‘उडान’च्या दुसर्‍या टप्प्यात नाशिकचाही समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : राज्यातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई सेवा सुरू झाल्यानंतर आता ’उडान’च्या दुसर्‍या टप्प्याच्या स्पर्धेत नाशिकचाही समावेश करण्यात आला आहे. यात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, गोवा, भोपाळ, अहमदाबाद या सहा शहरांशी नाशिक जोडले जाणार आहे.
 
यासाठी स्पाईसजेट, इंडिगो, एअर अलायन्स, जेट एअरवेज या कंपन्या सेवा देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. ‘उडे देश का आम आदमी’ या संकल्पनेतून विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावा, याकरिता केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी ’उडान’ योजना जाहीर केली होती.
 
या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबई या दोन मार्गांवर एअर डेक्कनकडून महिनाभरापूर्वीच विमानसेवा सुरू झाली. शासनाने नाशिक रिजनल कनेक्टिव्हिटी स्किमच्या (उडान) दुसर्‍या टप्प्यातून वगळले होते. त्यामुळे पुढील काळातील परिणाम ओळखून प्रसंगावधान राखत खासदार गोडसे यांनी पुन्हा नागरी हवाई मंत्रालयाशी संपर्क साधला.
 
नाशिक येथून राज्यातच नव्हे तर देशभरातील प्रमुख शहरांसाठी प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्याशिवाय नाशिकला योजनेमधून वगळू नये, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे नाशिक शहर आता हवाई मार्गाच्या दुसर्‍या टप्प्याच्या स्पर्धेत आले आहे. आज दुसरा टप्पा जाहीर झाला असून यात नाशिक येथून हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, गोवा, भोपाळ, अहमदाबाद, हिंदण या देशातील मोठ्या शहरांशी जोडले जाऊन विकासाला चालना मिळणार असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.
 
ज्या विमानतळावरून सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही अडचण नाही तेथून ही सेवा साधारणपणे महिन्याभरात सुरू होऊ शकते. मात्र, विमानतळासंबंधी काही परवानग्या किंवा काही अडचणी असतील तर सहा महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे सरकारचे निर्देश आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@