तामिळनाडूच्या राजकारणाचा नवा सिनेअध्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
रजनीकांत राजकारणात येणार असल्याचे सूतोवाच केल्यानंतर रजनीकांतला एक संभाव्य प्रतिस्पर्धीदेखील निर्माण झाला आहे. तामिळ अभिनेता कमल हसन यांच्या रूपाने हे आव्हान पुढच्या काळात आकार घेईल. कमल हसन रजनीकांतइतके लोकप्रिय नक्कीच नाहीत. त्यांचे डाव्या विचारांकडे झुकलेले असणे जगजाहीर आहे. रजनीकांत यांनी मात्र सावध पावले टाकत राजकारणात जायचे ठरविले आहे.

 
जयललिता आजारी पडल्यापासून तामिळनाडू राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत सापडले. राजकीय अस्थिरतेचे हे ग्रहण काही केल्या सुटायला तयार नाही. या अस्थिरतेच्या वातावरणातच रजनीकांत यांचा राजकारण विषय सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाला आहे. राजकारण हा असा खेळ आहे, जिथे पुढच्या क्षणाला काय घडेल काहीच सांगता येत नाही. रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचे सुतोवाच केले तेव्हाच ते भाजपमध्ये जाणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. भाजपच्या बड्या नेत्यांनी घेतलेल्या त्यांच्या भेटी, त्यांचे भाजपच्या लोकांशी चाललेले संपर्क यामुळे वेगळेच वातावरण निर्माण झालेले असताना रजनीकांत यांनी आपला स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याचीच घोषणा करून टाकली. रजनीकांत यांच्या या घोषणेमुळे तामिळनाडूत निरनिराळ्या गटात निरनिराळ्या चर्चा जोरदार सुरू आहेत. निवडणुका दूर असल्या तरी कधीही मध्यावधी लागू शकतात, अशी स्थिती आहे. त्याआधी सगळ्यांनाच आपली राजकीय ताकद आजमावून पाहायची आहे.
 
‘सिनेमाप्रधान उत्कट भावनांचे राजकारण’ म्हणून तामिळनाडूचे राजकारण ओळखले जाते. तामिळनाडूच्या जनतेला राजकीय नेतेच राजकारणी म्हणून भावतात. याचा पुरेपूर उपयोग तामिळनाडूतल्या लहानमोठ्या सिनेनटांनी घेतला. इंदिरा गांधींचे दिल्ली केंद्रित राजकारण आणि त्यांनी आणून बसविलेला मुख्यमंत्री या गृहितकाला एमजीआरनी सर्वप्रथमधक्का दिला. अमिताभ बच्चनचा ‘अँग्री यंग मॅन’ लोकप्रिय ठरला तोच हा काळ. देशात बेरोजगारी, गरिबी, अन्नधान्य पुरवठ्यातला काळा बाजार याने सर्वसामान्य जनता अत्यंत त्रस्त होती आणि त्यांचे अत्यंत नैसर्गिक प्रतिबिंब सिनेमात पडत होते. सिनेमालाच वास्तव समजणारे तामिळनाडू यापासून अलिप्त राहू शकले नसते तर नवलच! एमजीआर व करूणानिधी यांनी हा विडा उचलला आणि अत्यंत सृजनशीलतेने तामिळनाडूत राजकारणाची लाट निर्माण केली. ज्या ‘कॉंग्रेसमुक्त भारता’च्या चर्चा आज केल्या जातात त्याची खरी सुरुवात इथेच झाली होती. इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असलेल्या पक्षाला तामिळनाडूतल्या या स्थानिक राजकारणाने नामोहरमकरून सोडले होते. लोकांमध्ये खदखदणारे प्रश्न एमजीआरनी आपल्या सिनेमाच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केली. कधी ते कोळ्यांचे नेते होते, तर कधी शेतकर्‍यांचे. सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी लोकमानसावर चांगलीच पकड मिळविली. एमजीआर नायक, जयललिता नायिका आणि करूणानिधी पटकथा लेखक असा हा प्रवास होता. कालांतराने करूणानिधींनी मतभेदामुळे आपला वेगळा पक्ष काढला आणि त्यातून तामिळनाडूत दोन राजकीय पक्षांचा जन्मझाला. एमजीआर पक्षाची दोन शकले झाली तरीही तामिळनाडूच्या राजकारणात कुठल्याही राष्ट्रीय राजकारण करणार्‍या पक्षाला प्रवेश मिळविता आला नाही. या सगळ्याचे मुख्य कारण या दोन्ही पक्षांच्या स्थापनेपूर्वी तामिळनाडूत रुजलेली द्रविड चळवळ. या दोन्ही पक्षांनी आपला द्रविडी राजकारणाचा पाया काही केल्या सोडला नाही. त्याची फळे त्यांना सातत्याने मिळत राहिली.
 
एमजीआरनंतर इथले राजकारण जयललिता आणि करूणानिधींच्या अवतीभवतीच फिरत राहिले. नंतरच्या काळात करूणानिधींच्या मुलांमधील भांडणांमुळे त्यांना राजकीय यश संपादन करता आले नाही. जयललिता मात्र यशाच्या आणि लोकप्रियतेच्या पायर्‍या चढतच राहिल्या. जे व्यक्तिकेंद्रित राजकारण त्यांनी निर्माण केले, त्याचीच फळे आता त्यांच्या पक्षाला भोगावी लागत आहेत. जयललितांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या पक्षाला कुणी वालीच उरलेला नाही. दुसर्‍या बाजूला करूणानिधी आपल्या वाढत्या वयोमानामुळे राजकारणातून बाजूला झाल्यातच जमा आहेत. स्टॅलिन व अझगिरी या त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये विस्तवही जात नाही. सत्ता आहे, पण सत्ताधीश नाही, अशी आजच्या तामिळनाडूची अवस्था आहे. शशिकला यांना त्यांच्या पक्षातील दोन्ही गटांनी बाजूला टाकले असले तरीही अपक्ष म्हणून निवडून आलेले दिनकरन हा तामिळनाडूच्या राजकारणातला ताजा कलमसगळ्यांनाच धक्का देऊन गेला. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांत पुढे काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या शब्दांत सांगायचे तर तामिळनाडूतल्या सगळ्याच म्हशी सध्या पाण्यात आहेत.
 
या सगळ्या कालखंडात तामिळनाडूची ससेहोलपट झाली आहे. भ्रष्टाचार कंपूशाही यांनी कळस गाठला आहे. सर्वसामान्य माणसाचा राजकारणातला सहभाग नगण्य झाला आहे. नेमकी हीच पोकळी भरून काढून नेतृत्व देण्याची गरज आहे. रजनीकांत राजकारणात येणार असल्याचे सूतोवाच केल्यानंतर रजनीकांतला एक संभाव्य प्रतिस्पर्धीदेखील निर्माण झाला आहे. तामिळ अभिनेता कमल हसन यांच्या रूपाने हे आव्हान पुढच्या काळात आकार घेईल. कमल हसन रजनीकांतइतके लोकप्रिय नक्कीच नाहीत. त्यांचे डाव्या विचारांकडे झुकलेले असणे जगजाहीर आहे. रजनीकांत यांनी मात्र सावध पावले टाकत राजकारणात जायचे ठरविले आहे. सध्या ते आपल्या समर्थकांना भेटत आहेत आणि निरनिराळ्या प्रकारच्या आकडेवारीवर त्यांचे कामसुरू आहे. विधानसभेच्या सगळ्या जागा लढविण्याचा मानस रजनीकांतनी जाहीर केला आहे. आपल्या राजकारणाचा कल आध्यात्मिक असेल, असे ते म्हणतात. कुठल्याही पक्षातल्या भ्रष्टाचार्‍याला आपण पक्षात स्थान देणार नाही, असाही त्यांचा दावा आहे. आजच्या प्रचलित राजकारणातल्या दोषांचे सगळे पातक राजकारण्यांच्या माथी मारणे योग्य नाही. यात त्यांना निवडून देणार्‍या जनतेचाही तितकाच सहभाग आहे. कुठलाही राजकीय पक्ष या राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेऊ शकलेला नाही. या सगळ्या पार्श्र्वभूमीवर रजनीकांत काय वेगळे करतात हे पाहाणे रोचक ठरेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@