डार्विन, डार्विन काय म्हणतोस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2018
Total Views |
 

 
 
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्ताबाबत वेगळे मत मांडले, स्पष्टच बोलायचे झाले, तर त्यांनी डार्विनचा उत्क्रांतिवाद चूक असल्याचे मत मांडले आणि भारतात बौद्धिक गुलामांचा गदारोळ सुरू झाला. गंमत म्हणजे, काही राजकीय पक्षांनी, डॉ. सत्यपाल सिंह यांचे मत म्हणजे जणूकाही भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक जाहीरनाम्यातील एक कलम आहे, असे गृहीत धरून आपला पारंपरिक काक-विरोध सुरू केला. भारतातील काही वैज्ञानिक संस्थांनी- नामे : इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी व नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी, तसेच तीन हजारच्या वर कथित विज्ञानवाद्यांनी सही करून एक पत्रक प्रकाशित केले आणि त्यात डॉ. सत्यपाल सिंह यांच्या विधानाचा धिक्कार केला; निषेध केला तसेच विरोधही केला. त्यांच्या मते, डार्विनचा उत्क्रांतीबाबतचा सिद्धान्त शास्त्रीय आहे आणि त्याबाबत कुणीही मतभेद व्यक्त केलेला नाही. खरे म्हणजे, डॉ. सत्यपाल सिंह हे माजी पोलिस अधिकारी असले, तरी ते रसायनशास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. त्यांनी एम. फिल. ही केले आहे. भारतीय पोलीस सेवेत येण्याआधी त्यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते. सत्यपाल यांनी हेही म्हटले की, डार्विनच्या उत्क्रांतिवादावर आंतरराष्ट्रीय चर्चा व्हायला हवी. कारण डार्विनचा सिद्धान्त शास्त्रदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मानवाच्या उत्पत्तीचे हेच सत्य प्रतिपादन आहे, असे समजून भारतातील अभ्यासक्रमात त्याचा समावेश करायचा की नाही, याचा पुनर्विचार झाला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हाच तर असतो. सतत शोध घेणे, नवनव्या संसाधनांनी प्रस्थापित सिद्धान्तांचा पुन:पुन्हा पडताळा घेणे, हे शास्त्रीय दृष्टिकोनाला अभिप्रेतच असते. परंतु, आपल्या भारतात तरी असा दृष्टिकोन कुणाचा असेल असे वाटत नाही. कमीतकमी जे स्वत:ला प्रस्थापित शास्त्रज्ञ समजतात त्यांचा तर अजीबातच दिसून येत नाही. त्यामुळेच ही शास्त्रीय मंडळी व त्यांच्या संस्था यांनी सत्यपाल यांचा निषेध केला. ही कृती मुळातच अवैज्ञानिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बरे, या शास्त्रीय संस्थांची आणि स्वाक्षरी करणार्‍या वैज्ञानिक मंडळींची जगात पत काय, हेही बघायला नको का? जगात तर यांना कुणी जवळही उभे करत नाही. ही सर्व मंडळी परप्रकाशित, परभृत आहेत. जे काही यांचे संशोधन असते त्याची दखल त्या विद्यापीठात तरी कुणी घेते की नाही कुणास ठाऊक! अशा मंडळींनी शास्त्रज्ञाचा आव आणून सत्यपाल सिंहांवर तुटून पडावे, हे जरा अतीच नाही वाटत! असे समजले जाते की, पृथ्वीवर जीव निर्माण होण्याआधी रसायनशास्त्र होते; जीवन निर्माण झाल्यावर जीवशास्त्र तयार झाले. त्यामुळे उत्पत्तीबाबत रसायनशास्त्रालाच बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे तसाही सत्यपाल यांना यावर बोलण्याचा अधिकारही प्राप्त होतो.
 
सत्यपाल सिंहांवर तुटून पडणार्‍या या लोकांना माहीत नसावे की, सध्या जगात डार्विनच्या सिद्धान्ताशी मतभेद असणार्‍यांची संख्या वाढत आहे. या लोकांनी एक चळवळच सुरू केली आहे. त्याचे नाव आहे- सायन्टिफिक डिसेन्ट फ्रॉम डार्विनिझम् (डार्विनवादाशी शास्त्रीय मतभेद). या पत्रकावर ५१४ जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांनी स्वाक्षरी केली आहे. आकडेवारीच सांगायची झाली, तर १५४ जीवशास्त्रज्ञ, ७६ रसायनशास्त्रज्ञ, ६३ भौतिकशास्त्रज्ञ आहेत. (जिज्ञासूंनी www.dissentfromdarwin.org या वेबसाईटवर जावे.) ओहिओ विद्यापीठातील बायोकेमेस्ट्रीचे (जैवरसायनशास्त्र) पी.एच.डी. पदवीप्राप्त डॉ. ख्रिस विल्यम्स म्हणतात की, मानवी शरीर इतके गुंतागुंतीचे आहे की, ते डार्विन यांच्या उत्क्रांतीतून निर्माण झाले आहे, असे आजतरी समजता येत नाही. मानवी शरीरातील 600 कोटी डीएनएद्वारा अंडबीजातून मानवी शरीर तयार करणे, २०० प्रकारचे टिश्यूज निर्माण करणे आणि त्या सर्वांचा समन्वय साधणे हे कार्य इतके गुंतागुंतीचे आहे की, डार्विनच्या सिद्धान्तानुसार त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण प्राप्त होत नाही. आजही, पृथ्वीवरील जीवाची उत्पत्ती केवळ अंदाजेच सांगता येते, त्यात कुठलेही शास्त्रीय सत्य अजूनतरी सिद्ध झालेले नाही. डॉ. विल्यम्स यांच्या प्रतिपादनाशी शेकडो ख्यातनाम वैज्ञानिक मंडळी सहमत होत आहेत. या मंडळींचे म्हणणे आहे की, शास्त्रीयदृष्ट्या डार्विनचे प्रतिपादन सिद्ध झाले नसल्यामुळे त्याला ‘सिद्धान्त’ असे न म्हणता, जास्तीतजास्त ‘डार्विनचा उत्क्रांतिवाद’ असे म्हणता येईल. ही वस्तुस्थिती असताना, भारतातील ही तथाकथित शास्त्रीय मंडळी, कशाच्या आधारे छाती पिटत आहेत? सत्यपाल सिंह यांना आपले विधान मागे घेण्याची मागणी करीत आहेत? काहींना तर सत्यपाल सिंह भारताचे शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, याची शरमदेखील वाटायला लागली आहे. खरेतर या असल्या अशास्त्रीय मंडळींचीच सर्व भारतीयांना लाज वाटायला हवी. जगातील शास्त्रीय संशोधनात या मंडळींचे कणभर तरी योगदान आहे का, याची विचारणा करायला हवी. ही मंडळी भारताच्या उज्ज्वल इतिहासाचा अतिशय द्वेष करीत असतात. त्यांनी आपली ठाम धारणा करून टाकली आहे की, भारतात अंधारच होता. पाश्चात्त्यांनी म्हटले की, आर्य बाहेरून आले, तर ही मंडळी मान्य करतात. पण, आता ते चूक सिद्ध झाले आहे. तरीही यांनी आपली धारणा बदलवली नाही. भारत हजारो वर्षे, आजच्या अमेरिकेसारखा आर्थिकदृष्ट्या जगात क्रमांक एकवर होता, हेही सिद्ध झाले आहे. पण, हा गौरवशाली इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत करायची यांची इच्छाच नाही. आपण स्वत: तर कवडीचेही संशोधन, अभ्यास करीत नाहीत, पण दुसर्‍यांनी भारताचा गौरव वाढविणारे निष्कर्ष काढले तर तेही यांना मान्य नसतात. अशी ही गांडुळासारखी चकतीला चकती लावून जगणारी कणाहीन जमात आहे. पण, कुणी भारताच्या गौरवशाली इतिहासाबाबत, भारताच्या जागतिक योगदानाबाबत सत्यसिद्ध गोष्ट बोलण्याचा प्रयत्न केला की, सापासारखे फणे काढून फूत्कार टाकू लागतात.
 
असे म्हणतात की, तक्षशिला हे जगातील पहिले विद्यापीठ होते. तेही ख्रिस्तजन्मपूर्व ७०० वर्षे आधी. तिथे जगभरातील १० हजारावर विद्यार्थी ६० प्रकारचे विविध विषय शिकायला होते. हे विद्यार्थी तिथे काय संध्या व आचमन कसे करायचे हे शिकायला येत होते काय? नालंदा विद्यापीठातील प्रचंड ग्रंथालय मुस्लिम आक्रमकांनी जाळून टाकले. हा इतिहास असतानाही तो ही मंडळी मान्य करीत नाही. या लाखो ग्रंथांतील ज्ञान जळून नष्ट झाले. त्याची जराशीही खंत यांना नाही. उलट खरखट्या तोंडाने हीच मंडळी विचारणार, तुम्ही म्हणता त्याला पुरावा काय? कुठे लिहिले आहे हे सर्व? विज्ञानात भाकडकथा नाही चालत! पुरावे द्यावे लागतात पुरावे... वगैरे. दुसर्‍या एखाद्या देशाला असा संपन्न व गौरवशाली इतिहास असता, तर त्याने कितीतरी अभिमानाने केवळ त्यांच्या पिढ्यांनाच नाही तर, जगालाही वारंवार सांगितला असता. इ. स. १९४७ च्या आधीचा इतिहासच नसलेला पाकिस्तानदेखील आता या इतिहासावर आपला हक्क सांगू लागला आहे. चीनसारखा कम्युनिस्ट देशदेखील आता थोर विचारवंत कन्फ्युशिअस यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करू लागला आहे. परंतु, या भारतातच असे हे घरभेदी कसे काय पैदा झाले, कळत नाही. भारतातील शास्त्रीय ग्रंथात मानवाच्या उत्पत्तीबाबत जे काही संदर्भ असतील, ते शोधून काढून, त्याच्या आधारे, नवनव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने, मानवाची उत्पत्ती कशी झाली, याचे संशोधन करण्यात या शास्त्रज्ञांनी आपली बुद्धिमत्ता, प्रतिभा खर्च करायला हवी. आपल्या भारतात प्राचीन काळी अत्यंत प्रगत विज्ञान होते. परंतु, गुलामगिरीच्या काळात वैज्ञानिक प्रयोगशीलता लयास गेली. या वैज्ञानिक प्रयोगशीलतेचा प्राचीन धागा पकडून आजच्या काळात आणि संदर्भात नव्या उमेदीने संशोधन करायला काय हरकत आहे? असे जर झाले तर भारताला नोबेल पारितोषिकदेखील मिळू शकते. पण, त्याआधी बौद्धिक गुलामीचा त्याग करावा लागेल. या जमातवादी मंडळींचे सोडा, पण आताची तरुण पिढी हे निश्चित करेल, याची खात्री आहे...
 
 
 
- श्रीनिवास वैद्य 
 
@@AUTHORINFO_V1@@