संधीच्या शोधात असलेल्या पुरुषांचा संधिविग्रह...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |
 

 
 
एकटी स्त्री म्हणजे पुरुषांना संधीच वाटत असते, हे आता जुने झालेले आहे. कुठलीही स्त्री संधीच वाटते अन् स्त्रीचं संधीत रूपांतर करण्याचा चोरटा प्रयत्न सतत सुरू असतो. असे वाटावे इतके हे वातावरण दुष्टावले आहे. रस्त्यावरून भरधाव जातानाही बाजूने जाताना कुठल्याही वयाची स्त्री दुचाकीवर असेल, तर बोचरे शब्दबाण मारले जातात. सिग्नलवरच्या थांब्याचा त्याच्याचसाठी उपयोग केला जातो. गर्दीत, सार्वजनिक कार्यक्रमांत, थिएटरमध्ये आपल्या बाजूला बसलेली स्त्रीदेखील संधीच वाटते... काही वेळासाठीच हा त्रास होत असल्याने स्त्रिया त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत अन् अशा प्रत्येक विनयभंगावर प्रतिक्रिया द्यायची ठरविली तर दर मिनिटाला एक राडा होईल... बरे, या सार्‍यांत त्या बाईचीच बदनामी होत असते. इतर बायकादेखील, ‘‘आम्हाला नाही बाई असे कुणी त्रास देत!’’ अशी शहाजोगी भूमिका घेतात. आवाज करणारी ही स्त्री एकटी पडते.
 
अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनने केलेल्या लैंगिक अत्याचारांविरोधात न्यायालयात जाणारी अभिनेत्री रोझ मॅक्गोवन आता तशीच एकटी पडली आहे. न्याय हवा असेल तर तो विकतच घ्यावा लागतो, हे जागतिक सत्य आहे, हे तिच्या प्रकरणावरून दिसून आले आहे. तिला आता खटला चालविण्यासाठी आणि तारीख पे तारीख करता करता तिची सर्व मालमत्ता विकून रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तिने पहिल्यांदा आवाज केला तेव्हा तिच्या सुरात सूर मिसळणार्‍या अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या अनेक अभिनेत्री आता शांत बसल्या आहेत. रोझ मॅक्गोवन या कायदेशीर लढ्यात सध्या एकटी पडली आहे. शेतात कापूस वेचायला जाणारी शेवंता असो, बांधकामावर अंगमेहनत करणारी रुख्साना असो, की बहुभाषी उच्चारण शब्दकोशाचं वेबबेस्ड टूल तयार करणार्‍या गूगलच्या तंत्रज्ञांच्या गटांमधील सामान्ता आइन्स्ली असो, सार्‍यांना हाच अनुभव येत असतो. एमआयटी या प्रतिष्ठित संस्थेत डॉक्टरेट करणार्‍या सामान्ताला तिथल्याच एका बड्या प्राध्यापक महाशयांनी ‘ऑफर’ दिली. ती तिने नाकारल्यावर, ती आपल्या ग्रेड वाढवण्यासाठी इतर प्राध्यापकांशी शरीरसंबंध ठेवते, असा आरोप केला... तक्रार करूनही फार काही झालं नाही. अखेर सामान्ताने पीएच. डी.चा नाद सोडला आणि गूगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून रुजू झाली. गेल्या वर्षी एका मल्याळी अभिनेत्रीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या सार्‍या नाट्याची चलचित्रफीतही तयार करण्यात आली. यामागे मल्याळम सुपरस्टार दिलीप सामील होता. साधारण अशा वेळी अभिनेत्री गप्प बसतात, मात्र ही अभिनेत्री पोलिसात गेली. आता या अभिनेत्रीच्या मागे मल्याळी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका उभ्या राहिल्या आहेत... हे सारं होऊनही ८० दिवस गजाआड असणारा सुपरस्टार जामिनावर बाहेर आला, तेव्हा त्याच्या चाहत्यांनी तरुंगाच्या गेटवरच त्याचं दबंग स्वागत केलं. त्याच्या चाहत्यांना त्याचा तो पुरुषार्थ वाटला. प्रतिमा डागाळेल म्हणून अनेक कामकरी महिला कामाच्या ठिकाणी झालेल्या असल्या आगळिकीबद्दल तक्रार करायला धजत नाहीत. द इंडियन नॅशनल बार असोसिएशननं एक पाहणी अभ्यास हाती घेतला होता. ४७ टक्के महिलांनी असं मत व्यक्त केलं.
 
आता यावर हमखास केला जाणारा युक्तिवाद हाच की, बायका काय कमी असतात! ...असे म्हणून मग बायकांच्या बदफैलीपणाचे अनेक किस्से ऐकीव सत्याचाही विपर्यास करीत सांगितले जातात. कास्टिंग काऊचचे प्रकरण निघाल्यावर आणि प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्येही असे शोषण होते, असे वक्तव्य केले, पण ते संभावित होते. त्यात नेमक्या लोकांची नावे घेतली नव्हती. हंसा वाडकर या जुन्या काळातील अभिनेत्रीने पुस्तकच लिहिण्याचे धाडस केले. महेश भट यांनी नेमकी हीच पुरुषी मखलाशी केली- ‘‘पुरुष शोषण करतातच, पण स्त्रियाही आता भोळसट राहिलेल्या नाहीत. स्त्रिया अत्यंत कावेबाज आणि षडयंत्री असतात. त्या स्वत:च स्वत:चं शरीर देऊ करतात. त्याला कोण काय करणार?’’ असा सवाल महेश भट यांनी केला. कंगना रानावत अलीकडे स्पष्ट बोलत असते, पण नेमकी नावे घेण्याचे तीही टाळते. ‘पानी मे रहकर मगरमच्छसें बैर क्यों?’ असा एकूण आव आहे. कुणीतरी ही सुरुवात करायची असते, मग सारे त्यात आपला सूर मिसळतात. पुढे कुणाला यायचं मात्र नसतं. अमेरिकेत कायद्याचं शिक्षण घेणार्‍या राया सरकार नावाच्या विद्यार्थिनीने फेसबुकवर आवाहन केलं होतं, जादवपूर विद्यापीठातले राज्यशास्त्राचे दोन प्राध्यापक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करतात. शैक्षणिक संस्थांत लैंगिक अत्याचार करणार्‍या प्राध्यापकांची नावं पाठवा... तिला उदंड प्रतिसाद मिळाला. अगदी गेल्या तीस-पस्तीस वर्षांत विद्यापीठांत लैंगिक शोषण करणार्‍या प्राध्यापकांची नावे समोर आली. हॉलिवूडमध्ये जसे समोर येऊन पुराव्यांसह आरोपच होत आहेत असे नाही, तर न्यायालयात दाददेखील मागितली जाते आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवने, असे बॉलिवूडमध्ये होईल की नाही हे सांगता येत नाही, असे एका मुलाखतीत व्यक्त केले.
 
रोझ मॅक्गोवन आता एकटी पडली आहे. ती तिचा लढा पूर्ण लढणारच आहे. एकुणातच, सावज आणि शिकारी हे नाते जागतिक आहे. सरकार नावाच्या त्या पोरीनं आवाहन केल्यावर स्त्री सत्त्वासाठी लढ्यात सामील असलेल्या काही प्राध्यापकांचीही नावे समोर आली. त्यांच्यासोबत काम करणार्‍या प्राध्यापिकांना हा धक्का होता. संभावित मुखवटे धारण करून संधीच्या शोधात असणार्‍या अनेकांचा असा संधिविग्रह होतच नाही. एक असेच छोटेसे उदाहरण... ती हसली तरीही तिचा तो होकारार्थी इशाराच आहे, असा सोयिस्कर समज करून घेतला जातो. पिंक नावाचा अमिताभ-तापसी पन्नूचा चित्रपट दोन वर्षांपूर्वी येऊन गेला. हेच सगळे सांगणारा चित्रपट होता तो. पुरुष आपला सार्वजनिक चेहरा अगदी पुण्यवंत संताचा ठेवतात, मात्र एकट्यात ते शिकारी होतात. अत्यंत सहज संधी साधण्याचा प्रयत्न करतात... एका आध्यात्मिक बाबाच्या भक्तांचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप होता. (म्हणजे अजूनही आहे.) त्यांचा दर महिन्याला होणारा सत्संग आणि मग ऑनलाईन चालणारा हा सत्संग... त्यात अनेक कुटुंबंही होती. त्यातल्या एका स्त्रीकडून चुकून एक अश्लील विनोद या ग्रुपवर पोस्ट झाला. आता स्त्रियांचेही व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप्स असतात आणि त्यांच्या एकान्तात त्या असल्या चर्चा करू शकतात. ती त्यांची खासगी बाब आहे. या ग्रुपवर तो विनोद पोस्ट झाल्यावर त्या स्त्रीने माफी मागितलीही, मात्र तोवर गदारोळ झाला होता. एकदम अपवित्र झाले होते. त्यांच्या ग्रुपचा प्रमुख कुणी भय्या, काका, मामा होता त्यानेही याची दखल घेतली. तिच्या पतीपर्यंत हे प्रकरण गेले. त्यांनी दोघांनीही क्षमायाचना केली. गादी चालविणार्‍या त्या भय्यांनी तिच्या पतीला सांगितले की, आपल्या बायकोचे मानसिक शुद्धीकरण करून घे... पण, अनेक भक्तांना त्या स्त्रीच्या पावित्र्यावर शंका होतीच, अखेर ती त्या ग्रुपमधून बाहेर पडली. पडावे लागले... गोष्ट इथून सुरू होते. काही दिवसांनी तिला त्याच ग्रुपवरच्या एका पुरुष भक्ताकडून मेसेज येऊ लागले- ‘‘मी एकटाच आहे...’’ त्याने बायकोला काडीमोड दिला होता. तो मुंबईला होता. त्याने तिला मुंबईला येऊन भेटण्याचे निमंत्रण दिले. आपली रीलेशनशीप छान होईल, असेही सूचित केले. सत्संगाच्या ग्रुपवर तिच्यामुळे अपवित्र वातावरण झाले, असा दांगडव करण्यात हेच महाशय आघाडीवर होते... ती अश्लीश विनोद पोस्ट करते म्हणजे चान्स आहे, असा मस्त समज त्याने करून घेतला. तिने पतीला ते दाखविले. प्रकरण पुन्हा भय्यांकडे गेले. भय्या म्हणाले, ‘‘तो प्रमुख भक्त आहे. एकटा आहे, आपण त्याला समजून घ्यायला हवे. हा त्याचा कृष्णभाव आहे...’’
 
 
स्त्री आणि पुरुष यांच्या लैंगिक भावना समाज कसा घेतो, हे सांगण्यासाठी आणखी काही सांगायला हवे का?
 
 
 
- श्याम पेठकर  
 
@@AUTHORINFO_V1@@