थंडीमुळे द्राक्षबागा संकटात ; द्राक्षांचा आकारही राहणार कमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : अवकाळी पावसाने काही भागांतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असतानाच, थंडीचा कडाका वाढून तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने द्राक्षबागा संकटात आहेत. थंडीमुळे काढणीला आलेल्या बागांमध्ये साखरभरणीला उशीर होत आहे. द्राक्षांचा आकारही कमी राहण्याचा धोका निर्माण झाल्याने भाव पडण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना सतावत आहे.
 
बेमोसमी पावसानंतर ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना वाचविण्यासाठी कीटकनाशकांवर मोठा खर्च झाला. आता थंडीमुळे मणी तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. काढणीला आलेल्या मालाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी दिवसा उष्मा, तर रात्री काहीसे थंड वातावरण याचा फटका द्राक्षांना बसला. ढगाळ वातावरणामुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमण्यांवर भुरी येणे, तसेच डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला होता. हे संकट टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, आता नैसर्गिक संकटांमुळे द्राक्षांना अपेक्षित भाव न मिळाल्यास शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होईल.
 
दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असल्याने, द्राक्षाच्या रंगावरही परिणाम होत आहे. तो अधिक वेळ टिकत नाही. द्राक्षांमध्ये साखर भरण्याची प्रक्रिया अत्यल्प गतीने होत आहे. मण्यांचा आकार वाढण्यासाठीही प्रतिकूल वातावरण असल्याने काढणी लांबण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ संचालक मदन पिंगळे यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@