रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये ४१ नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |

दक्षिण कोरियामधील रुग्णालयातील घटना 




सोल :
दक्षिण कोरियामध्ये असलेल्या एका रुग्णालयात आज सकाळी लागलेल्या एका भीषण आगीमध्ये तब्बल ४१ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ७० हून अधिक नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. आगीमध्ये रुग्णालयाचे वरील दोन मजले पूर्णपणे जळून नष्ट झाले आहेत. तसेच रुग्णालयातील रुग्णांना तातडीने जवळील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागामध्ये मिरयांग या भागामध्ये ही घटना घडली आहे. मिरयांग येथे असलेल्या सेजोंग हॉस्पिटल या रुग्णालयाला आज सकाळी अचानकपणे आग लागली. थोड्या वेळानंतर रुग्णालयातून धूर पडू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांशी संपर्क साधला. परंतु तोपर्यंत आग रुग्णालयातील बऱ्याच भागामध्ये पसरली होती. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना तातडीने हलविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. दरम्यान आगीमुळे रुग्णालयातील काही भागांमध्ये स्फोट देखील झाले. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी तसेच रुग्णालय अगोदरपासून दाखल असलेल्या रुग्णांना मदत करण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. परंतु तोपर्यत रुग्णालयातील सर्व होत्याचे नव्हते झाले होते.


दरम्यान रुग्णालयातील जवळपास ४० रुग्णांना जवळील रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच जखमी झालेल्या नागरिकांवर देखील उपचार सुरु करण्यात आले आहेत. ७० जखमी रुग्णांपैकी बरेचसे रुग्ण हे अत्यंत गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे, तसेच या आगी मागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नसून त्यासंबंधी अधिक तपास करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@