इये बाजाराचिये नगरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
 
 
दि. २३ जानेवारी रोजी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (लोकप्रिय परिभाषेत ‘Sense’) ३६ हजार अंशाचा टप्पा पार केला. त्याच दिवशी साधारण त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘Nifty' नेही ११ हजार अंशांची पातळी पार केली. जणू काही २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या शेअर बाजाराने तीन दिवस आधीच साजरा केला. नाहीतरी नंतरच्या घटना आधीच विचारात घेण्याची बाजाराची जुनी सवय आहे.
 
 
आपला शेअरबाजार अशा विक्रमी पातळीवर असताना अजून एक गोष्ट लक्षात येते ती अशी की, ३५ हजार ते ३६ हजार हा १००० अंशांचा प्रवास ‘Sense’ने कामकाजाच्या अवघ्या सहा-सात दिवसांत पार केला आहे. हा वेग अचंबित करणारा असला तरी असा प्रकार काही पहिल्यांदाच घडत नाहीय. असला तर फरक इतकाच आहे की, या प्रवासाला १९९० च्या दशकाप्रमाणे आर्थिक घोटाळ्यांची पार्श्वभूमी सध्याच्या वेगवान प्रवासामागे नाही. निदान आजमितीला तरी तसे उघड झालेले नाही.
 
 
त्यामुळे आज या विक्रमी टप्प्याची शहानिशा करताना जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या अपेक्षा किंवा उद्दिष्टापेक्षा आपला आर्थिक विकासाचा दर जरी कमी असला तरी आजमितीला पाच-सहा टक्क्यांपेक्षा जास्त दर असणार्‍या जगातील मोजक्या देशांत आपल्या देशाची गणना होते. आपल्या देशाच्या सक्षम आणि सुरक्षित सौदापूर्तीमुळे (सेटलमेंट सिस्टम) विदेशी वित्तसंस्था आपल्य देशाची गुंतवणुकीसाठी निवड करतात. गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा तो परिणाम आहे. या विदेशी वित्तसंस्थांनी वेळोवेळी जरी नफारूपी विक्रीचे (profit booking) तंत्र वापरले, तरी त्यांच्या विक्रीच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खरेदी करण्याचे तंत्र आणि क्षमता आपल्या देशांतर्गत वित्तसंस्था अमलात आणत आहेत. आपण सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडात केलेल्या अभूतपूर्व गुंतवणुकीचा तो परिणाम आहे.
 
 
या वेगवान प्रवासात अजून एका घटकाचा हातभार असू शकतो. भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) संघटनेने (EPFO) अलीकडेच त्यांच्या एकूण गुंतवणूकयोग्य रकमेच्या २६ टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. आजमितीला ही मर्यादा १५ टक्के इतकी आहे, पण प्रत्यक्षात सरासरी १३ टक्के इतकीच रक्कम शेअर बाजारात गुंतवली गेली आहे. म्हणजे, ही मर्यादा दुपटीने वाढली आहे. तसेच वैयक्तिकरित्या सभासदाला वाढीव प्रमाणात त्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातील रक्कमशेअर बाजारात गुंतविण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे ‘EPFO’ने याआधीच जाहीर केले आहे. तसेच दोन वर्षांपूर्वीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारी कर्मचार्‍यांना ‘EPFO’ आणि ‘NPS’ यांपैकी एकाची निवड करण्याची संधी देण्याची तरतूद होती. त्याबाबतची नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर होतील, अशी बातमी आहे. या तिन्ही गोष्टी अजून झालेल्या नाहीत, पण जसजशा या गोष्टी अमलात येतील, तसतसे शेअर बाजाराकडे वळणार्‍या किंवा निदान वळू शकणार्‍या पैशांच्या प्रमाणात लक्षणीय आणि तीही सातत्यपूर्ण वाढ होईल. भविष्य निर्वाह निधीत आज असणारा पैसा आणि त्यात दरमहा पडणारी भर यांचे प्रमाण इथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. तसेच आगामी गोष्टी आधीच विचारात घेण्याची बाजाराची वृत्ती (डिस्काऊंट करणे) हे त्याचे सूत्र आहे. मकरसंक्रांतीचा तिळगूळ वाटण्याची शेअरबाजाराची ही तर्‍हा सुखद आहे. मात्र, या तिन्ही गोष्टी अजून झालेल्या नाहीत. पण, या वेगवान प्रवासाचे वर्णन ‘बाजाराची पतंगबाजी’ किंवा ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ किंवा ‘बाजारात तुरी आणि भट भटनीला मारी’ असं करावं लागेल का? हे मात्र येणारा काळच ठरवेल.
 
 
निर्देशांकाच्या या विक्रमी पातळीचा आणि वेगवान प्रवासाचा विचार करताना एक बाब मात्र नजरेआड करून चालणार नाही. ती बाब म्हणजे, आता थोड्याच दिवसात सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प. असा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपल्या शेअर बाजारात घसरण होण्याची जुनी परंपरा आहे.
 
 
या सध्याच्या तेजीचा एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून विचार करताना हे लक्षात घेतले पाहिजे की, निर्देशांकातील या वाढीला उलाढालीच्या प्रमाणातील वाढीची साथ आहे आणि अशी उलाढाल आणि बाजारभाव अशी दोन्हीतली वाढ ही काही मोजक्याच शेअर्सपुरती मर्यादित नाही. त्यात लक्षणीय संख्येने कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. पण, अशा शेअर्समधील बहुतांश शेअर्स हे Large Capital Based अशा कंपन्यांचे आहेत. त्यात Small Capital Based कंपन्यांचे शेअर्स फारसे नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अनोळखी कंपन्यांच्या शेअर्सच्या वाट्याला तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी जाणे टाळलेलेच बरे! कारण, बाजाराचा निर्देशांक जेव्हा खाली यायला लागतो तेव्हा सगळ्यांत पहिल्यांदा आणि सगळ्यात जास्त प्रमाणात शेअर्सच्या किमती खाली येतात, अशी याआधीच्या काळाची साक्ष आहे .
 
 
अशा परिस्थितीत माझ्या-तुमच्यासारख्या गुंतवणूकदारांनी स्वत:च्या पोर्टफोलियोची तपासणी करणे उपयुक्त ठरेल. त्यातही अशी तपासणी करताना आपल्याजवळील शेअर्सच्या खरेदीचा दर (Cost of ­acquisition) याचा विचार न करता 'Cost of Holding' चा विचार करणे जास्त फायद्याचे ठरेल. जिथे शक्य आहे आणि आवश्यक आहे तिथे आणि त्या प्रमाणात काही प्रमाणात तरी हा नफा प्रत्यक्ष खिशात घालणे महत्त्वाचे आहे. असा नफा जर तुमच्या सार्वकालिक गुंतवणुकीत परावर्तित केलात तर मग एकदम सोने पे सुहागा! केंद्र सरकार जसं केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थसंकल्पपूर्व आढावा (Economic Survey) सादर करतं, तसा हा विक्रमी टप्पा आणि वेगवान प्रवास हा बाजाराने सादर केलेला अर्थसंकल्पपूर्व आढावा आहे, असं समजण्यास हरकत नसावी.
 
 
इये शेअर बाजाराचिये नगरी विवेके लक्ष्मी वास करी...
 
 
 
- चंद्रशेखर टिळक

 
@@AUTHORINFO_V1@@