मुंबई-ठाणे वगळता 'महाराष्ट्र बंद'ला राज्यात थंड प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

काही ठिकाणी बंदला हिंसक वळण, राज्यभर तणाव कायम

 



ठाणे :
भीमाकोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी निघालेल्या जमावावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला मुंबई ठाणे वगळता संपूर्ण राज्यात थंड प्रतिसाद मिळात आहे. मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव मात्र राज्यभर कायम आहे.

 
मुंबई आणि ठाण्यामध्ये या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी लोकल रेल्वेच्या फेऱ्या दलित संघटनांकडून अडवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक बसेस देखील वाटेत अडवून त्यांच्या चाकांमधील हवा सोडून देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. ठिकठिकाणी दलित संघटनांकडून होत असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये ४ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे.



मुंबईमध्ये देखील या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येत आहे. मुंबईतील रमाबाई कॉलनीजवळ नागरिकांचा मोठा जमाव एकत्र असून याठिकाणी कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थांच्या उपस्थिती संख्याच आज कमी असल्यामुळे शाळेत विद्यार्थांना परत पाठवण्यात आले असून नाईलाजाने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आले आहे.



ठाणे आणि मुंबईबरोबरच औरंगाबादमध्ये देखील या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून कसल्याही प्रकारच्या अफवा पसरवल्या जाऊ नये, यासाठी औरंगाबादमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्याच्या इतर भागामध्ये काही नागरिकांनी आपापल्या परीने या बंदला पाठींबा दिला असून उर्वरित भागातील जनजीवन व्यवस्थितपणे सुरु आहे.
 
 
विशेष म्हणजे पुण्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलीस पथके तैनात करण्यात आली असून कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्यात ते आहे, त्यामुळे  पुणे शहरातील संपूर्ण जनजीवन सुरळीतपणे सुरु आहे. 


या बंदाचा परिणाम कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वाहतुकीवर देखील झाला आहे. कर्नाटकमधून राज्यात येणाऱ्या सर्व बस सेवा कर्नाटक सरकारने काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकहून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बस सेवा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.

संसदेत देखील हल्ल्याचे पडसाद

राज्याबरोबरच संसदेत देखील या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भीमाकोरेगाव येथे जमावावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांकडून मोशन नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. तसेच या विषयी चर्चा घेण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. .

@@AUTHORINFO_V1@@