माणसांची यंत्रे आणि यंत्राची माणसे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जातीय आणि धार्मिक समीकरणे किती, कुठल्यातरी विजयस्तंभावरून उसळलेल्या जातीय दंगली अन् अन्नसुरक्षेच्या बाबत भारत जगात ११९ व्या स्थानावर, अशा काही बातम्यांच्या गर्दीत सोफियाची बातमी दडून गेलेली.
 
त्यातल्या सोफियाला मंदिर होणार का, त्रिवार तलाक यासारखे प्रश्न कळत नसावे, कारण ती मानवसदृश आहे, मानव नाही. त्यामुळे तिचे मानसिक प्रदूषण झालेले नाही. तरीही सोफियाची वीस मिनिटांची मुलाखत अंतर्मुख करणारी आहे. ती जे काय भरवले तेच बोलत असली, तरीही ते उत्स्फूर्त असेच होते. तिची मुलाखत घेणार्‍या निविदिकेने तिला, ‘‘मी जर पुरुष आहे अन् तुला लग्नाची मागणी घातली तर तू होकार देशील का?’’ तर तिने चक्क हसत उत्तर दिले, ‘‘माझा लग्नाला नकारच असेल!’’ मुंबईत मागच्या आठवड्यात रोबोटिक्स परिषद भरली होती. सोफिया हे तर एक उदाहरण आहे. आम्ही कितीही नाकारले अन् मानवी संवेदनांच्या अस्मिता पाजळल्या, तरीही रोबो हे आता मानवी जीवनाचा भाग झालेले आहेत. आमच्याही नकळत आम्ही अनेक बाबतीत रोबोमय झालेलो आहोत. रोबोंमुळे मानवांचे जगणे यंत्रशरण होऊन जाईल, बेरोजगारी निर्माण होईल, असे असंख्य आक्षेप आणि त्यावर विचारवंतांचे लेख, प्रज्ञावंतांच्या कलात्मक प्रतिक्रिया उमटून विरल्याही आहेत.
 
हॉलीवूडमध्ये त्यावर चित्रपट येऊन गेले. भारतीय भाषांत ते डब झाले आणि चोखंदळ रसिकांनी ते पाहिलेही. अगदी आपल्या थलैवा रजनीकांतचाही ‘रोबो’ नावाचा चित्रपट गल्ला भरून गेला. आता त्याचा सिक्वेलही येतो आहे. स्टार वॉर्स हा चित्रपट बहुतेकांनी पाहिलाच असेल. त्यात तर अनेक रोबो काम करताना दाखविले आहेत. आता तर अमेरिकेसारखे देश युद्धात रोबो किती आणि कसे काम करतो, याची परिक्षणे करीत आहे. रोबोंचे माणूस होणे अन् मानवी जगण्यावर त्याने अतिक्रमण करणे, ही धास्ती या सार्‍याच चित्रपटांत व्यक्त होत आली आहे. अर्थात त्यांत प्रेम, स्त्री-पुरुष संबंध, नाती या भावनेच्या प्रदेशात रोबोंच्या शिरकावाची कल्पना धास्तावून टाकणारी आहे. तरीही आम्ही हे रोखू शकत नाही. रोबो आता थांबणार नाहीत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि कुपोषणासारख्या समस्यांत गुंतलेल्या, गावखेड्यांत वीज, पाणी, रस्ते अशा प्राथमिक सोयीदेखील न पोहोचलेल्या भारतासारख्या विकसनशील देशातही रोबो नावाचे हे एकदम दुसरे टोक उन्नत होते आहे.
 
मानवानेच तयार केलेले हे रोबो आता मानवालाच अशक्य असलेली कामे चुटकीसरशी करू लागले आहेत. ऑटोमोबाइल्सप्रमाणे मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर या गॅजेट उत्पादनांमधील अवघड असलेली सूक्ष्म स्पेअरपार्टची जोडणी (मायक्रो असेम्बलिंग) काही सेकंदांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. रोबोटिक्स टेक्नॉलॉजीने ही किमया साधली असून, एबीबी इंडियाने ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात सादर केलेले दोन यूमी रोबो लक्षवेधकच होते. हे रोबो प्रेम जुळवून देण्यापासून शेती आणि आरोग्यासारख्या क्षेत्रातही लीलया वावरू लागले आहेत. फ्रान्सने २०१६ साली विकसित केलेल्या लाराने चॅटबॉटस्च्या क्षेत्रात वेड लावले. त्यानंतर मॅच समूहाने ज्युलियाला जन्म दिला. संगणकाच्या माध्यमातून या रोबोंशी संवाद साधला जाऊ शकतो. ‘दे बायफ्रेंड मेकर’ नामक जपानी चॅटबॉटस्वरील रोबोंनी मात्र माणसांशी अतर्क्य बोलणे सुरू केले होते.
 
दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत आणि मग जगभर पसरलेल्या इबोला विषाणूंच्या निर्दालनासाठी रोबोंचीच मदत घ्यावी लागली. गिगी नावाच्या रोबोने या विषाणूंचा समर्थपणे मुकाबला करून वातावरणातील विषाणूंचा नायनाट केला. सूर्यप्रकाशात या जिवाणूंची वाढ खुंटते, मात्र त्यांचा नायनाट करण्यासाठी औषधी फवारणी करावीच लागते. मात्र, कडेकोट सुरक्षा करून मानवाने ही फवारणी केली तर त्यात त्याचा जीव जाऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेत याचा प्रत्यय आल्यावर गिगा रोबोची मदत अमेरिकेत घेतली गेली. या खरिपाच्या हंगामात फवारणीचे बळी ठरलेल्या शेतकर्‍यांची दुर्दैवी घटना आठवली की, येत्या काळात भारतातही ‘गिगा’ची मदत घ्यावी लागेल, असे वाटते...
 
रोबो आता सर्वसंचारी झालेले आहेत. आधुनिक रोबोटिक्सचे जनक जॉर्ड डेवोल यांनी पहिला रोबो १९५४ साली बनवला, जो त्यांनी १९६० साली जनरल मोटर्स कंपनीला विकला. औद्योगिक क्षेत्रात रोबोंचा हा पहिला प्रवेश होता. आज अमेरिका, जपान, चीन, जर्मनीसह अनेक युरोपीय देशांमध्ये औद्योगिक उत्पादनांसाठी रोबोचा वापर होतो आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या आकडेवारीनुसार आज जगभरात माणसांसोबत दहा लाख रोबोही वावरतात. रोबो यंत्र वाटू नयेत यासाठी त्यांना मानवी रूप देण्यात आले आहे. रोबो मानवाच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन मानवी कामे करू लागले आहेत. चीनच्या कुनशन आणि हार्बनी शहरातील हॉटेलात तर वेटर आणि आचारी म्हणून रोबोच वापरले जातात! चेन्नईमध्ये एका हॉटेलात खाद्यपदार्थ नेऊन देण्यासाठी रोबो काम करीत आहेत. या हॉटेलमधील आसनांची प्रतीक्षा यादी आताच संपून गेली आहे. त्यासाठी पुढच्या वर्षी नंबर लागणार आहे. गूगलची स्वयंचलित कार रोबोटिक्स तंत्रज्ञानावरच आधारित आहे. ऑस्ट्रेलियात डेअरी फार्म्सवर रोबो गायी-म्हशींचा कळप राखण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत सर्व कामे करतात. पाश्चात्त्य देशांत घरसफाई, गवत कापणे, बर्फ हटविणे ही कामे रोबो करू लागले आहेत. हॉलीवूडमध्ये चित्रपटांच्या सेटवर विविध सेवा देणारे रोबो आता ‘अभिनय’देखील करू लागले आहेत. बॉट अ‍ॅण्ड डॉली या कंपनीच्या रोबोंनी ‘ग्रॅव्हिटी’ या गेल्याच वर्षी आलेल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मदत केली होती.
 
आपल्या देवतांना चार, आठ हात असल्याची आपली श्रद्धा आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कंपनीने एक रोबोटिक हात बनवला आहे. हा हात धारण करून माणसांना चार हात असल्यागत काम करता येते. मनाच्या नियंत्रणावर हा हात काम करतो...
 
एकुणात, आपल्याही नकळत आपल्यासोबत रोबो असू शकतो. महात्मा गांधींचा यांत्रिकीकरणाला विरोध होता. आपण यंत्रशरण होऊ आणि मग मानवी क्षमता संपतील, असे त्यांना वाटत होते. आता तसे झालेले आहे. सर्व्हर डाऊन झाले म्हणून बँकेत ग्राहकाला कर्मचारी पैसे देऊ शकत नाही... निरंजन घाटेंची एक कथा मागे वाचण्यात आली होती. हे असेच सगळीकडे रोबोटीकरण झालेले आहे. त्यात एक माणूस बागेत त्याच्या प्रेयसीजवळ, ‘‘आता या जगात आपल्यासारख्या भावना असलेली खरोखरची माणसे किती असतील?’’ यावर चिंता व्यक्त करत असतो. तो तिच्या केसांतून हात फिरवतो अन् त्याच्या हातात तिचे टर्मिनल्स येतात! हीदेखील...? तो मग वैतागतो आणि आणि विमान घेऊन उडत निघतो. त्याला गाव दिसते. बायका पाणी भरत असतात. त्याला बरे वाटते, चला खेड्यात तर माणसे आहेत. तो खाली उतरतो. त्या खेडूत बाईला पाणी मागतो. ती भरली घागर त्याच्या ओंजळीत ओतत असताना वजन जास्त झाल्याने तिचा हात निखळतो अन् टर्मिनल्स बाहेर पडतात... तो मग प्रचंड निराश होतो. विमान उंच उडवितो अन् एका पर्वताला धडक देतो. तो दरीत कोसळतो. एका झाडावर पडतो अन् त्याचे हात-पाय निखळत असताना त्यातून टर्मिनल्स बाहेर पडतात...
 
विसेक वर्षे नक्कीच झाली असतील, ही कथा वाचून. तेव्हा हे सगळं अतर्क्य वाटत होतं... आता तीव्र गतीच्या जगण्यात स्वत:शी संवाद साधायला वेळ मिळतो, तेव्हा आपल्याच होऊ लागलेल्या रोबोटीकरणाने जीव कासवीस होतो, वाटतं आपण सहज बोटं मोडायला जावं अन् त्यातून तारा बाहेर पडायच्या...!
 
 
- श्याम पेठकर 
 
@@AUTHORINFO_V1@@