थलैवा रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
‘‘राजकारणात उतरण्यासाठी मला कोणी बाध्य करू शकत नाही, त्याचप्रमाणे राजकारणात येण्यापासूनही कोणी मला रोखू शकत नाही,’’ असे ठणकावून सांगणारे, तामीळ चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय असणारे आणि अनेक आख्यायिका ज्यांच्याबद्दल सांगितल्या जातात, असे शिवाजीराव रामोजीराव गायकवाड उपाख्य रजनीकांत यांनी अखेर २०१७ संपायच्या अखेरच्या दिवशी राजकारणात उतरण्याची घोषणा केली.
 
रजनीकांत यांच्या या घोषणेचा देशाच्या राजकारणावर नसला, तरी तामिळनाडूच्या राजकारणावर मात्र निश्चितच परिणाम होणार आहे. रजनीकांत राजकारणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती, आता मात्र रजनीकांत यांनी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडूतील विद्यमान भ्रष्ट राजकीय प्रणाली बदलवण्याचा आणि राज्यात क्रांती घडवण्याचा निर्धारही रजनीकांत यांनी केला आहे. ‘चांगले बोला, चांगले करा म्हणजे चांगलेच होईल,’ असे घोषवाक्यही रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांसाठी दिले आहे. नव्या पक्षाची ध्येयधोरणे त्यांनी अद्याप जाहीर केली नसली, तरी आपला पक्ष आध्यात्मिक स्वरूपाचे राजकारण करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
 
रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून दबावही होता. याच दबावाचा भाग म्हणून २००८ मध्ये कोईंबतूर येथील रजनीकांत यांच्या चाहत्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती. पक्षाचे नाव आणि झेंडाही जाहीर केला होता. ही माहिती मिळताच रजनीकांत यांनी या घटनेशी आपला संबंध नसल्याचे तसेच अशा प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले होते. हा पक्ष गुंडाळला नाही तर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. राजकारणात आपल्याला रुची नाही, आपण फक्त चित्रपटातच काम करणार असल्याचे त्या वेळी जाहीर करणार्‍या राजनीकांत यांनी, तब्बल १० वर्षांनंतर राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे स्वागत केले पाहिजे.
 
तामिळनाडूच्या राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असताना रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची घोषणा करून राज्यातील निराधार जनतेच्या मनात मोठ्या आशा निर्माण केल्या आहेत. आतापर्यंत तामिळनाडूचे राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांभोवती फिरत होते. द्रमुकचे नेतृत्व करुणानिधी यांच्याकडे, तर अण्णाद्रमुकचे एम. जी. रामचंद्रन यांच्याकडे होते. एम. जी. रामचंद्रन यांच्यानंतर अण्णाद्रमुकचे नेतृत्व जयललिता यांच्याकडे आले. जयललिता यांनी अण्णाद्रमुकला खंबीर नेतृत्व देत एम. जी. रामचंद्रन यांची उणीव कधी भासू दिली नाही. त्यामुळे राज्यातील जनतेनेही आलटूनपालटून, २०१६ चा अपवाद वगळता कधी द्रमुक, तर कधी अण्णाद्रमुक यांच्याकडे सत्ता सोपवत संतुलन साधले.
 
विशेष म्हणजे करुणानिधी आणि जयललिता यांनीही, काँग्रेस असो वा भाजपा, या दोन राष्ट्रीय पक्षांची डाळ आपल्या राज्यात कधी शिजू दिली नाही. तामिळनाडूच्या म्हणण्यापेक्षा स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी या दोघांनीही केंद्रात सत्तेत असलेल्या, मग तो काँग्रेस असो की भाजपा, यांचा पद्धतशीर उपयोग करून घेतला. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षात पर्यायी नेतृत्व उभे होऊ दिले नाही. त्याचीच किंमत आज या दोन्ही पक्षांना आणि पर्यायाने तामिळनाडूलाही चुकवावी लागत आहे. जयललिता यांचे निधन झाले, तर करुणानिधी वार्धक्यामुळे राजकारणातून बाहेर फेकले गेले. त्यामुळे राज्यात नेतृत्वाची प्रचंड पोकळी निर्माण झाली. जयललिता यांच्यानंतर त्यांच्या अण्णाद्रमुकची तीन शकले झाली. सत्तेमुळे यातील दोन शकले एकत्र आली असली, तरी त्यात फार अर्थ उरला नाही. दुसरीकडे, द्रमुकमध्ये नेतृत्व कोणी करायचे, या मुद्यावरून भाऊबंदकी माजली आहे. त्यामुळेच रजनीकांत यांच्याकडून राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.
 
राज्यात नेतृत्वाची प्रचंड पोकळी निर्माण झाली असताना आणि दोन्ही पक्षांतील विद्यमान नेतृत्वात ती भरून काढण्याची क्षमता नसताना रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली आहे. तामीळ जनतेला आपले नेतृत्व करण्यासाठी नेत्याची नाही, तर नेहमीच अभिनेत्याची वा अभिनेत्रीची गरज असते! त्यामुळे यावेळी राज्यातील जनतेची गरज रजनीकांत भागवू शकतात. रजनीकांत यांनी आता राजकारण प्रवेशाची घोषणा केली असली, तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते काही प्रमाणात राजकारणात सक्रिय होतेच. राज्यातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर त्यांनी आंदोलन केले होते.
 
कावेरी पाणीवाटपाच्या मुद्यावरून रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या जनतेच्या हितासाठी एकदा नाही तर दोनदा कर्नाटक सरकारविरुद्ध धरणेही दिले होते. कर्नाटकमधील नेत्यांना, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी पाण्याचा मुद्दा न पेटवण्याचे आवाहन केले होते. त्याची कर्नाटकमध्ये तीव्र प्रतिक्रियाही उमटली होती. कर्नाटकमधील विविध संघटनांनी रजनीकांत यांच्या माफीच्या मागणी करत त्यांच्यावर तसेच त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची घोषणाही त्या वेळी केली होती. नंतर पाणीवाटपाचा हा वाद संपुष्टात आल्यानंतर कर्नाटकने त्यांच्या चित्रपटांवरील बहिष्कार मागे घेतला होता. हा सर्व संदर्भ सांगण्याचे कारण म्हणजे, या वर्षी कर्नाटक विधानसभेचीही निवडणूक आहे आणि या निवडणुकीवर राजकारणात प्रवेश करण्याच्या रजनीकांत यांच्या घोषणेचा निश्चितच परिणाम होऊ शकतो.
 
आज द्रमुक आणि अण्णाद्रमुकला भ्रष्ट म्हणणार्‍या रजनीकांत यांनी, या दोन्ही पक्षांसोबत काँग्रेसलाही पाठिंबा दिला होता. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची भेट घेतल्यानंतर रजनीकांत यांनी १९९५ मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता. १९९६ मध्ये मात्र काँग्रेसने अण्णा द्रमुकशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रजनीकांत यांनी आपली भूमिका बदलवत द्रमुक आणि तामीळ मनिला काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला होता. तामीळ मनिला काँग्रेसला सायकल हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्या वेळी एका चित्रपटातील सायकलवर बसलेल्या रजनीकांतच्या छायाचित्राचा वापर तामीळ मनिला काँग्रेसने आपल्या प्रचारासाठी केला होता. अण्णाद्रमुकवर हल्ला चढवताना रजनीकांत यांनी त्या वेळी, अण्णादमुक सत्तेवर आली तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही, असे विधान केले होते. रजनीकांत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्यातील जनतेने द्रमुक तामीळ मनिला काँग्रेस आघाडीला बहुमत दिले होते. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रजनीकांतने याच आघाडीला पाठिंबा दिला होता.
 
रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाचा सर्वाधिक फायदा तामिळनाडूत भाजपाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांनी, ‘‘मी भाजपाला मतदान करणार आहे,’’ असे सांगत, अप्रत्यक्षपणे भाजपाला मतदान करण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले होते. पण, त्याच्या समर्थकांनी आपल्या थलैवाचे म्हणजे नेत्याचे त्या वेळी ऐकले नव्हते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत एकही जागा भाजपाला मिळाली नव्हती. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांच्या पक्षाशी युती करत राज्यात आपले खाते उघडण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे.
 
राजकारणात प्रवेश करण्याच्या रजनीकांत यांच्या घोषणेचे, तामिळनाडूतील त्यांच्या चाहत्यांनी स्वागत केले असले, तरी राज्यातील जनता त्यांना कसा प्रतिसाद देते, हे समजायला आपल्याला २०२१ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा रजनीकांत यांनी केली आहे. त्याआधी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत रजनीकांत यांच्या पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला, तर राज्यातील जनता त्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देते, यावरून त्यांच्या राजकारणातील यशापयशाचा निर्णय होणार आहे. कधीकाळी बसवाहक असणार्‍या रजनीकांत यांना आता तामिळनाडूच्या राजकारणात चालकाची म्हणजे मध्यवर्ती भूमिका बजावावी लागणार आहे, हे निश्चित!
 
 
- श्यामकांत जहागीरदार  (9881717817)
 
@@AUTHORINFO_V1@@