सायबर सुरक्षिततेबद्दल जनजागृतीसाठी माध्यमांचे सहकार्य हवे : रवींद्रकुमार सिंगल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |

पत्रकारांसाठी‘सायबर सुरक्षितता’ विषयावर कार्यशाळा

 
 
 
 
नाशिक : ’’माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ’सायबर सुरक्षितता’ हा विषय समाजातील सर्व घटकांसाठी महत्त्वाचा असून त्याबाबत अधिकाधिक जनजागृती होण्याच्या दृष्टीने माध्यमांचे सहकार्य महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
 
नाशिक पोलीस आयुक्तालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने पत्रकारांसाठी आयोजित ‘सायबर सुरक्षितता’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुटे, माहिती अधिकारी किरण वाघ तसेच पत्रकार, पत्रकारितेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
 
सिंगल म्हणाले, ’’सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॅापिंग, ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार होत आहेत. यासाठी स्मार्टफोन, संगणक या माध्यमांचा वापर होत आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, युवक हे याद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असताना ई-प्रणालीचा जबाबदारीपूर्वक उपयोग करणे गरजेचे आहे. या व्यवहारांमध्ये पुरेशी काळजी घेतली जात नाही, असे दिसून आले आहे. ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज असून नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे,’’ असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ’’ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याने नागरिक गुन्हे नोंदविण्यासाठी पुढे येतात. यासाठी विशेष सायबर पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून महिलांना त्रास देणार्‍या गुन्हेगारास सायबर शाखेने शोधून राजस्थानमधून अटक करण्यात आली, यामुळे पीडित महिलांना दिलासा मिळाला. नाशिक पोलीस आयुक्तालयाची कामगिरी चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर सुरक्षिततेबाबत होणारी कार्यशाळा हा चांगला उपक्रम असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहयोगाने जनजागृतीसाठी पुढेदेखील अशा कार्यशाळांचे आयोजन केले जाईल,’’ असे सिंघल म्हणाले.
 
याप्रसंगी भूषण देशमुख यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाईन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मोबाईलचा वापर करताना अनावश्यक अॅप डाऊनलोड करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, चांगल्या दर्जाची संरक्षण यंत्रणा राबवावी, संगणकावरील माहितीचे नियमित बॅक अप घ्यावे, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारी माहिती उपस्थितांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@