‘आसियान’चे समूहगान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018   
Total Views |

भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या देशाच्या अध्यक्षांना प्रजासत्ताक दिनी जनपथावर होणार्‍या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा असली तरी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी इतिहास रचला गेला. इतिहासात पहिल्यांदाच आग्नेय आशियातील १० देशांच्या ‘आसियान’ गटाच्या सर्वच्या सर्व देशांच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आणि ते सर्वच्या सर्व उपस्थितही राहिले. गेल्या वर्षी ‘आसियान’च्या स्थापनेला ५० वर्षं पूर्ण झाली. उत्तर आणि पूर्वेला चीन, पश्चिमेकडे भारत, तर दक्षिणेला हिंद महासागर यांनी वेढलेल्या ‘आसियान’ देशांमध्ये आकार, लोकसंख्या, अर्थव्यवस्था, धर्म आणि शासन पद्धतींमध्ये कमालीचे वैविध्य आहे. नकाशावर ठिपक्यासारखे दिसणारे सिंगापूर आणि ब्रुनेई हे देश आहेत, तर दुसरीकडे ‘आसियान’च्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या असलेला इंडोनेशिया आहे. लोकसंख्येच्या बाबतीत इस्लाम, बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मप्रमुख असले तरी हिंदूंचीही संख्या अनेक ठिकाणी लक्षणीय आहे. कुठे राजेशाही आहे, कुठे लष्करशाही; कुठे साम्यवादी सत्तेत आहेत, तर कुठे लोकशाही. असे असूनही सुमारे ७० कोटी लोकसंख्या असलेला ‘आसियान’ हा जगातील सर्वात प्रभावशाली आर्थिक आणि व्यापारी समूहांपैकी एक आहे. हजारो वर्षांपासून या भागाचे भारताशी जमीन तसेच सागरी मार्गांनी संबंध आहेत. इस्लामआणि ख्रिस्ती धर्माचे आगमन होण्यापूर्वी या संपूर्ण भागावर हिंदू आणि बौद्ध धर्मांचा प्रभाव होता. आज वेगवेगळे धर्म असले तरी अनेक देशांमध्ये रामायणाकडे सांस्कृतिक वारसा म्हणून बघितले जाते. दुसर्‍या महायुद्धात सुमारे २५ लाख भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढले. आजच्या म्यानमार (बर्मा), मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियातील लढायांत या सैनिकांनी दोस्त राष्ट्रांच्या विजयात मोठी भूमिका बजावली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातून तसेच लोकशाही व्यवस्थेतून अनेक ‘आसियान’ देशांनी प्रेरणा घेतली. अलिप्त राष्ट्र चळवळीतही या देशांनी हिरीरीने सहभाग घेतला असला तरी काही वर्षांतच एकीकडे साम्यवादी रशिया आणि चीन, तर दुसरीकडे अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांतील शीतयुद्धाचे रणक्षेत्र झाले. व्हिएतनामयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि खासकरून सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर ‘आसियान’ देशांनी एकत्र येऊन कोणत्याही मोठ्या संघर्षाशिवाय जी प्रगती साधली ती थक्क करणारी आहे. नेहरूंनंतर दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा परराष्ट्र धोरणात असलेला मर्यादित रस आणि त्यांनी रशिया तसेच पाश्चिमात्त्य देशांना दिलेले प्राधान्य, यामुळे भारताचे ‘आसियान’ देशांकडे दुर्लक्ष झाले. सुरुवातीला अमेरिका आणि जपान आणि १९८०च्या दशकापासून चीनने या देशांशी व्यापार आणि गुंतवणुकीद्वारे संबंध दृढ केले. जेव्हा हे देश झपाट्याने आर्थिक प्रगती करू लागले, तेव्हाच भारताचे त्यांच्याकडे लक्ष गेले. १९९३ साली ’लुक ईस्ट धोरण’ आकारास आले. त्या घटनेला २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. आज आग्नेय आशियात एका नवीन शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे. चीनचा विस्तारवाद हा सगळ्यांच्याच गळ्यातला काटा झाला आहे, जो बाहेरही निघत नाही आणि आतही जात नाही. चीनने दक्षिण चीन समुद्रातील उथळ भागांत तसेच प्रवाळ द्वीपांवर भराव घालून कृत्रिमबेटे तयार करणे, त्या बेटांवर व्यापार तसेच नौदलाच्या दृष्टीने सुयोग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे, निर्मनुष्य बेटे ताब्यात घेऊन आपली मुख्य भूमी आणि या बेटांमधील हजारो चौ. मैल सागरी क्षेत्रावर मत्स्यसंपदा व उत्खननाच्या दृष्टीने स्वतःचा ऐतिहासिक दावा सांगणे यामुळे चीनचे व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्सशी तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षकाळात अमेरिका आत्ममग्न झाल्यामुळे चीनच्या विस्तारवादाला उत्तर कोण देणार हा प्रश्न आहे. आसियान देशांशी चीनचा मोठ्या प्रमाणावर व्यापार व गुंतवणूक आहे. आजवर या देशांनी भारताकडून व्यापारी सहकार्य व संरक्षणाच्या बाबतीत ठेवलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यात आपण कमी पडलो. नरेंद्र मोदींंच्या कार्यकाळात भारताच्या आग्नेय आशियाविषयक धोरणाने कात टाकली असून ’लुक ईस्ट’ धोरणाची जागा ’ऍक्ट ईस्ट’ने घेतली आहे. पंतप्रधानांनी एखाद-दोन देशांचा अपवाद वगळता सर्व आसियान देशांना भेटी दिल्या असून द्विपक्षीय संबंधांत सागरी व्यापार, हवाई मार्गांनी जोडणी, पायाभूत सुविधा विकास तसेच संरक्षण क्षेत्रातील संबंधांना महत्त्व दिले आहे.

गेल्या वर्षअखेरीस फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे झालेल्या आसियान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. परिषदेच्या व्यासपीठावर अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा चार देशांच्या गटाने तब्बल एका दशकाच्या अवधीनंतर चर्चा केली. चर्चेचा रोख अर्थातच चीनच्या सागरी विस्तारवादाकडे होता. या वेळेस प्रथमच अमेरिकेचे अध्यक्ष यांनी आग्नेय आशियाचा उल्लेख ज्याला पूर्वी एशिया पॅसिफिक म्हटले जायचे ’इंडो-पॅसिफिक’ असा करून भारताचा या भागावर असलेला प्रभाव मान्य केला. याच दौर्‍यात २६ जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे मोदींचे आमंत्रण आसियान देशांच्या नेत्यांनी स्वीकारले. आसियान नेत्यांच्या सामूहिक भारतभेटीने भारत आणि आसियानमधील संबंधांचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. असे असले तरी आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन चालणार नाही. सध्या भारत आणि आसियानमधील वार्षिक व्यापार सुमारे ७६ अब्ज डॉलर असला तरी चीनचा आसियानशी असलेला व्यापार आपल्या सातपट जास्त आहे. एवढेच कशाला दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलियाचाही आसियानशी असलेला व्यापार भारताहून अधिक आहे. आसियानशी होऊ घातलेला मुक्त व्यापार कराराचे घोंगडे अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. भारताला आसियानमार्गे चिनी माल आपल्या येथे ओतला जाण्याची भीती आहे तर आसियान देशांना भारतातील उच्चशिक्षित तरुण आणि कामगार तेथील लोकांच्या नोकर्‍या हिसकावतील, अशी भीती आहे. आसियानमधील बँकॉक, सिंगापूर, कौलालंपूर इ. शहरांशी भारतातून हवाईमार्गे चांगली जोडणी तयार झाली असली तरी मेकॉंग पट्यातील म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनामया देशांशी किफायतशीर दरांत जोडणारी हवाईसेवा नाही. या पट्ट्याला भूमार्गाने जोडणारे आशियाई महामार्ग, दिल्ली-व्हिएतनामरेल्वे, कालादान बहुमार्गी वाहतूक प्रकल्प गेली अनेक वर्षं लाल फितशाहीमुळे रखडले आहेत. २०१५-१६ पासून दिल्लीपासून थेट कंबोडिया आणि व्हिएतनामपर्यंत रस्तामार्गे जाणे शक्य झाले असले तरी प्रवासाचा वेळ आणि दगदग वाचविण्यासाठी आवश्यक असलेला महामार्ग, जो २०१६ पूर्वी पूर्ण होणार होता, तयार होण्यासाठी २०२० साल उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे. भारताने या प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली असून पूर्वांचलाच्या विकासाला आसियान देशांच्या आर्थिक विकासाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यात आपली स्पर्धा चीनशी आहे, हे विसरता कामा नये. हे अडथळे पार केल्यास आसियानशी असलेल्या संबंधांत वृद्धीसाठी आकाश ठेंगणे आहे. या देशांच्या आर्थिक विकासातून भारत बरेच काही शिकू शकतो आणि भारताच्या आर्थिक विकासात त्यांना सहभागी करून घेऊ शकतो. भारत आणि आसियान यांच्यातील समूहगानाची सुरुवात तर चांगली झाली आहे. ही मैफल उत्तरोत्तर अधिक रंगत जाईल, असे वाटते.
 
 
- अनय जोगळेकर
 
@@AUTHORINFO_V1@@