न केलेल्या पापाची शिक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |


‘‘सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसा, आंदोलने, कायदेभंग आणि सत्याग्रहाच्या मार्गाऐवजी संविधानात्मक मार्गाचा अवंलब करावा. मोर्चे आणि सत्याग्रहाची पद्धत म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून अराज्यवादाचे व्याकरण आहे. त्याचा त्याग करणे गरजेचे आहे,’’असे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि या विचाराच्या सपशेल विरोधात वागणारी आंबेडकरी जनता आज महाराष्ट्राने पाहिली. पण, दोष त्यांचा नाही. कातडे ओढून जे लांडगे कळपात शिरले आहेत त्यांचे हे सारे डाव आहेत.

 
 

भीमा-कोरेगाव वढूला झालेल्या घटनेनंतर दोन दिवस महाराष्ट्र अस्वस्थ होता. ब्रिटिशांसाठी लढलेल्या महार रेजिमेंटच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दलित बांधव एकत्र येतात. त्याच्या आधी संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढूला काही घडते. ज्यांनी एकमेकांसमोर शत्रू म्हणूनच काय, पण प्रतिस्पर्धी म्हणूनही येऊ नये, असे दोन समाज एकमेकांसमोर येऊन ठाकतात. त्यात एका तरुणाचा बळी जातो. सारा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतो आणि पेशवाईच्या नावाखाली हिंदुत्व विचार मानणाऱ्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सक्रिय होते, हा सारा प्रकार मन विषण्ण करणारा आणि दुर्दैवी आहे. रस्त्यावर उतरलेले दोन्ही समाज एकच भारतमातेची लेकरे. सध्या सत्तेतून हद्दपार झालेल्यांना काही ना काही करून सत्तेत परत यायचंय. या सगळ्यातून त्यांनी आपली पोळी उत्तम भाजून घेतली. मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्यांच्या मुलाखती काळजीपूर्वक ऐकल्या तर लक्षात येते की, ते नेमके कोणाचा विरोध करताहेत, हे माहीतच नाही. पेशवाई, ब्राह्मणशाही, काही हिंदुत्ववादी संघटना अशी मोघम उत्तरे दिली जात होती. या साऱ्या ‘बंदमध्ये शासकीय मालमत्तेची हानी झाली. भीमा-कोरेगाव प्रकरणी खरं तर वातावरण तापवायला आधीच सुरुवात झाली होती. आंबेडकरी युवकांच्या ऊर्जेच्या आधारावर डाव्यांचे विचार पसरविण्याचा एक उद्योग महाराष्ट्रात अव्याहतपणे सुरू आहे. या दोन दिवसांत जे घडले त्याला हे वातावरण निर्माण करणारेच जबाबदार आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत कारण ब्राह्मणवादी लोक सत्तेत आहेत. हा अपप्रचार कुणी पसरवला? या अपप्रचाराला कोणता तर्क किंवा तथ्यं लागू पडतात. हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी अशा आशयाची वक्तव्ये केली होती. यानंतर मुंब्रा येथे गुजरातमध्ये ताजा विजय मिळविलेल्या अल्पेश ठाकोरची सभा झाली. भीमा-कोरेगाव स्मारकाच्या निमित्ताने जी सभा झाली ती अशीच होती. गुजरातमधल्या जिग्नेश मेवानीची ही सभा होती. नागपूरात जाऊन संघविसर्जनाची घोषणा त्याने केली. सर्व मतभेद हटवून भाजपला पराभूत करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचा म्हणून एक अधिकार असतोच. हा अधिकार कोणी कसा वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र, या उचापत्यांमुळे या दोन दिवसांत जे घडले त्याला जबाबदार कोण? प्रकाश आंबेडकरांना यानिमित्त नेतृत्व करायची संधी मिळाली. कुठल्याही सनदशीर मार्गाने जाऊन दलितांसाठी काही केल्याचा त्यांचा अनुभव नाही. जातीयवादाचे विष समाजात भिनवून पुरोगामी बुरखे घालणाऱ्यांबरोबर वावरण्यासाठी ते अलीकडे प्रसिद्ध झाले आहेत. काल, आज महाराष्ट्रात जे काही घडले त्यासाठी हे जातीयतेचे राजकारण करणारेच जबाबदार आहेत. या दंगलीत जो तरुण मृत्युमुखी पडला तो मराठा समाजाचा होता. मात्र, दोन-तीन दिवस जी धुमश्चक्री झाली त्यातून गोंधळाचे वातावरणच निर्माण केले गेले. गैरसमज पसरविणाऱ्यांनी गोबेल्सच्या तंत्राचा पुरेपूर वापर करून घेतला. असत्य पुन्हा पुन्हा सांगा. लोक विश्वास ठेवायला लागतील, असे हिटलर म्हणायचा. हिंदुत्व विचार मानणाऱ्यांबाबतचे असत्य वारंवार सांगण्यात आणि दलित समाजाला त्यावर विश्वास ठेवायला लावण्यात मंडळी पूर्णपणे यशस्वी ठरली आहेत. शत्रू नसेल तर काल्पनिक शत्रू उभा करा आणि लोकांमध्ये त्याला संपविण्याच्या आधारावर चेव निर्माण करा, असे सध्या सुरू आहे.

 
या देशातील खरी स्थिती डाव्यांना कधीही कळली नाही. त्याहून बिकट म्हणजे ती त्यांच्या हाताबाहेर कधी गेली तेही कळले नाही. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या घटनांही अशाच आहेत. मोदीद्वेष्ट्या कंपूने आपला कृती आराखडा बदलला आहे. दलितांना त्यासाठी वापरून घेण्याची त्यांची योजना आहे. दलित समाज अत्यंत भावनाप्रधान आणि आक्रमक आहे. या आक्रमकतेचे इंधन निर्माण करून मोदीद्वेष निर्माण केला जात आहे. दलित समाजाचे दुर्दैव असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर या समाजाला तितक्या ताकदीचा आवाक्याचा स्वयंभू नेताच मिळाला नाही. इथे नेता म्हणून मिरविणाऱ्यांनी सतत कुठल्या ना कुठल्या मोठ्या पक्षाच्या वळचणीलाच राहणे पसंत केले. पराभूत डाव्यांनी आणि हिंदुत्वाचा बागुलबुवा उभा करणाऱ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. ‘‘सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसा, आंदोलने, कायदेभंग आणि सत्याग्रहाच्या मार्गाऐवजी संविधानात्मक मार्गाचा अवंलब करावा. मोर्चे आणि सत्याग्रहाची पद्धत म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून अराज्यवादाचे व्याकरण आहे. त्याचा त्याग करणे गरजेचे आहे,’’ असे सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि या विचाराच्या सपशेल विरोधात वागणारी आंबेडकरी जनता आज महाराष्ट्राने पाहिली पण दोष त्यांचा नाही. कातडे ओढून जे लांडगे कळपात शिरले आहेत त्यांचे हे सारे डाव आहे. अभिवादन भीमा-कोरेगावच्या शहीदांसाठी, संघर्ष मराठा समाजाबरोबर, शिवीगाळ नरेंद्र मोदींना आणि खापर हिंदुत्ववाद्यांच्या माथी अशा एक विचित्र अराजकाच्या उंबरठ्यावर दलित समाजाला आणून उभे केले गेले आहे. महार फलटणीचा पराक्रम आणि आज दलितांचा करून घेतला जात असलेला वापर ही शोकांतिका आहे. कोळसे पाटील, श्रीमंत कोकाटे, उमर खालिद, कन्हैय्या कुमार आणि आता जिग्नेश मेवानी यासारख्यांची भाषा दलित समाजाच्या तोंडी उतरविण्याचे काम चालू आहे. पक्षीय द्वेषाचे हे विष आता जातीय स्तरावर नेऊन समाज दुभंगण्याचे काम सुरू झाले आहे. दलित समाज हा इतका संवेदनशील विषय होऊन बसतो की कुणीही त्यात कोणतीही भूमिका घ्यायला तयार होत नाही. धर्मांध इस्लामी दहशतवादी आणि क्षोभाने रस्त्यावर उतरलेले दलित बांधव यातला भेद अद्याप कायम आहे. मात्र, सपशेल फसलेल्या डाव्यांमुळे हे समाजभान दुभंगण्याची भीतीच जास्त आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@