महाराष्ट्र बंदमध्ये सुरू होती माणुसकीची सहज सेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 

सामाजिक संस्थेने केली सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांना मदत

 
खोपोली : 'महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्याचवेळी खोपोलीमधून मराठवाडा बीड येथे जाणार्‍या स्व. बन्सीधर जाधव माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीची बस बंदच्या भीतीने थांबून राहिली होती. त्यातील मुलांनी महड देवस्थानात जाऊन दर्शन घेतले होते, परंतु आता पुढे काय हा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला होता. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थी उपाशी आणि तहानलेल्या अवस्थेत बसमध्ये बसून होते.
 
 
 
ही बाब 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी' या सामाजिक संस्थेच्या जितेंद्र रावळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला. खोपोलीचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच सूत्रे हलली. तातडीने संस्थेचे सदस्य अमोल ठकेकर, नंदू ओसवाल, योगेश शिंदे, मोहन केदार, नवनाथ फडतरे, अमोल कदम, विनीत रावळ यांनी खोपोली एसटी स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधला व पिण्याच्या पाण्याची आणि नाश्त्याची सोय केली. त्याच दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलनकर्त्यांनी त्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची सहानुभूतीपूर्वक संवाद साधत दिलासा दिला. शेखर जांभळे यांनी प्रकाश साबळे यांच्या मदतीने खोपोलीतील गगनगिरी महाराज आश्रमाशी संपर्क साधून सगळ्यांच्या जेवणाची सोय केली.
 
 
 
पोलीस उपनिरीक्षक किसवे, पोलीस हवालदार सुतार, किरण शेळके अशा कर्मचार्‍यांनी यावेळी महत्त्वाची भूमिका पार पाडली. विद्यार्थी अडचणीत असताना माणुसकीचा झरा वाहताना दिसल्याचे मत शिक्षक विनोद सवासे रा. बीड यांनी व्यक्त केले. त्यांनी मदतीला आलेल्या खोपोलीकरांचे आभार मानले. शेख मुस्कान अन्सार या विद्यार्थिनीने महाराष्ट्र बंदमुळे आम्ही घाबरून गेलो होतो, परंतु खोपोलीतला प्रत्येकजण आमची आपुलकीने चौकशी करत होता. आम्हाला खाऊ पिऊ घालत होते. ते पाहून मी आम्ही आमच्या गावातच असल्यासारखे वाटत होते. खोपोलीत बंद असतानाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वजण दक्ष होते. अशाच पद्धतीने दिवसभर ठिकठिकाणी संस्थेचे सदस्य अडलेल्यांना मदत करताना दिसत होते. स्व. बन्सीधर जाधव माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनाने सर्वांचे मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@