आवाहन करत होते. म्हसरूळ येथील आरटीओ कॉर्नरजवळ कार्यकर्त्यांनी ठिय्या देत घोषणाबाजी केली. नाशिक-पुणे महामार्गावर बोधले नगर येथे वाहनावर दगडफेक करणार्‍या दहा-बारा जणांना युवक उपनगर पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
  
जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
 
आजच्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वावी सिन्नर परिसरात मोर्चे काढण्यात आले. त्र्यंबकेश्‍वरमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बंदचे आवाहन करण्यात आले. शालीमार, शिवाजी नगर, नेहरू गार्डन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. मेनरोड, मुंदडा मार्केट परिसरातील दुकाने सुरू होती. महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, दहीपूल, पंचवटी परिसरातही काही दुकाने सुरू होती. दरम्यान, अनेक भागात आवाहन करून दुकाने आस्थापने बंद करण्यात आली. शालीमार, अशोकस्तंभ, सीबीएस, रविवार कारंजा या ठिकाणाहून रिक्षा वाहतूक सुरू होती. मात्र बस स्टँडवर शांतता होती. निमाणी बसस्टँड व इतर सर्व शहर बसचे स्थानक; एसटी बस सेवा, खासगी शाळा, खासगी कार्यालये, कपडे, मोबाईल, सराफी दुकाने व इतर विविध दुकाने आणि आस्थापने, भाजीबाजार, फळबाजार, खासगी ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याचे दिसून आले. मेडिकलची दुकाने वगळता बहुतांश दुकाने बंद असल्याने नाशिककरांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत नसल्याने गैरसोय झाली. सकाळपासून दुकाने बंद असल्याने त्यातच कालपासूच या बंदची चर्चा होत असल्याने अनेकांनी घरी राहणेच पसंत केले.
 
 
बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय
 
राज्यातील प्रमुख शहरांप्रमाणे नशिकमध्ये एसटीची सेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे नशिककरांना त्याचा फटका सहन करावा लागला. मनमाड एसटी बससेवा बंद ठेवल्याने प्रवासी स्थानकामध्ये बसची प्रतिक्षा करत होते. तसेच सिन्नर आणि पिंपळगाव बसवंत येथेही बंदचा परिणाम जाणवला. कोपरगाव नाशिक दरम्यानच्या बसफेर्‍या सुरू होत्या. ग्रामीण भागातही काही ठिकाणी बससेवा सुरू होती. निफाडला बंदमुळे एसटी बस रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या होत्या. नांदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील बोलठाण येथे बंद असून अनेक एसटी बस स्थानकातच थांबविण्यात आल्या होत्या. येवल्यातून बाहेरगावी जाणार्‍या सर्व एसटीच्या बसेस सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्या होत्या. बससेवा बंद झाल्याने इतर पर्यायी वाहनांमधून प्रवाशांनी जाण्याचा मार्ग स्वीकारला.
 
बससेवा सुरू होण्यामध्ये अडचणी
 
दरम्यान, सायंकाळी ५ नंतर बंद मागे घेण्यात आल्याने हळूहळू जनजीवन पूर्ववत सुरू झाले. मात्र सिटी बस आणि बाहेरगावच्या बस सुरू झाल्या नव्हत्या. याबाबत डेपो व्यवस्थापकांशी ’मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता बससेवा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले. ड्युटीवर आलेले कर्मचारी ४ वाजता परत निघून गेले. आता आदेश आल्यास बससेवा सुरू करू, मात्र परत गेलेले कर्मचारी बोलावणे कठीण असल्याने बसेस सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@