चंदन गुप्ता प्रकरणी मौन का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |

 
 
कासगंजमधील घटनेनंतर कोणीही मानवाधिकारवाले, धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी, राजकारणी मंडळी तिथे जायला वा त्यावर बोलायलाही तयार नाहीत. चंदनच्या कुटुंबीयांच्या भावना समजून घेण्याची, त्यांना धीर देण्याची या लोकांना गरज वाटत नाही का? की तो हिंदू असल्याने आपला त्याच्या घरातील सदस्यांशी, नातलगांशी काहीच संबंध नसल्याचे या लोकांना वाटते? हिंसाचारात मृत पावलेला तरुण देशाचा राष्ट्रध्वज फडकाविणार्‍या यात्रेत सामील झाला होता, पण तरीही तो कोणाला आपला वाटत नाही का? की सर्व काही मृताच्या जात आणि धर्मावरच ठरते?
’हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लावण्यास नकार दिल्याने चंदन गुप्ता नामक २२ वर्षीय तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली. अभाविप, विहिंपसह राष्ट्रवादी विचारांच्या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशातील कासगंज येथे तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. ही यात्रा मुस्लीममोहल्ल्यातून जात असताना या यात्रेवर जोरदार दगडफेक-गोळीबार-जाळपोळ करण्यात आली. समाजकंटकांनी केलेल्या या हल्ल्यानेच चंदन गुप्ताचा जीव घेतला. त्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून कासगंजमधील प्रकाराबद्दल निरनिराळ्या बातम्या येतच राहिल्या. पोलिसांनी या हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या संशयितांना पकडल्याची, मुख्य आरोपी शकीलच्या घरातून देशी बॉम्ब आणि पिस्तुल जप्त केल्याची आणि अन्यही काही माहिती वेळोवेळी समोर आली. ही घटना ज्यांनी ज्यांनी जनतेसमोर आणली, त्यांनी त्यांनी आजपर्यंत या घटनेत नेमके कोण सामील आहेत हे काही उघड केले नाही. या लोकांना ’पद्मावत’ चित्रपटाला विरोध करणार्‍यांची राजपूत जात दिसते, महाराष्ट्रातील भिमा-कोरेगावचा हिंसाचार दलित-हिंदू, दलित-ब्राह्मण, दलित-मराठा संघर्ष वाटतो आणि तो तसा दाखवलाही जातो. पण, कासगंजमध्ये तिरंगा यात्रेवर नेमका कोणी हल्ला केला, हे काही या लोकांना सांगावेसे वाटत नाही.
हिंसाचाराच्या घटना घडल्या की अफवांचे पीकही जोरात येते. भिमा-कोरेगाव घटनेबाबतही अफवा चांगल्याच पसरवल्या गेल्या. कासगंजमधील घटनेनंतरही तसेच झाले. राहुल उपाध्याय या आणखी एका तरुणाचा या दगडफेकीत मृत्यू झाल्याची अफवा यापैकीच एक. हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या, भावना भडकावणार्‍या अफवा पसरायला नको आणि त्यावर जागरुक नागरिकच उपाय काढू शकतात, हेही बरोबरच. पण, कासगंज घटनेमुळे काही प्रश्नही निर्माण झाले, ज्यांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा यात्रेवर हल्ला करण्याची कोणाची हिंमत होतेच कशी? ‘पाकिस्तान जिंदाबाद बोला नाही तर तुमचा चंदन गुप्ता होईल,’ असे मानायचे का? हिंसाचाराच्या या प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे? हे नेमके कशासाठी सुरू आहे? हे त्यातलेच काही प्रश्न.
१९४७ साली मोहम्मद अली जिनांमुळे ’पाकिस्तान’ नावाचा देश अस्तित्वात आला. पण, गेल्या कित्येक वर्षांत भारतात जी जी सरकारे सत्तेवर आली त्यांनी त्यांनी मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी जे लांगुनचालन केले त्यामुळे भारतातल्या प्रत्येक शहरात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रातही अशा प्रकारची पुष्कळ उदाहरणे दाखवता येतील. त्यामुळे भारतातल्या पाकिस्तानप्रेमी जमातीकडूनच तिरंगा यात्रेवर हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याचे कोणीही मान्य करेल. आता सरकार आणि पोलीस प्रशासनाने यात सामील असलेल्या देशविरोधी लोकांना हुडकून काढून, त्यांच्या पाठीराख्यांना बेड्या ठोकून लवकरात लवकर गजाआड करायला हवे, तरच ही पाकिस्तानप्रेमाची विषवल्ली थांबेल; अन्यथा या मूठभर समाजकंटकांमुळे संपूर्ण मुस्लीमसमाजाची तर बदनामी होईलच, पण समाजाच्या एकतेवरही त्याचा विपरित परिणामहोईल, जे देशहितासाठी योग्य ठरणार नाही.
कासगंज घटनेनंतर प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, देशातील पुरोगामी, बुद्धीजीवी, विचारवंत म्हणवल्या जाणार्‍या लोकांचे सोयीस्कर मौन. देशविरोधी हिंसक जमावाने चंदन गुप्ताचा बळी घेतल्यानंतर ही तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळी आपापल्या बिळात लपून बसली आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत गोरक्षकांनी हल्ला केल्याचे, हिंसाचार माजवल्याचे घसा फाटेस्तोवर केकाटून सांगणारे हे ढोंगबाजआता मात्र तोंडातून एक शब्दही काढायला तयार नाहीत. मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी ‘पुरस्कारवापसी’चा तमाशा रंगविणार्‍यांच्या भावनाही आता बोथट झाल्यात. ज्यांची बाजू घेतल्याने आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजता येतील, त्यांचीच बाजू घ्यायची, हे या लोकांना चांगले कळते. त्यामुळेच कासगंज घटनेतील मृत तरुणाचा धर्म ‘हिंदू’ असल्याने या लोकांनी तोंडाला कुलूप लावल्याचे कोणीही सांगेल. सहिष्णुता, मानवाधिकाराचे नाव घेत लोकभावनेशी खेळणार्‍या या गणंगांच्या मनाला कदाचित अन्य धर्मीयांच्या मृत्यूनंतरच धुमारे फुटत असावेत.
मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची पद्धत देशाच्या राजकारणात कित्येक वर्षांपासून चालू आहे. एखाद्या घटनेत आपल्या आवडत्या धर्मातील कोण्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, हे लोणी खाणारे बोके लगेच त्यावर तुटून पडतात. घटना घडली की, त्या ठिकाणी जाण्याची या लोकांमध्ये अहमहमिका लागते. नेते मंडळींच्या कार्यकर्त्यांकडून राजकारण्यांच्या भेटीगाठी, दौरे आयोजित केले जातात. यातून आपला फायदा कसा होईल, आपल्या झोळीत मतांची भीक कशी पडेल हे प्रत्येकजण पाहतो आणि त्यानुसारच वर्तन करतो. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही आपापल्या तुंबड्या भरण्यासाठी त्या ठिकाणी लगोलग हजर होतात, पण कासगंजमधील घटनेनंतर कोणीही मानवाधिकारवाले, धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी, राजकारणी मंडळी तिथे जायला वा त्यावर बोलायलाही तयार नाहीत. चंदनच्या कुटुंबीयांच्या भावना समजून घेण्याची, त्यांना धीर देण्याची या लोकांना गरज वाटत नाही का? की तो हिंदू असल्याने आपला त्याच्या घरातील सदस्यांशी, नातलगांशी काहीच संबंध नसल्याचे या लोकांना वाटते? हिंसाचारात मृत पावलेला तरुण देशाचा राष्ट्रध्वज फडकाविणार्‍या यात्रेत सामील झाला होता, पण तरीही तो कोणाला आपला वाटत नाही का? की सर्व काही मृताच्या जात आणि धर्मावरच ठरते? ही घटना खरेतर दुर्दैवीच. पण, ज्यांनी अशा प्रकारानंतर संवेदना व्यक्त करायला हव्यात तेच आज परांगदा झाल्याचे दिसते. कालपरवापर्यंत लोकशाही, मानवाधिकारांवर गदा आल्याचे छाती पिटत सांगणारे लोकही आज मातीत चोच खुपसून बसलेत. या लोकांच्या अशा भूमिकांमुळेच ही मंडळी आज देशात हास्यास्पद ठरत आहेत, हेही या लोकांना कळत नाही. शिवाय आपापल्या कंपूत चकाट्या पिटत वावरणार्‍या या लोकांचे जनमानसातील स्थानही ढासळले असून यांच्याप्रति आदराची भावनाही लोप पावली आहे. पण, या लोकांना त्याचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. यातून या लोकांचाच विनाश होईल, हेही खरेच.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@