स्वच्छतेचा अग्रदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018   
Total Views |

परिस्थिती माणसाला हतबल करते. या परिस्थितीशी बर्‍याच जणांना दोन हात करता येत नाही. पण, फार थोडे असतात, जे परिस्थितीतून मार्ग काढत समाजालाही पुढे नेतात. काश्मीरमधला बिलाल त्यापैकीच एक. काश्मीर हे भारतातील स्वर्ग, नंदनवन. या नंदनवनाला दहशतवादाचा शाप आहे, तसाच प्रदूषणाचाही शाप लागला आहे. हे प्रदूषण कमी करण्यास बिलाल या तरुणाने हातभार लावला आहे. कचरावेचक बिलाल सध्या श्रीनगर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी आहे. बिलाल सहावीत असताना त्याचे वडील कर्करोगाने निर्वतले. दोन बहिणी आणि आई असा बिलालचा कुटुंब परिवार. वडिलांनी जे पैसे मृत्युपूर्वी ठेवले तेही लवकरच संपले. बिलाल जेव्हा सातवीत गेला, तेव्हा त्याने आपल्या आईकडे शाळेचे शुल्क मागितले. आईकडे त्याला द्यायला पैसे नव्हते. हतबल ती हुंदके देऊन रडू लागली. या घटनेचा मोठा परिणामबिलालच्या मनावर झाला आणि मग शिक्षण सोडून पैसे कमविण्याचा निर्धार त्याने केला. एका हॉटेलात त्याला नोकरीही मिळाली. पण, तिथल्या एका यात्रेकरू ग्राहकाने कायद्यानुसार बालकामगार ठेवणे हा गुन्हा असल्याचे सांगत हॉटेल मालकाला तंबी दिली. परिणामी, बिलालला नोकरी गमवावी लागली. एका गॅरेजमध्येही त्याने कामकेले. पण, त्याला हवे तसे पैसे मिळत नव्हते. घरात शेवटी रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. एकामागून एक बिलालवर संकटं कोसळत होती. पण त्या संकटांसमोर बिलालने कच खाल्ली नाही. त्याने कमाईचा दुसरा मार्ग चोखाळला आणि बिलाल प्लास्टिक गोळा करण्याच्या उद्योगाकडे वळला.


उत्तर काश्मीरमधल्या बंदीपोरा जिल्ह्यात वुलर नामक एक तलाव आहे. हा कोणे एके काळी २७३ कि.मी. विस्तीर्ण पसरलेला तलाव आता प्रदूषणामुळे जेमतेम ७२ कि.मी. मध्ये उरला आहे. या तलावातून बिलालने कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने प्लास्टिकचा समावेश होता. हे प्लास्टिक विकून बिलालला दिवसाला कसेबसे दोनशे-अडीचशे रुपये मिळू लागले. ‘‘या पैशांमुळे आमचा खाण्याचा प्रश्न तर मिटलाच आणि माझ्या बहिणींच्या लग्नासाठीही पैसे जमा करण्यास मदत झाली,’’ असे बिलाल म्हणतो. पण, केवळ तलावातून कचरा वेचून पैसे मिळवणे हा बिलालचा एकमेव उद्देश नव्हता. या तलावातील पाणी बिलालचे कुटुंबीयही वापरायचे. त्यामुळे या तलावात साचणारा कचरा बिलालला खेदजनक वाटायचा. या तलावातील प्रदूषण असेच राहिले, तर पुढच्या पिढीला हा अनमोल ठेवा देण्यासाठी उरणार नाही, हे बिलालच्या लक्षात आले. याचा दुसरा फायदा असा झाला की, यामुळे हा तलाव स्वच्छ होण्यास मदत झाली. बिलालने वर्षाला सरासरी १२०० किलो कचरा या तलावातून काढला, असे म्हटले जाते. बिलालची ही कथा अज्ञातच होती, ती प्रकाशात आली ती काश्मीरमधील स्थानिक चित्रपटनिर्माते जलाल बाबा यांच्यामुळे. जलाल बाबा यांनी बिलालच्या आयुष्यावर एक लघुचित्रपटाची निर्मिती केली. ती वार्‍यासारखी पसरली आणि बिलालचे कार्य लोकांपर्यंत पोहोचले. त्याचे हे कामपाहून श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त शफाकत खान यांनी बिलालची ’स्वच्छ भारत अभियाना’च्या ब्रॅण्ड ऍम्बेसडरपदी निवड केली. त्यासाठी त्याला खास गणवेश आणि एक गाडी देण्यात आली. ठिकठिकाणी फिरून आपली कथा लोकांना सांगायची आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्याचे कामसध्या बिलालकडे आहे. बिलाल स्वच्छतेसाठी ‘रोल मॉडेल’ ठरेल, असा विश्वास श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त खान यांनी व्यक्त केला. खरं तर असे बिलाल प्रत्येक शहरात राहतात. जे उदारनिर्वाहासाठी प्लास्टिक जमा करतात. हे छोटे छोटे बिलाल ‘स्वच्छतेचे अग्रदूत’च म्हणायला हवे. त्यांचेही भाग्य या बिलालसारखे लवकरच उजळावे, ही सदिच्छा!
 
- तुषार ओव्हाळ 
@@AUTHORINFO_V1@@