प्राचीन संस्कृतींमधील स्त्रैण दिव्यत्वाचा वेध...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |

 
इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज (आयसीसीएस)चे त्रैवार्षिक संमेलन १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत होत आहे. यात जगभरातील, आजही अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन परंपरांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाची या वर्षीची संकल्पना अतिशय लक्षवेधक किंवा भृकुटी उंचावणारी आहे. २० वर्षांपूर्वी नागपुरात स्थापन झालेल्या आयसीसीएस या संस्थेने, आतापर्यंत जगातील विविध प्राचीन संस्कृतींच्या विद्यमान लोकांशी संपर्क साधण्यात चांगलेच यश प्राप्त केले आहे. या दरम्यान, जगाला फारशा परिचित नसणार्‍या तसेच मीडिया अथवा सोशल मीडियामध्ये सामान्यत: कधीही न आलेल्या या संस्कृतीच्या लोकांशी आयसीसीएसने संवाद-सेतू प्रस्थापित केला आहे.
 
‘प्राचीन संस्कृतींमधील दिव्यत्वाचा स्त्रैण (फेमिनाईन) भावातून शोध’ ही या संमेलनाची संकल्पना आहे. ही संकल्पना, बदलत्या काळाशी तसेच स्त्रैण चळवळींच्या उठणार्‍या आवाजाशी झगडत असलेल्या आजच्या समाजाची भृकुटी उंचावणारी आहे. काळ कसा वर्तुळाकाराने बदलत आहे, हे बघणे चित्तवेधक आहे. एक काळ असा होता, जेव्हा स्त्रैण देवता अंधकाराशी जोडल्या गेल्या होत्या; परंतु आता मात्र त्या पुन्हा बदलत्या काळासोबत उदयमान होत आहेत.
 
ईश्वरत्व किंवा दिव्यत्व, पुरुषी अथवा स्त्रैण, विविध अवतारात प्रकट होत असते, यात आम्हा भारतातील हिंदूंना कधीच वावगे वाटले नाही. दिव्यत्व अथवा ईश्वरत्व हे सर्वव्यापी, सर्वशक्तिमान असते, या भावनेतून आम्ही या सर्व अवतारांना पूजत आलो आहे. परंतु, जगातील अनेक संस्कृतींमध्ये अथवा नव-संप्रदायांमध्ये ‘ईश्वर’ हा केवळ पुरुषीच असतो, दुसरा नाही, असेच मानले जाते. प्राचीन काळातील स्त्रैण देवतांबाबत लिहीत असलेल्या पाश्चात्त्य जगातील आधुनिक विचारवंतांची ही शोकांतिका आहे की, ते असे ठामपणे मानून चालतात की, प्राचीन संस्कृतींमध्ये दिव्यत्व किंवा ईश्वरत्व हे स्त्रैण होते, परंतु ते आता पुरुषी झाले आहे. म्हणजे ईश्वरत्व हे एकतर स्त्रैण असते किंवा पुरुषी असते, असा त्यांचा तर्क आहे. परंतु, हिंदू पूजत असलेली अर्धनारीनटेश्वराची संकल्पना, (ईश्वरत्व हे एकाच वेळी स्त्रैण व पुरुषी असते) मानवी समाजाच्या पर्यावरणाला संतुलित करणारी आहे. हे खरे आहे की, पश्चिमेकडील काही प्राचीन संस्कृतींमध्ये ही संकल्पना आहे; परंतु सर्वांमध्ये नाही आणि आपल्याला त्यातील सकारात्मक आचरणाकडे बघावे लागेल.
 
प्राचीन संस्कृतींमधील, अतिशय प्रसिद्ध आणि शक्तिशाली स्त्रैण देवतांचा विचार आपल्या मनामध्ये येतो तेव्हा, या देवतांचे शौर्य, शक्ती, चातुर्य, ज्ञान, ऐश्वर्य, आरोग्य, मातृत्वाची भावना, पावित्र्य, नीती, सतीत्व, एकात्मता इत्यादी गुण आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. आम्हा हिंदूंना शक्तीच्या अवतारांचा चांगलाच परिचय आहे. एवढेच नाही, तर विविध स्त्रैण देवतांची स्तुती करणारी अनेक स्तोत्रे आमच्या परिचयाची आहेत. त्याचे अधिक स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. देशभरातील ५२ शक्तिपीठे, देवी आणि देवींच्या विविध रूपांचे महत्त्व अधोरेखित करणारी अत्यंत प्रभावी अशी बाब आहे. ही बाब, पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील शाक्त पंथीयांच्या धार्मिक आचरणाने अधिकच स्पष्ट होते. भारतातील अत्यंत महत्त्वाचे विजयादशमी किंवा दीपावलीसारखे सण, हे संतुलन साधणारे आहेत. स्त्रैण आणि पुरुषी देवतांना एकत्र किंवा सलगपणे पूजणारे आहेत. त्यामुळे आपल्या समाजात स्थिरता प्रदान झाली आहे.
 
आदी प्रेषित अब्राहमच्या आगमनामुळे पश्चिम आशिया आणि अरब देशांमधील धार्मिक चित्र बदलून गेले. अब्राहमच्या आगमनापूर्वी या प्रदेशांत स्त्रैण देवतांची पूजा प्रचलित होती. पुरुषसत्ताक पद्धतीच्या प्रभावानंतर काळाच्या ओघात या स्त्रैण देवता मागे पडत गेल्या. ग्रीस, इजिप्त, सुमेर, बॅबिलोन, मेसोपोटॅमिया आणि अगदी कॅनान (पॅलेस्टाईन)मध्येही देवतांची स्त्रैण रूपे सर्वदूर प्रचलित होती. या प्रदेशात स्त्रैण देवतांचे सर्वदूर प्रचलन होते ही बाब, दुसर्‍या महायुद्धानंतर उत्खननातून जे पुरावे प्राप्त झाले, त्यातून सिद्ध झाली आहे. या भागातील काही संस्कृती असे मानीत असत की, सृष्टीची निर्माता ही एक स्त्रैण देवताच होती.
 
पौर्वात्य आणि पाश्चात्त्य संस्कृतीत प्राचीन काळापासून स्त्रैण देवतांचे पूजन प्रचलित होते. वैदिक काळापासून, हिंदूंच्या संबंधित सर्व प्रकारच्या समाजांमध्ये नारीपूजन सर्वच ठिकाणी बघायला मिळते. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्येही स्त्रैण देवतांचे महत्त्व, त्यांचे भक्त, पूजनाची पद्धती होत्या, हे आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘आम्हीच फक्त या विशिष्ट गोष्टी करतो, अन्य कुणीही नाही’ ही अज्ञानमूलक दर्पोक्ती, आजच्या आधुनिक जगात आम्हाला मदत करण्याऐवजी, अधिक नुकसान करणारीच आहे. वर उल्लेख केलेल्या, जगभरातील स्त्रैण देवतांना एकत्र केले, तर मानवी समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी, त्या संपूर्ण मानवी मन-बुद्धीला व्यापून टाकणार्‍या आहेत. प्राचीन संस्कृतीत स्त्रैण देवतांचा इतका जबरदस्त प्रभाव होता हे मान्य करावे लागते.
 
या संदर्भात सर्व जगात विशेषत्वाने प्रसिद्ध असलेल्या काही स्त्रैण देवतांचा विचार करू या. चातुर्य, ज्ञान, संगीत आणि भाषेची देवता म्हणून सरस्वतीची पूजा करणार्‍या हिंदू समाजासारखाच उत्तर गोलार्धातील ब्रिगिट हा एक समाज आहे. त्याचप्रमाणे घुबड वाहन असलेली अथेना ही ग्रीक देवता चातुर्याची देवता म्हणून समजली जाते. अथेना ही ग्रीक शहर अथेन्सची संरक्षक देवता मानली जाते आणि युद्ध व प्रशासकीय समस्यांच्या वेळी तिचे आवाहन करण्यात येत असे. तारा ही ‘मुक्ततेची माता’ आणि यश तसेच उपलब्धी या गुणांचे प्रतीक समजली जाते. इजिप्तची युद्धाची देवता- ‘बास्तेत’ उग्र रूपातील संरक्षक आहे आणि ती मांजरीच्या रूपात बघितली जाते. हिंदू धर्मानुसार, या सर्व विश्वाच्या मुळाशी ‘शक्ती’ आहे आणि तिच्यापासूनच सर्व अस्तित्व निर्माण झाले आहे, असे समजले जाते. जणूकाही ही शक्ती, सर्व प्रकारच्या परंपरांमधील पृथ्वीमाताच आहे. परंतु, बर्‍याच ठिकाणी तिला दैवी स्त्री न समजता, उत्साहाचा स्रोत मानले आहे. हिंदू परंपरेत, स्त्रीला शक्तीचे प्रकटीकरण मानले आहे आणि तिच्याकडे उत्पत्ती आणि विनाशाची शक्ती असते. अ‍ॅण्डियन समाजात पंचमामा हिला पृथ्वीवरील देवतांची माता समजतात. ग्रीक देवता गाईआप्रमाणे, ती पोषण व समृद्धीची देवता आहे, तसेच उत्पन्न झालेले सर्वकाही तिच्या प्रभावाखाली असतात.
 
 
या जगावर कृपाछत्र धरणार्‍या जितक्या काही स्त्रैण देवता आहेत, त्यांच्यात एक साधर्म्य असल्याचे लक्षात येईल. त्यामुळे स्त्रैण शक्तीची उपासना, बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत आढळून येईल आणि ‘माता भूमि:, पुत्रोऽहंपृथिव्याम्’ (ही भूमी माता असून आम्ही सर्व तिचे वंशज आहोत) ही भावना, पृथ्वीला माता मानणार्‍या सर्व मानवी समाजाला जोडणारे सूत्र ठरले आहे.
 
 
 
- श्याम परांडे 
 
@@AUTHORINFO_V1@@