बिगरभाजप पर्यायाचा अमिबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |


बिगर भाजपवाद हा नेमका या अमिबासारखा आहे. याचा नेमका आकार निश्चित नाही, पण जेव्हा हा मोठा होतो तेव्हा याचेही दोन किंवा अधिक तुकडे होतात. या बिगर भाजपवादाचे अनेक प्रकार आहेत आणि केवळ सत्ताधारी पक्षाला विरोध या एकमेव विचारसरणीवर हे परजीवी अवलंबून असतात.


 

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असा नारा पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच दिला. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय पक्षांनीही कमीपणा घ्यायला हवा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सध्या भाजप केंद्रात बहुमताने सरकार चालवत आहे आणि शिवसेनेने कितीही नाटकं केली, तरी राज ठाकरेंच्या व्यंगचित्राप्रमाणे उद्धव ठाकरे काही सरकारमधून बाहेर पडणार याची तशी चिन्हं नाहीत. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षांच्या हाती कुठलाच ठोस मुद्दा न लागल्याने त्यांना अशा कार्यक्रमांवर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लोकशाहीप्रधान देशात विरोधी पक्षांनी सत्ताधार्‍यांच्या धोरणावर टीका करणे अपेक्षित असते, पण इथे फक्त विरोधाला विरोध म्हणून विरोधी पक्षांनी एकच कल्ला उडवला आहे. पहिला बिगर भाजपवादाचा नारा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी दिला होता. पण, यामुळे निवडणुकीत केवळ अंशतः यश मिळते आणि सरकार चालविण्यासाठी जी कसरत करावी लागते, ती त्यांच्या नंतर लक्षात आलीच. परिणामी, ते रालोआत परत डेरेदाखल झाले. असाच प्रयत्न रामविलास पासवान यांनी केला. पण, यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आला आणि तेही माघारी वळले. कॉंग्रेसलाच बिगर भाजपवादाचा नारा द्यावा लागणे, ही खरेतर कॉंग्रेस पक्षाची शोकांतिका म्हणायला हवी. कोणे एकेकाळी लोहियांनी त्यावेळी प्रस्थापित असलेल्या कॉंग्रेसच्या विरोधात बिगर कॉंग्रेसवाद पुढे केला. भारतीय राजकारणात लोहियांनी जो बिगर कॉंग्रेसवाद मांडला, त्याला कमालीचे यश मिळाले. बिगर कॉंग्रेसवादातून कॉंग्रेसविरोधी पक्षांची मोट बांधायची. त्यातून सत्ता हस्तगत करायची हा एककलमी कार्यक्रमया बिगर कॉंग्रेसवादाचा होता. १९६७ पासून यामुळे राज्याराज्यात कमालीची राजकीय अस्थिरता निर्माण झाली. आमदार फोडणे, सत्ता स्थापन करणे, सरकार कोसळणे ही नित्याचीच बाब झाली. याचे मूळ कारण प्रत्येकाला मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा. १९७७ साली या बिगर कॉंग्रेसवादाने अत्युच्च सीमा गाठली. बिगर कॉंग्रेसवादातून जनता पक्ष हा विरोधी पक्षांनी निर्माण केलेला पक्ष निर्माण झाला. परस्परविरोधी मतांचे हे कडबोळे एकत्र आले आणि त्यांनी केंद्राची सत्ता हस्तगतही केली. ती १९८० साली मतभेदावरून गेलीही. केवळ विरोधाचे राजकारण करून सत्ता हस्तगत करता येते पण सरकार चालवता येत नाही, हे यावरून सिद्ध झाले.


शरद पवारांनीही हा बिगर कॉंग्रेसवाद महाराष्ट्रात १९७८ साली राबवला आणि त्याला ‘पुरोगामी लोकशाही दल’ असे गोंडस नाव दिले. या आघाडीत समाजवादी आणि जनसंघ असे दोन टोकांचे पक्षही सामील झाले होते. दोन वर्ष हे सरकार टिकलेही, पण १९८० साली इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर त्यांनी हे सरकार बरखास्त केले. १९८९ सालीही जेव्हा व्ही. पी. सिंगांनी विरोधी पक्षांची मोट बांधली, तेव्हाही त्यांना आपल्या पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. हेच पुढे देवेगौडा आणि गुजराल यांच्या कारकिर्दीवरून लक्षात येते. देवेगौडा आणि गुजराल यांच्या आघाडी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना सत्तेपासून रोखणे हा समान दुवा होता. यामुळे भारताने औटघटकेचे आणि अकार्यक्षमपंतप्रधानही पाहिले. प्रत्येक विरोधी पक्षाने बिगर कॉंग्रेसवादाच्या नावाने स्वतःचे कॉंग्रेसीकरण करून घेतले आहे. प्रत्येक पक्षाचे एक हायकमांड, त्यांची घराणेशाही, आर्थिक हितसंबंध त्यांनी जपले आहेत. व्यवस्थेविरोधी लढता लढता हे विरोधी पक्ष स्वतःच व्यवस्थेचा भाग झाले आणि विस्थापितांच्या बाजूने लढण्यापेक्षा प्रस्थापितांनाच कुरवाळण्यास त्यांनी सुरुवात केली. हे भारतीय मतदारांच्या लक्षात आले आणि केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत त्यांनी मिळवून दिले. इतकेच नव्हे तर राज्यात प्रादेशिक आणि इतर राष्ट्रीय पक्षांनी आपले बालेकिल्ले निर्माण करून वेगळी सरंजामशाही निर्माण केली. याचे नुकसान नागरिकांना आणि नव्याने राजकारणात येणा-या तरुणांना झाले. हे नुकसान भाजपने भरून काढले. लोकांमध्ये नवी आशा निर्माण केली, तरुणांना भाजपसारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे करत असताना इतर विरोधी पक्ष आपल्यातच मश्गुल होते. बिगर भाजपचा हा अमिबा आहे. अमिबा हा अतिशय सूक्ष्मप्राणी असतो. अमिबा एका ठराविक आकारमानाइतका वाढला म्हणजे द्विभाजन क्रियेने त्याचे प्रजनन होते. या क्रियेत अमिबाच्या शरीराचे दोन तुकडे होऊन दोन स्वतंत्र प्राणी होतात. अमिबाच्या पुष्कळ जाती विविध प्राण्यांच्या अन्नमार्गात परजीवी असतात, यापैकी काही रोग उत्पन्न करणाऱ्या असतात. बिगर भाजपवाद हा नेमका या अमिबासारखा आहे. याचा नेमका आकार निश्चित नाही, पण जेव्हा हा मोठा होतो तेव्हा याचेही दोन किंवा अधिक तुकडे होतात. या बिगर भाजपवादाचे अनेक प्रकार आहेत आणि केवळ सत्ताधारी पक्षाला विरोध या एकमेव विचारसरणीवर हे परजीवी अवलंबून असतात. यापैकी काही रोग म्हणजेच राजकीय अस्थिरता आणि इतर प्रश्न निर्माण होतात.


सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवण्याचे महत्कार्य विरोधी पक्षांचे असते, पण फक्त विरोधाला विरोध करून प्रश्न सुटत नसतात. ते वाढत जातात. पक्षीय लोकशाही हा भारतीय राजकारणाचा गाभा आहे. सत्तेत येण्यासाठी पक्ष धडपड करतच असतात. पक्षाचा मुख्य हेतू हा सत्ता हस्तगत करणे हाच असतो यावर दुमत नाही, पण फक्त विरोधी पद्धतीचे राजकारण करणे हे चुकीचेच आहे. देशाला प्रभावी विरोधी पक्षाची गरज आहेच. त्यामुळेच सक्षमलोकशाही टिकून राहील. या सगळ्या उठाठेवी करत सत्तेची स्वप्ने पाहण्यापेक्षा विरोधात प्रभावी कामकरणे, लोकांचे प्रश्न सोडवणे हे कधीही चांगले. त्यामुळे विरोधी पक्षाने सक्षमराजकीय पर्याय म्हणून समोर यावे. असल्या अमिबांची पैदास करू नये.
 
 
@@AUTHORINFO_V1@@