तपस्वी खासदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |
 

 
पालघर लोकसभेचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचे मंगळवारी नवी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून ‘आपला माणूस’ गेल्याची भावना सर्वच स्तरावर व्यक्त होत आहे. तेव्हा, चिंतामण वनगा यांचे सहकारी व भाजप प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी यांनी वनगांच्या व्यापक लोककार्याच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...
 
२४ तासांतले १८-२० तास काम करणे आणि तेही समाजासाठी, स्वत:साठी नव्हे म्हणजे आत्मसमर्पणच! वनगासाहेबांचे खासदार-आमदार म्हणून जे फिरणे ते म्हणजे एखाद्या तपस्वीसारखेच, असे म्हणता येईल. स्व. माधवराव काणे त्यांचे आदर्श होते.
 
ते तलासरी भागात राहायचे. पहाटे ५ वाजल्यापासून नडलेला-अडलेला, दारिद्य्राने पिचलेला आदिवासी बांधव रांगेत साहेबांना भेटायचा, साहेब त्यांचे दु:ख ऐकायचे. बहुधा सर्वच जुन्या ओळखीचेच असायचे आणि त्या गरिबांसाठी साहेब ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्याला घेऊन स्वतः जायचे. त्याचे काम करून द्यायचे.
 
तलासरीहून दीड तास वाहनाने ते वसईत यायचे. वसईत आमच्याबरोबर फिरताना ते दिवसभरात १५ ते २० ठिकाणी जायचे. दोन-तीन कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. जेवण घ्यायला त्यांना वेळच नसायचा. खासदारांनी जि. प. शाळेत जाऊन वह्यावाटप यासारख्या छोट्या कार्यक्रमात भाग घेऊ नये, असे काही जण त्यांना म्हणायचे. पण, साहेब कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही ठिकाणी जायचे. कार्यकर्त्यांच्या लग्नाला उपस्थित राहायचे. कुठल्याही स्पर्धेच्या बक्षीस समारंभात जायचे. ख्रिस्ती, मुस्लीम, हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, शीख वगैरेंच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. महापालिकेवरील पाणी मोर्चाला, वसई किल्ला समारंभाला, गणेशोत्सव, नवरात्र, माघी गणपती, कला-क्रीडा महोत्सवाला, बिशप हाऊसला नाताळनिमित्त दरवर्षी भेट द्यायचे. एकदा तर पूर्ण दिवस फिरल्यानंतर एक समाजसेवक त्यांना त्यांच्या वाडीतील १२ घरातील गणपतींच्या दर्शनासाठी रात्री १० नंतर घरोघर घेऊन गेला.
 
साहेबांच्या कारकिर्दीत भाजपमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. साहेबांनी ‘खासदार आपल्या भेटीला’, ‘रेल्वे प्रवासी परिषद’, रेल्वे स्टेशनला, एमएमआरडीएच्या कामांना भेटी, खासदार फंडातून केलेल्या कामाचे परीक्षण करायचे, दुसर्‍यांनी केलेल्या कामाचे कौतुक करायचे, आपण खासदार आहोत हेसुद्धा साहेब अनेक वेळा विसरलेले दिसायचे.
 
साहेबांनी तिसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर वसई तालुक्यात ११८ वेळा भेटी दिल्या. अतोनात कष्ट करणे, खडतर प्रवास करणे, सतत जनतेच्या भेटीगाठी घेणे, जनतेच्या कामासाठी शासकीय कार्यालयात जाणे, तहानभूक विसरणेच, पण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, अशा जीवनप्रवासामुळेच साहेबांना आपल्या सर्वांना सोडून लवकर जावे लागले. साहेबांचे पूर्ण घराणे साम्यवादी चळवळीत होते. साहेब ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजातले पहिले वकील, इंग्रजी विषय घेऊन त्यांनी बी.ए. केले. मुंबई कोर्टात वकिली केली. जव्हार-पालघर कोर्टात गरीब आदिवासींसाठी फुकट वकिली केली. तेव्हा त्यांना ’गरीबांचे वकील’ म्हणून संबोधले जायचे.
 
साहेब तीनवेळा खासदार व एकावेळा आमदार होते. त्यांची नम्रता त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जास्तच दिसली. घरची स्थिती अनेक वर्षे तशीच आहे. त्यांची पत्नी आजही बाजारात जाऊन भाजी विकते. साहेबांनी शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून चांगले उत्पन्न काढले. त्यांची मुले छोटा-छोटा व्यवसाय करतात. त्यांना खासदार म्हणून मिळणारे वेतन ते गोरगरिबांना वाटायचे. खासदार म्हणून त्यांनी कोणाकडे कंत्राट मिळविण्यासाठी शब्दही टाकला नाही. मोखाडा, जव्हार, वाडा, तलासरी, विक्रमगडसारख्या वनवासी भागात, पालघरसारख्या सागरी भागात व वसईसारख्या शहरी भागात ते नेहमी फिरत असायचे. कधीही कोणीही फोन करो, ते फोनवर बोलायचे, कंटाळा त्यांना माहीत नव्हता.
 
ठाणे जिल्हा विभाजनासाठी वनगासाहेबांनी धरणे, उपोषण, मोर्चा यासारखे संघर्ष केले व जिल्हा विभाजन करून घेतले. वनगासाहेब ठाणे जनता सहकारी बँक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व केशवसृष्टीसारख्या मोठ्या संस्थांमध्ये संचालक होते. भाजपचे तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे दोनवेळा ते अध्यक्ष होते व नरेंद्र मोदींबरोबर पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस होते. मुंबई विद्यापीठ सिनेटवर ते बिनविरोध निवडून आले होते.
 
आपल्या खासदारकीच्या मागील काळात त्यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना दोनवेळा मतदार संघात आणले आणि आता कॅथॉलिक बँकेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणायच्या प्रयत्नात होते.
 
वसईत निधन झालेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन ते कुटुंबाचे आवर्जून सांत्वन करायचे. आजारी व्यक्तीला तसेच हॉस्पिटलमधून घरी आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन भेटायचे. एके दिवशी तर आम्ही ११ जणांच्या घरी जाऊन आलो आणि आज...!
 
 
 
- शेखर धुरी 
 
@@AUTHORINFO_V1@@