भारतीय अंडर-१९ संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |


क्वीन्सटाऊन : येथे सुरु असलेल्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने बांगलादेश संघावर तब्बल १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दिलेल्या २६६ धावांच्या लक्ष्य पाठलाग करताना बांगलादेश संघाचा डाव १३४ धावांवरच संपुष्टात आला आहे.

क्वीन्सटाऊन येथील क्वीन्सटाऊन इवेन्ट सेंटर मैदानवर हा सामना खेळवला गेला होता. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कर्णधार पृथ्वी शा (४०), शुभम गिल (८६), अभिषेक शर्मा (५०) आणि हर्विक देसाई यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४९.२ षटकांमध्ये १० बाद २६५ धावांची मजल मारली होती. याबदल्यात बांगलादेशकडून काझी ओनिक याने भारतीय संघाचे तीन बळी घेतले होते. तसेच नयीम हसन आणि सैफ हसन या दोघांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले होते.


यानंतर मैदानात आलेल्या बांगलादेश संघाकडून एकमेव पिनाक घोष वगळता एकही खेळाडूला उत्तम कामगिरी करता आली नाही. पिनाक घोष याने एकाकी झुंज देत ४३ धावांची खेळी केली, परंतु त्यानंतर आलेल्या एकाही खेळाडूला साधा २० धावांचा टप्पा देखील गाठता आला नाही. त्यामुळे परिणामी १३४ धावांवरच बांगलादेश संघाला आपला डाव गुंडाळावा लागला. या बदल्यात भारताकडून कमलेश नागरकोटी याने एकट्याने बांगलादेशच्या तीन खेळाडूंना माघारी धाडले होते. त्यापाठोपाठ अभिषेक शर्मा आणि शिवम मावी यांनी प्रत्येक दोन दोन बळी घेतले.





यंदाच्या अंडर-१९ विश्वचषकामध्ये भारतीय संघाने अत्यंत उत्तम कामगिरी केली असून या स्पर्धेत आतापर्यंत झालेले सर्व सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि न्युझीलंड हे संघ आघाडीवर असून यापुढे उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. हा सामना येत्या ३० तारखेला क्रिस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@