शी जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती (भाग 3)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

२००६ साली चीनने जागतिक बौद्ध परिषद (वर्ल्ड बुद्धिस्ट फोरम) आयोजित केली, तेव्हा भारतातीलच नव्हे, तर जगातील अनेकांना आश्चर्य वाटले. या परिषदेत विविध देशांचे बौद्ध विचारवंत आणि भिक्खूंनी भाग घेऊन जागतिक सौहार्दावर चर्चा केली. बर्‍याच प्रसिद्ध विद्वानांना सहभाग व बोलण्यासाठी निमंत्रणे पाठविली असली, तरी पूजनीय दलाई लामा यांना निमंत्रण नव्हते आणि त्याचे कारण सर्वांनाच ज्ञात आहे. तेव्हापासून, चीनच्या सांस्कृतिक धोरणात झालेल्या बदलाबाबत अनेक जण अनेक गोष्टी बोलत आहेत.
 
ही घटना अनेकांसाठी आश्चर्यकारक असली, तरी अनेकांसाठी तो एक धक्का होता. पोलादी पडद्यामुळे, अगदी चीनविषयक नियमित निरीक्षण करणार्‍यांनाही याचा नेमका काय उद्देश होता, हे कळू शकले नाही. बुद्ध धर्म अनुसरण्याबाबत चीन खरेच गंभीर आहे की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सोयीसाठी ही बौद्ध मताची भलावण आहे?
 
२००६ साली चीनमध्ये झालेली आणखी एक घडामोड नमूद करण्यासारखी आहे. चीनच्या बौद्ध संघटनेने जिआन्शी प्रांतातील यिचुन शहराच्या हुआचेंग मंदिरातील प्रमुखाला संघटनेतून बाहेर काढले. कारण या प्रमुखाने, १९८९ सालच्या तिआनमेन चौकातील नरसंहारात मरण पावलेल्यांची विधिवत तेरावी केली होती.
 
मला वाटते, माओ झेडोंग यांच्या तसेच चीनमधील कम्युनिस्ट राजवटीच्या उदयापासूनचा इतिहास पृष्ठभूमीवर ठेवून, चीनच्या मानसिकतेत जे क्रमश: बदल झालेत, ते समजून घेतले पाहिजे.
 
त्या काळी माओ झेडोंग यांचे धर्मविरोधी धोरण गाजले होते. संपूर्ण चीन देशात बुद्धांच्या अनुयायांवर अत्याचार झालेत. मंदिरे आणि मठ यांचा सेक्युलर उपयोग करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यालये किंवा अधार्मिक गोष्टी सुरू करण्यात आल्या होत्या. मंदिरांचा विध्वंस तर सामान्यच होता. ‘बुद्ध चीनमध्ये अजूनही पवित्र मानला जातो,’ हे जगाला आणि परदेशी पर्यटकांना दाखविण्यासाठी मोठ्या शहरातील सरकार संचालित काही मंदिरे व मठ मात्र कायम ठेवण्यात आले होते. लवकरच बुद्धिस्ट असोसिएशन ऑफ चायना (बीएसी) ही संस्था स्थापन करण्यात आली आणि देशातील सर्व बौद्ध संबंधित कार्यांचे या संस्थेमार्फत अधिग्रहण करण्यात आले- ‘माओवादी चीनच्या सेवेत बुद्ध!’
 
चीन सरकारच्या तिबेटमधील सर्व कारवायांना, अगदी पूजनीय दलाई लामा यांच्या अनुयायांवरील हल्ल्यांनादेखील, बीएसीने जेव्हा मान्यता दिली, त्यानंतर म्हणजे १९५९ च्या सुमारास तिबेटी बौद्ध धर्माचा अत्यंत वाईट काळ सुरू झाला. तिबेटी बौद्ध धर्म म्हणून जे काही उरले होते, म्हणजे कला आणि कलात्मक गोष्टी, त्यांनाही १९६६ मध्ये माओच्या लाल सैनिकांनी ‘सांस्कृतिक क्रांती’च्या नावाखाली नष्ट केल्या.
 
१९७६ मध्ये माओ झेडोंग यांच्या जाण्यानंतर, चीन सरकारने धर्मावरील त्याच्या जुलमी धोरणांमध्ये थोडी, पण टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली. कालांतराने बीजिंगमध्ये बराच बदल झाला आणि आता हळूहळू धर्माने समाजातील आपले गमविलेले स्थान परत प्राप्त करणे सुरू केले आहे. धर्मविरोधी धोरणे शिथिल केली आहेत आणि माओच्या लाल सैन्याने नष्ट केलेल्या काही बौद्ध मंदिरांना पुन्हा बांधले आहे. एक लक्षात ठेवले पाहिजे की, मंदिरे व मठांना संचालित करणार्‍यांपासून ज्या काही बौद्ध संस्था तिथे कार्यरत आहेत, त्या सर्वांवर चिनी सरकारचे बीएसीच्या माध्यमातून नियंत्रण आहे. तिबेटसह जो चीन आहे त्यात मोठ्या संख्यने बौद्ध मठ आहेत. सुमारे ९५०० मठांत जवळपास एक लाख ७० हजार बौद्ध भिक्खू व भिक्खुणी राहत आहेत. सर्व बौद्ध वैचारिक संस्था बीएसीच्या नियंत्रणात आहेत. तिआनमेन नरसंहाराच्या काही काळानंतर या देशात एक लहानशी मुक्त लहर सुरू झाली आहे. चीनमधील बुद्ध स्मित करू लागला आहे, असे म्हणता येईल.
 
बर्‍याच मोठ्या संख्येतील उच्चशिक्षित व सधन चिनी तरुण, त्यांच्या मेंदूत आतवर सुप्त असलेल्या बुद्धाला पुन्हा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अध्यात्माची जिज्ञासा, त्यांना भिक्खूंकडे ओढत आहे. दशकांपासून बुद्धीत भरण्यात आलेल्या मार्क्सवादी संकल्पनांचे आव्हान नसून, पाश्चात्त्यांचा प्रभाव, जसे दारू पिणे, मांसाहारासह ऐशआरामी जीवन हे आव्हान आहे. तरुणांमधील अध्यात्माची जिज्ञासा वाया गेलेला काळ वेगाने भरून काढत आहे.
 
चीनमधील या कोलाहलात, चिनी लोकांचे धर्मांतरण करण्यासाठी, चर्च आक्रमकपणे आपली पोळी शेकण्याच्या प्रयत्नात बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाला आहे. असे असले तरीही मिशनरीच मात्र, जसे इतरत्र करतात तसे, सतत तक्रार करीत असतात की, सरकार चर्चना नष्ट करीत आहे, सरकार ख्रिश्चनविरोधी आहे. सरकारी धोरणानुसार, चीनमध्ये परदेशी मिशनर्‍यांना प्रवेश नाही. बिशप व मिशनरी संस्थांच्या नेमणुका चिनी सरकार करते. चीनमधील कॅथोलिक धर्म, चायनिज पॅट्रिओटिक कॅथोलिक असोसिएशनच्या अधिकाराखाली आहे. व्हॅटिकनचे पोप चीनमध्ये बिशप पाठविण्याचे केवळ स्वप्न बघू शकतात.
 
कदाचित, चीनच्या चान बौद्ध धर्मापेक्षा तिबेटी बौद्ध धर्माची शक्ती अधिक आकर्षक ठरत असल्यामुळे, चिनी सरकार चिंतेत असावे. शहरी चिनी भागातील अधिकाधिक तरुण तिबेटी मठांना पर्यटक म्हणून भेट देत आहेत आणि तिथे जाताच, आध्यात्मिक शक्ती उफाळून येऊन ते पुन्हा बौद्ध धर्मात येत आहेत. आजच्या तारखेला मर्यादित संख्येत असले तरी हे अनासाय धर्मपरिवर्तन आहे. ही बाब बारकाईने बघितली जात आहे.
 
कमी प्रमाणात का होईना, पण चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात तिबेटी बौद्ध धर्माने प्रवेश केला आहे, हे अनेकांना धक्कादायक वाटू शकते. पक्षाच्या व अधिकार्‍यांच्या अभेद्यपणामुळे, बाहेरील अथवा परदेशी व्यक्तीला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकार्‍यांच्या वैयक्तिक निवासस्थानाला भेट देता येत नाही. सर्व बैठका सार्वजनिक ठिकाणी होतात; कुणाच्याही निवासस्थानी होत नाहीत. असे असले तरी या अधिकार्‍यांच्या निवासस्थानाला भेट देण्याची संधी मिळाली, तर तिथे बुद्धाची मूर्ती दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. चिनी घरांमध्ये बुद्ध शांतपणे आणि हळूहळू प्रवेश करत आहे का?
 
तिबेटी बौद्ध धर्मामध्ये दुसरे सर्वोच्च लामा मानल्या जाणार्‍या पंचेन लामा यांच्या नियुक्तीच्या प्रसंगाचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्ण होणार नाही. १४ मे १९९५ ला पूजनीय दलाई लामा यांनी सहा वर्षीय गेथुन चोएक्यी निमा याला पंचेन लामाचा अकरावा अवतार ओळखले. महायान बौद्ध धर्माच्या प्रस्थापित परंपरेनुसार, दलाई लामा यांनी एखाद्या मुलाची आध्यात्मिक शक्ती ओळखली की त्याला दीक्षा दिली जाते. आध्यात्मिक क्षेत्रातील या सुंदर घडामोडीचा, शक्तिमान चिनी राजकीय शक्तीने धसका घेतला. तीन दिवसांच्या आतच, तो मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांना चिनी सरकारने ताब्यात घेतले. तेव्हापासून त्या कुटुंबीयांची आणि पंचेन लामा यांची काही खबरबात नाही. केवळ एकदा चिनी कम्युनिस्ट पक्षाने घोषित केले होते की, त्यांचे सुरळीत सुरू आहे आणि त्यांची गोपनीयता ते नष्ट करू इच्छित नाहीत.
 
चिनी सरकारने दुसर्‍या एका ग्यालत्सेन नोरबु नावाच्या, एका तिबेटी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकार्‍याच्या मुलाला ११ वा पंचेन लामा म्हणून १९९५ साली नियुक्त केले. ग्यालत्सेन नोरबुला यालादेखील, तो किशोरवयीन होत नाही तोपर्यंत म्हणजे २००९ पर्यंत, लोकांपासून अलिप्त ठेवण्यात आले होते. तेव्हापासून एक सरकारी लामा म्हणून त्याचे एकच काम आहे. बौद्ध धर्माबाबत चिनी सरकारला अनुकूल असे जाहीर आदेश जारी करणे. पंचेन लामा निमा आणि त्याचे कुटुंब सर्वाधिक काळ, सुमारे २२ वर्षे, राजकीय कैदेत असतानाही, आतापर्यंत एकही मानवाधिकार हक्काची तक्रार दाखल झालेली नाही. चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्राचीन इतिहास आहे. हान राजवंशाच्या काळात बौद्ध भिक्खू चीनमध्ये सर्वदूर पसरले असल्यामुळे, चीनवर बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव आहे.
 
आपले पात्र वारंवार बदलविण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या चीनमधील प्रसिद्ध यलो नदीप्रमाणे चीनचा इतिहासदेखील दिशा बदलविणार का? पंचेन लामा निळ्या नभाखाली मुक्त श्वास घेऊ शकेल का आणि ही धोरण-दुरुस्ती चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात होईल का?
 
हो, राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांचे ते शब्द कानात पुन:पुन्हा गुंजत आहेत- ‘‘आजच्या चीनला समजण्यासाठी, आजच्या चिनी लोकांना समजण्यासाठी, कुणालाही चीनच्या सांस्कृतिक रक्तप्रवाहाला समजून घ्यावे लागेल आणि चिनी लोकांचे पोषण करणार्‍या सांस्कृतिक भूमीची अचूक माहिती घ्यावी लागेल.’’
 
 
- श्याम परांडे 
@@AUTHORINFO_V1@@