ख्रिश्चन, अहमदिया, शिया व ब्लॉगर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018   
Total Views |
 
 
 
ख्रिश्चन - 
 
२००५च्या ‘Religious Freedom Report’ अनुसार बांगलादेशात ३.५ ते ५ लक्ष ख्रिश्चन राहतात, त्यातील बहुतांशी कॅथलिक आहेत. हिंदू-बौद्ध अल्पसंख्यांकांसोबत तेथे ख्रिश्चनांवरही हिंसक हल्ले होत आहेत. २००४च्या ‘Religious Freedom Report’ अनुसार जून २००१ला गोपाळगंज जिल्ह्यातील कॅथलिक चर्चमध्ये रविवारी बॉम्बस्फ़ोटात १० मृत्युमुखी पडले व २० दुखापतग्रस्त झाले. बॉम्बस्फ़ोटाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन केला गेला पण शासनाने आयोगाच्या अहवालावर कुठलीही कारवाई केली नाही व पोलीसही सक्रियपणे खटल्याचे पाठपुरावा करत नव्हते. २१ जुलै २००३ ‘द गार्डियन’ मधील वृत्तानुसार,"फ़ैनजना गावात २०० जणांच्या जमावाने १० ख्रिश्चनांची घर लुटली, कित्येक महिला व मुलांवर प्राणघातक हल्ला केला. गुंडांना पैसे देण्यास नकार दिल्यावर ढाक्याजवळील कमलापूर गावातील ख्रिश्चनांना मारहाण व इतरांचा छळ करण्यात आला." ख्रिश्चन धर्मांतरित डॉ. जोसेफ़ गोम्स यांची सप्टेंबर २००५ला जमलपूर जिल्ह्यात घराजवळ हत्या करण्यात आली. एप्रिल २००६ला चित्तगावमधील चर्च जाळण्यात आले. १
 
 
३ जून २००१ला गोपाळगंज जिल्ह्यातील बेनिअरचरमधील चर्चमधील बॉम्बस्फ़ोटात १० मारले गेले व २४ दुखापतग्रस्त झाले. HUJIB चा नेता व शिध्दीरगंज मदारीनगर कोमी मदरसाचा उपाध्यक्ष व इतर तीन साथीदारांना ८ जूनला काकरेल, ढाक्यातून अटक करण्यात आली.२
 
 
केवळ मुस्लिमेतर अल्पसंख्यांकांचाच (म्हणजे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन) छळ होतोय असे नाही तर मुसलमानातील अहमदिया व शियांवरही आता हिंसक हल्ले होत आहेत.
अहमदिया -
 
१९१२ पासून अहमदिया बांगलादेशात (ब्रिटिशकालीन भारतातील बंगाल प्रांत) राहत आहेत, सन १९८७ला ‘आंतरराष्ट्रीय खत्मे नबुवत चळवळ बांगलादेश’ (IKNMB) संघटनेने ब्राह्मणबरिया शहरातील अनेक अहमदिया मशिदींवर हल्ले करून त्या ताब्यात घेतल्या. खात्मे नबुवत म्हणजे शेवटचे प्रेषित. इस्लामनुसार ‘मोहम्मद पैगंबर' हे शेवटचे प्रेषित आहेत. पण अहमदिया अनुयायी ‘प्रेषित मोहम्मद पैगंबर’ ह्यांच्या नंतर ‘मिर्जा गुलाम अहमद’ ह्यांना शेवटचे प्रेषित मानतात. ह्यावरून 'आंतरराष्ट्रीय खत्मे नबुवत चळवळ’ म्हणजे 'आंतरराष्ट्रीय शेवटचे प्रेषित चळवळ’ असा अर्थबोध स्पष्ट होतो.
 
 
खुलना जिल्ह्यात ८ ऑक्टोबर १९९९ यादिवशी शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान अहमदिया मशिदीत झालेल्या बॉम्बस्फ़ोटात ७ अहमदिया ठार झाले व बरेचजण कायमचे अपंग झाले पण कोणालाही अटक झाली नाही. ८ ऑक्टोबर १९९९ला शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर जमातेच्या स्थानिक नेत्याच्या नेतृत्वाखाली जमावाने जेशोर जिल्ह्यातील स्थानिक अहमदिया मशिदीचा इमाम शहा आलमच्या घरावर जाऊन त्याला त्याच्या श्रध्देचा त्याग करण्यास सांगितले व त्याने नकार देताच त्या नेत्याने व त्याच्या काही साथीदारांनी त्याच्या बायको व मुलीसमोर त्याच्यावर निर्दयपणे प्राणघातक हल्ला केला. चार तासांनी त्याचा मृत्यू झाला. १७ जून २००५ पर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. ८ जून २००४ला गृहमंत्र्यांनी अहमदियांच्या २० प्रकाशनांवर बंदी घातली. १२ डिसेंबर २००३ला ढाक्याला व २० एप्रिल २००५ला ज्योतिंद्रनगरला अहमदियाविरोधी रॅली काढण्यात आल्या होत्या. ३
 
शिया - 
 
ढाक्यातील ऐतिहासिक हुसैनी दलान या मुख्य शिया स्थानावर अशुरा मिरवणूकीसाठी २० हजार शिया मुस्लिम जमलेले असताना रात्री २ वाजता बॉंबस्फोट झाला. त्यात १ मृत व ८० जण जखमी झाले.४
 
उत्तर-पश्चिम भागातील शिया मशिदीवर संध्याकाळच्या प्रार्थनेच्यावेळी बंदूकधाऱ्याकडून गोळीबार करण्यात आला, त्यात एक मृत व ३ दुखापतग्रस्त झाले. इस्लामिक स्टेटशी संलग्न ट्विटर खात्यावर सांगण्यात आले की,"खलिफाच्या सैनिकांनी धर्मभ्रष्ट्यांच्या उपासनास्थानांना लक्ष्य केले आहे." पण सरकारने देशात इस्लामिक स्टेट क्रियाशील नाही असे सांगून स्थानिक मूलतत्व गट 'जमात-उल-मुजाहिदीन'ला उत्तरदायी धरलय.५
 
ब्लॉगर - 
 
 
 
स्रोत: Ansar-Al-Islam claims responsibility for Niladri murder, 7 Aug 2015, The Daily Star
लेखिका तस्लिमा नसरीनचे उदाहरण तर सर्वपरिचित आहे. त्यातून आता देशात वाढणारी असहिष्णूता, मूलतत्ववाद, दहशतवाद, अल्पसंख्यांकांचा छळ याविरुद्ध बांगलादेशातूनच आवाज उठवून लेखन करणाऱ्या सेक्युलर ब्लॉगरच्या हत्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. २०१५ला पहिल्या ८ महिन्यात ४ ब्लॉगरच्या हत्या करण्यात आल्या. फेब्रुवारीत बांगलादेशात जन्मलेला अमेरिकन लेखक-ब्लॉगर अवजित रॉयची ढाका विद्यापीठाच्या आवारात, मार्चमध्ये ब्लॉगर वशिउर रहमान बाबूची इस्लामविरोधी लिखाण केल्यामुळे ढाक्यात, मे महिन्यात अनंत बिजॉय दास ह्या ब्लॉगरची सिल्हेट शहरातील सुबीद बझार भागार तर ऑगस्टमध्ये निलॉय नील नावाने देशातील धार्मिक मूलतत्ववादाच्याविरोधी लिखाण करणाऱ्या निलॉय चट्टोपाध्याय ह्या ब्लॉगरची हत्या करण्यात आली.६ निलॉयची हत्या केल्यावर अन्सार-अल-आलम ह्या अल-कायद्याच्या स्थानिक शाखेचा प्रवक्ता म्हणवण्याऱ्या मुप्ती अब्दुल्लाह अश्रफने बांगलादेश माध्यमांना ई-मेल करून ह्या हत्येचे दायित्व स्वीकारले व ई-मेल संदेशात म्ह्ंटले की, ‘अल्लाह व त्यांच्या प्रेषितांचे शत्रू ज्याचे नाव निलॉय चौधरी नील आहे, त्यांना ठार मारण्याची मोहिम 'अन्सार-अल-आलमच्या मुजाहिदीनांनी हाती घेतली आहे.’७
 
 
संयुक्त राष्ट्र संघाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरील विशेष अहवाल, डेव्हीड काये व अतिरिक्त न्यायिक अंमलबजावणी ख्रिस्तोफर हेन्स ह्यांनी ब्लॉगरच्या हत्येचा निषेध करून देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून आरोपींना त्वरीत शोधून काढण्याची मागणी केली.८ धार्मिक मूलतत्ववाद व असहिष्णूतेच्याविरोधात ब्लॉगलेखनाच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्यांच्या हत्या चिंताजनक आहेत.
 
 
संदर्भ - 
 
१. All Party Parliamentary Group for British Hindus: The Persecution of Minorities (Hindu, Christian & Buddhist)
 
२. Karlekar, Hiranmay; Bangladesh: The Next Afghanistan?, Sage Pub, 2005, पृष्ठ २५८
 
३. Karlekar, Hiranmay; Bangladesh: The Next Afghanistan?, Sage Pub, 2005, पृष्ठ २५९, २६४, २८३
 
४. Dhaka blasts: One dead in attack on Shia Ashura ritual, 24 Oct 2015, bbc.com
 
५. Bangladesh Shia mosque attack 'carried out by Islamic State', 27 Nov 2015, bbc.com
 
६. Fourth secular Bangladesh blogger hacked to death, 8 Aug 2015, Al-jazeera
 
७. Ansar-Al-Islam claims responsibility for Niladri murder: 7 Aug 2015, The Daily Star
 
८. Fourth secular Bangladesh blogger hacked to death, 8 Aug 2015, Al-jazeera
 
- अक्षय जोग 
@@AUTHORINFO_V1@@