जावडेकरांचे अभिनंदन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2018
Total Views |

डार्विनची थिअरी मान्य केल्यास ऍडमआणि इव्ह, सर्प आणि सफरचंद यांची कथाच एक मिथक होऊन जाईल. याचीच भीती तिथल्या धर्ममार्तंडांना वाटत होती. युरोपात यावर काही काळ चर्चा, वादविवादही झाले आणि त्यातून हळूहळू चर्चनेही डार्विनच्या सिद्धांतावर फारकत घेणे बंद केले. पुराणातल्या कथा श्रद्धेचा विषय आहेत, पण श्रद्धेच्या चष्म्यातून आधुनिक विज्ञानावर शंका व्यक्त करणे घातक आहे. अशा मागण्या याच मानसिकतेतून केल्या जातात.




केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्याच खात्याचे राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांना घरचा आहेर दिला. वैज्ञानिक बाबतीत ढवळाढवळ न करण्याची समजही त्यांनी डॉ. सिंह यांना दिली. जावडेकरांचे यासाठी विशेष अभिनंदन केले पाहिजे. त्याचे कारण असे की, डॉ. सत्यपाल सिंह जे काही काल बोलले, त्यामुळे हिंदुत्व विचारांवर विश्वास ठेवणार्‍या तर्कनिष्ठ मंडळींची मोठी कुचंबणा झाली होती. संघ व परिवार संघटना कशा जुनाट विचारांच्या आहेत व त्यांना आधुनिकतेचे पूर्णत: वावडे कसे आहे, याची काही डाव्या मंडळींनी प्रमेये तयार केली आहेत. आपल्या माध्यमांतल्या धु्वपदांमुळे अशा मंडळींना आपली प्रमेये पुन्हा पुन्हा पाजळायला संधी मिळत असते. यावेळी त्यानींही या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. सत्यपाल सिंह उत्क्रांतीचा जनक चार्ल्स डार्विन यांनाच निकालात काढायला निघाले होते. देशभरातील बहुसंख्य वैज्ञानिकांनी सत्यपाल सिंह यांचा निषेध केला. वस्तुत: सत्यपाल सिंह यांना संघ, भाजप अशी काही पार्श्वभूमी नाही. आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात कामकेले आहे व पोलीस दलातील विविध वरिष्ठ पदे त्यांनी भूषविली आहेत. २०१४च्या निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये आले आणि त्यांचे कोटकल्याण झाले. माणूस निवडणुकीत निवडून आला किंवा लोकांनी त्याला निवडून दिले आहे असे झाले की, आपल्याला जगातील सर्वच विषयांवर भाष्य करण्याचा अधिकार प्राप्त झाला, असा काही राजकारण्यांचा समज असतो. सत्ता सदा सर्वदा आपल्यासाठीच आहे हा त्या समजाचाच दुसरा भाग मानावा लागेल. त्यामुळे अशी मुक्ताफळे बर्‍याच राजकारण्यांकडून उधळली जातात. खुद्द नरेंद्र मोदींनी अशा बोलघेवड्या राजकारण्यांना ‘मुँह के लाल’ असे संबोधून योग्य तो धडा घेण्याचा समजवजा सल्ला मागेच दिला होता. मात्र, अनेकांनी अद्याप त्यातून बोध घेतल्याचे दिसत नाही. लोकशाहीत प्रत्यक्षाइतकेच प्रतिमेलाही महत्त्व असते. आपण सतत काय बोलत राहातो, त्यावर हळूहळू आपली प्रतिमा निर्माण होत जाते. दुर्दैवाने डॉ. सिंहही या प्रक्रियेत आपले योगदान देऊन मोकळे झाले आहेत.
 
विज्ञान आणि श्रद्धा ही मानवी जीवनातली दोन महत्त्वाची मूल्ये आहेत. विज्ञानाला मूल्य मानणारी अनेक माणसे आपल्याकडेही झाली आहेत. पाश्चात्त्यांनी आपल्या ज्ञानाचे प्रमाणिकरण करण्याची शिस्त अंगी बाणवली आणि आज मानवी जीवनाला उपकारक ठरू शकतील, असे अनेक प्रयोग प्रचलनात आले. ‘कोऽहम्? म्हणजेच ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न जसा भारतीय तत्त्वज्ञानाने केला, तसाच तो पाश्चात्त्य जीवशास्त्रानेदेखील केला. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा याच अभिव्यक्तीचा सशक्त आविष्कार मानला पाहिजे. धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था मानणार्‍या मंडळींना अशा प्रयोगांचे, त्यातून निर्माण झालेल्या निष्कर्षांचे वावडे असल्याचे युरोपने पाहिले. डार्विनची थिअरी मान्य केल्यास ऍडमआणि इव्ह, सर्प आणि सफरचंद यांची कथाच एक मिथक होऊन जाईल, याचीच भीती तिथल्या धर्ममार्तंडांना वाटत होती. युरोपमध्ये यावर काही काळ चर्चा, वादविवादही झाले आणि त्यातून हळूहळू चर्चनेही डार्विनच्या सिद्धांतावर फारकत घेणे बंद केले. १८५९ साली डार्विन यांनी मानवी उत्क्रांतीची थिअरी मांडली आणि १९५० साली पोप पायस बारावा यांनी ख्रिस्तीमत व उत्क्रांतीच्या थिअरीमध्ये काहीही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. त्यातही काही अटी घातल्याच व ख्रिश्चनांना चर्चने मान्य केलेल्या केलेल्या ईश्वरनिर्मित उत्क्रांतीमध्ये विश्वास न ठेवण्याची मुभादेखील देऊ केली. ही मुभा म्हणजे विज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांनी धर्मापासून दूर जाऊ नये म्हणून चाणाक्षपणे काढण्यात आलेली पळवाट होती. विज्ञानाचे अस्तित्व स्वीकारले तरी सर्वसामान्य माणूस धर्माची कास सोडतोच असे नाही. त्यामुळे हे दोन्ही घटक परस्परांचा आदर करीत एकत्र नांदले तर काहीच हरकत नसावी. श्रद्धेला विज्ञानाची कसोटी लावता येत नाही, तसेच विज्ञानालाही सत्य, पुरावे, परिणाम, प्रमाणिकरण या निकषांच्या आधारांशिवाय आव्हान देता येत नाही. डार्विनच्या सिद्धांतालाही आव्हान देण्याचे प्रयत्न झाले. ते झाले नाही असे मुळीच नाही, पण ज्या ताकदीने डार्विनचा सिद्धांत मांडला गेला तो आजतागायत कुणीही खोडू शकलेले नाही. किमान तसा कुठलाही पर्यायी पुरावा अद्याप तरी समोर आलेला नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात अशी आव्हाने, प्रतिआव्हाने देण्याचे काम अव्याहतपणे चालू असते. मात्र, ही जुगलबंदी वैज्ञानिक कसोट्यांवरच होते. कुणाला काहीतरी वाटले म्हणून ते बदलता येत नाही. सत्यपाल सिंह यांनी डार्विनची थिअरी पाठ्यपुस्तकातून काढण्याची भाषा केली आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. यासाठी चर्चेची नव्हे, तर संशोधनाची गरज आहे. जावडेकरांनी त्यांना सुनावले तसे, हा पूर्णपणे वैज्ञानिकांचाच मामला आहे. धार्मिक साहित्यातील अनेक घटना निकष मानून त्याच्या आधारावर विविध मागण्या करणे लोकशाहीत अशक्य नसले तरी ते समाजमान्य व्हायचे असेल, तर त्याचे कृतिरूप वास्तवही समाजासमोर मांडावे लागते. जगातल्या सर्वच धर्मात हवेत उडणार्‍या व्यक्तींच्या व त्यांच्या वाहनांच्या चर्चा आहेत. मात्र, किफायती दरात व सर्वांना परवडेल अशा दरात चालणार्‍या विमानसेवा हेच खरे वास्तव आहे. पुराणातल्या कथा श्रद्धेचा विषय आहेत, पण श्रद्धेच्या चष्म्यातून आधुनिक विज्ञानावर शंका व्यक्त करणे घातक आहे. अशा मागण्या याच मानसिकतेतून केल्या जातात. एकात्ममानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे फार सुरेख उद्बोधन आहे- ‘‘इतिहासापासून प्रेरणा घ्यावी, पण तोच आपल्या कर्तृत्वाचा सर्वोच्च बिंदू आहे, असे मानू नये. वर्तमानाचे भान ठेवावे, पण त्याच्या मर्यादांनी स्वत:ला बांधून घेऊ नये. इतिहासापासून प्रेरणा घेत, वर्तमानाचे भान ठेवत भविष्याच्या कालपटलावर आपल्या कर्तृत्वाची पदचिन्हे उमटविण्याची जिद्द बाळगावी.’’
 
 
@@AUTHORINFO_V1@@