परिसस्पर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
'आयडियल रोड बिल्डर' अर्थात 'आयआरबी'चे संस्थापक दत्तात्रय म्हैसकर यांचे बुधवारी डोंबिवली येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. म्हैसकरांच्या रस्तेबांधणीच्या कामांपैकी कायम चर्चिले गेलेला प्रकल्प म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे. आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही म्हैसकरांचे योगदान अमूल्य होते. दि. २६ जुलै, २००५ च्या महाप्रलयात नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी त्यांनी तब्बल १०० कोटींची मदत केली. व्यवसायानिमित्त मुंबईकर झालेल्या म्हैसकरांनी मात्र आपली डोंबिवलीकर ही ओळख सदैव जपली. डोंबिवलीचे आबासाहेब पटवारी आणि म्हैसकर यांचेही जवळचे संबंध होते. तेव्हा, पटवारी यांनी म्हैसकरांच्या सदैव स्मरणात राहतील, अशा आठवणींना दिलेला हा उजाळा...
 
 
पूर्वी राज्यस्तरावर आणि नंतर केंद्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, "सन १९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आले आणि त्या शासनात सार्वजनिक बांधकामखात्याचा मंत्री म्हणून कामकरण्याची संधी मला मिळाली. माझ्याच मंत्रिपदाच्या कारकीर्दीत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बी.ओ.टी.)’ या तत्त्वावर आधारित देशातील पहिला रस्ता ठाणे-भिवंडी बायपास तयार करण्याचे कंत्राट ‘आयडियल रोड बिल्डर्स’ या रस्ते बांधकामक्षेत्रात नाव असलेल्या कंपनीला देण्यात आले. पण, देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे असंख्य अडचणी त्यावेळी निर्माण झाल्या होत्या. त्या अडचणींवर मात करीत ‘आयडियल रोड बिल्डर्स’चे दत्तात्रय म्हैसकर यांनी यशस्वीपणे तो प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पाच्या एम.ओ.यु.वर स्वाक्षरी करण्याकरता मी, सार्वजनिक बांधकामविभागाचे तत्कालीन सचिव गो. का. देशपांडे आणि म्हैसकर असे तिघेजण दिल्लीला गेलो होतो. अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प महाराष्ट्रात होणार म्हणून मी आनंदात होतो. पण, तत्कालीन भूतल परिवहन विभागातील अधिकार्‍यांनी या प्रकल्पात खोडा घालण्याचे प्रयत्न केले. म्हैसकर यांनी तेव्हाचे परिवहन विभागाचे संचालक शास्त्री यांना आपली बाजू समजावून सांगत त्या प्रकल्पावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम दुसर्‍या दिवशी घडवून आणला. तेव्हा मी, म्हैसकर यांच्यातील जबरदस्त चिकाटी, जिद्द व आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा या गुणांमुळे प्रभावित झालो.
 
 
 
कामात उद्भवलेल्या प्रश्नांची सोडवणूक यशस्वीपणे कशी करावी व कामतडीस कसे न्यावे, याचा वस्तुपाठ म्हैसकर यांच्या कार्यपद्धतीत दिसून येतो. आपल्या व्यवसायाला ‘आयडियल रोड बिल्डर्स’ म्हणून नाव लावणारे म्हैसकर केवळ ‘आयडियल उद्योजक’च नाहीत, तर माणूस म्हणूनही ‘आयडियल’ आहेत. आयुष्याच्या वळणावर आपल्याला काही माणसं अशी भेटतात की, ती कायमची लक्षात राहतात. ती कसल्यातरी ध्यासापायी इतकी झपाटलेली असतात की, शरीराने जरी ती वर्तमानात वावरत असली तरी भविष्यकाळ सतत त्यांना खुणावत असतो आणि मग जगावेगळी नवी निराळी क्षितिजे पार करण्याच्या ध्यासापोटी ते स्वतःची तहानभूक विसरतात. सतत काम, काम आणि काम! डोळ्यांसमोर एक लक्ष्य असतं आणि ते लक्ष्य साध्य होत नाही, तोपर्यंत त्यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देत नाही. इतकंच काय तर निवांत झोपूही देत नाही.’’
 
 
जीवनात नेमकं उद्दिष्ट साध्य करण्याची, ठरवून ते पूर्णत्वाला नेण्याची उर्मी घेऊन जे जन्माला येतात, तेच आयुष्यात काहीतरी चमत्कार घडवू शकतात. डोळ्यांसमोरचं लक्ष्य, ते मिळविण्यासाठी केलेली कामाची अचूक आखणी, अहोरात्र कामकरण्याची धमक, वेळेपूर्वी लक्ष्य गाठण्याची क्षमता आणि शेवटी विजयी होणारच, याबद्दलचा जबर आत्मविश्वास असे सर्व गुण ज्याच्या ठायी ठासून भरलेले असतात, असं एक अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणजे दत्तात्रेय म्हैसकर.
 
 
शतेषु जायते शूरः सहस्त्रेषुच पण्डितः |
वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ।।
 
असे एक चांगले सुभाषित आहे. शूर, पण्डित, वक्ता या सर्वांहून दात्याची श्रेणी वरची आहे. शौर्य, पाण्डित्य, वक्तृत्व हे असाधारण गुण असले तरीही खरे दातृत्व दुर्मीळ असल्याचे जाणवते. खर्‍या दातृत्वाला अनेक कसोट्या असतात. असे म्हणतात की, ‘श्रीया देयं र्‍हिया देयं...!’ तुम्ही किती आणि काय देता यापेक्षाही तुम्ही कसे देता, हे महत्त्वाचे असते. दातृत्वापेक्षा नेतृत्वासाठी देणारे, विनाकष्ट संपत्तीचे दान करणारे, असे अनेक दात्यांचे प्रकार समाजात सर्रास आढळतात. पण, ‘उद्यमेन पुरुषसिंह मुपौति लक्ष्मी’ या धारणेने अपार कष्ट आणि बुद्धिमत्तेचा वापर करून मिळालेल्या माझ्या मिळकतीत समाजाचाही वाटा आहे. अशा मूलभूत मानसिकतेतून कालानुरूप योग्य त्या प्रकल्पासाठी उदारपणे त्या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी सहभाग म्हणून देता देता सहजपणे आपला हातही घेण्यार्‍याच्या हातात देतो, तोच खरा वर उल्लेख केलेल्या ‘दाता’ या संज्ञेस पात्र आहे...!
 
 
सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेकांकडे हात पसरावेच लागतात. परंतु, त्याच्या सामाजिक कार्याची अथवा एखाद्याच्या व्यक्तिगत अडचणींची जाणीव ठेवून सन्मानपूर्वक देणारे क्वचितच भेटतात. अशा उदार मनस्वी कार्यकर्त्यांचा ‘दाता’ म्हणून उल्लेख केलेलाही ज्यांना रुचत नाही, असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आय.आर.बी.चे दत्तात्रय म्हैसकर. आपल्या उद्योगाच्या नावातच पहिलाच ‘आयडियल’ शब्द लावणारे म्हैसकर आपला व्यवसाय त्याच प्रकारे करायचे. अनेक क्षेत्रांत पदार्पण करताना आणि झेप घेताना आम्ही त्यांना पाहिले आहे. आपले सहकारी, मित्र, सगेसोयरेच नाही, तर अधिकारी व सेवकवर्गालाही आपल्या विशाल कुटुंबात सामावून घेताना म्हैसकरांना मनापासून आनंद मिळायचा. त्यामुळे कॉर्पोरेट जगतात स्थिरावले असले, तरी हे एक आदर्श कुटुंब आहे.
 
 
एक प्रसंग नमूद करावा असा आहे. माजी राष्ट्रपती मा. अब्दुल कलामांची, त्यांचा कवितासंग्रह हिंदी व मराठीतून अनुवादित करण्याची अनुमती मला मिळालेली होती. अनुवाद झाला, पण प्रकाशनाचे काय? काही लाखांची गरज होती. मग मी म्हैसकरांची पायरी चढलो. ’’सध्या काय चालले आहे?’’ त्यांनी विचारले. मी त्यांना उपक्रमकथन केला आणि मग पुढचे बोलण्याची आवश्यकताच उरली नाही. त्यांनी उभे राहून माझे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि क्षणातच योग्य ती रक्कममाझ्यासमोर ठेवली आणि म्हणाले, ‘‘आणखी लागल्यास सांगा...!’’ प्रकल्प पूर्ण झाला. पुस्तक घेऊन मी त्यांना भेटायला गेलो आणि म्हटले, ’’आपल्याला राष्ट्रपतींना भेटायला जायचे आहे.’’ ते तत्परतेने उद्गारले, ‘‘माझ्यापेक्षा विरेंद्रला घेऊन जा.’’ आम्ही दिल्लीला राष्ट्रपतींना भेटायला गेलो. मी उमलत्या वयाच्या, वडिलांचा उमद्या कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या विरेंद्रचा कलामांशी परिचय करून दिला. त्यावर राष्ट्रपतींनी आवर्जून मला विचारले, ‘‘आपण ज्यांच्याविषयी नेहमी बोलता त्यांचेच हे चिरंजीव आहेत ना?’’ तरुणांत विशेष रमणारे कलामइतके उल्हसित झाले की, त्यांनी १५-२० मिनिटे चक्क बागेत झाडाखाली उभे राहून आमच्याशी गप्पा मारल्या...!
 
 
आपले उत्तरदायित्व मुले नीट सांभाळतात, असे अनुभवताच मुलांवर व्यवसायाची प्रमुख जबाबदारी सोपवून दत्तात्रेय म्हैसकरांनी सल्लागाराची भूमिका स्वीकारली, तर आपली मुले व सुना कौटुंबिक जबाबदार्‍या स्वीकारण्यात सक्षमझालेल्या पाहताच सुधाताईंनी प्रपंचातून लक्ष कमी करून समाजकार्याकडे ओढा वाढविला आणि त्यासाठी वेगळा विश्वस्त निधी स्थापन केला आणि म्हैसकर फाऊंडेशन स्थापनेमुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवा आयामलाभला. केवळ कुटुंबातीलच नव्हे, तर इतर अनेकांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. एकदा अब्दुल कलामांनी पुण्यात लोकार्पण झालेला एनडीएचा सुंदर लघुपट पाहिला होता. त्यावेळी लघुपटाच्या निर्मात्या अनघा घैसास म्हणाल्या, ‘‘म्हैसकरांच्या सहकार्याशिवाय मला हा लघुपट करणे शक्यच नव्हते.’’ या सर्व पार्श्वभूमीवरून घैसासांप्रमाणे अनेकांना हा परिसस्पर्श झालेला आहे...!
पण डोंबिवलीकरांचे दुर्दैव असे की, अचानक हा परिसच हरवला आहे. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास सद्गती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!
 
 
 
-आबासाहेब पटवारी
@@AUTHORINFO_V1@@