फायर ऍण्ड सिक्युरिटी असोसिएशन करणार मोफत फायर ऑडिट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |
 
 

 
नाशिक : आगीपासून होणारी जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी कायद्याप्रमाणे फायर ऑडिट करणे आवश्यक असून त्याकरिता नाशिक महानगरपालिकेने नुकतीच अंतिम जाहीर नोटीसही बजावली आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व ऑडिट मोफत करून देणार असल्याची माहिती फायर ऍण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक चॅप्टरचे सहसचिव जितेंद्र कोतवाल यांनी दिली.
 
ते पुढे म्हणाले की, ’’बर्‍याच वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक व आणीबाणी सेवेतर्फे अशा सूचना दिल्या असून त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पण, नुकत्याच झालेल्या आगीच्या घटनांनी याचे गांभीर्य वाढले आहे. वर्षातून दोनदा फॉर्म बी व वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक असून नाशिकमध्ये अनेक इमारतींचे ऑडिट अपूर्ण आहे. कायद्याप्रमाणे १५ मीटरपेक्षा उंच रहिवासी इमारती व सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती यांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. ऑडिट न केल्यास इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करणे व इमारती सील करणे अशी कारवाईची कायद्यात तरतूद आहे.
 
या विषयाची सामाजिक जाणीव ठेवून असोसिएशन ’मागेल त्याला मोफत ऑडिट’ करणार आहे. याकरिता महानगरपालिकेच्या फॉर्मनुसार ज्याला या सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्याने फॉर्म भरून संस्थेला पाठवायचा आहे.’’ या उपक्रमासाठी संस्थेचे सदस्य संतोष सारंगधर, शशांक बेडेकर, मनोज कर्डिले, किरण नवले, अनिल पाटील, वरुण तिवारी, संजीव जगताप, हर्षद भामरे, विनय बारपांडे, गौरव काळे यांचे सहकार्य लाभत आहे.
 
 
फायर ऍण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया
 
फायर ऍण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था असून सध्या देशभरात २२ विविध शहरांत कार्यरत आहे. सद्यस्थितीत याचे ६०५० सदस्य असून १० विद्यार्थी चॅप्टर्सदेखील कार्यरत आहेत. संस्था नियमितपणे जनजागृतीपर कार्यक्रम, प्रशिक्षण, प्रदर्शने आयोजित करते. या क्षेत्रात युवकांना रोजगार व नोकरीच्या अनेक संधी असून नुकतेच पुण्यामध्ये संस्थेतर्फे मोठ्या जॉब फेअरचेही आयोजन करण्यात आले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@