भूमिपुत्र बनला शिक्षणाचा अग्रदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2018
Total Views |

गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आलेले दादाभाऊ हरिभाऊ भदाणे यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले तर कोणत्याही सर्वसामान्य निवृत्त व्यक्तीप्रमाणे भासते. ८४ वर्षांचे वय असलेले दादाभाऊ हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुसाणे येथील एका शिक्षणसंस्थेचे संस्थापक आहेत. साधे शेतकरी असलेल्या दादाभाऊ यांनी शिक्षणसंस्था कशी स्थापन केली, हा भूमिपुत्र शिक्षणाचा अग्रदूत कसा बनला, त्याची कहाणी रंजक आणि प्रेरक आहे. दादाभाऊ यांचे आजोबा अशिक्षित होते. त्या काळात इंग्रज सरकारने पोलीस पाटील बनण्यासाठी शिक्षणाची अट घातल्याने ते पोलीस पाटील बनू शकले नाहीत. त्या काळात वंश परंपरेने मिळणारे हे पद मिळाले नाही म्हणून आजोबांनी आपला मुलगा हरिभाऊ यास व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिकविले. त्यामुळे हरिभाऊ पोलीस पाटील होऊ शकले. आजोबांची मनीषा पूर्ण झाली. तोच वारसा चालविण्यासाठी हरिभाऊ यांनीदेखील चिरंजीव दादाभाऊ यांना तालुक्याच्या गावी साक्री येथे सातवीपर्यंत शिकविले. त्यानंतर दादाभाऊ यांनी धुळे येथे आठवी ते अकरावी जुनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तोवर शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटलेले होते, म्हणून दुसाणेसारख्या आज १५ हजार वस्तीच्या आणि त्या काळात अत्यंत लहान खेडे असलेल्या गावात दुसाणे एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी १९६४ मध्ये केली. या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा आदर्श समोर असल्याने शाळेला महात्मा फुले यांचेच नाव दिले. या शाळेचा विस्तार होऊन १९७२ मध्ये कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयदेखील त्यांनी सुरू केले. खेडेगावात शिक्षण घेणार्‍या मुलींच्या राहण्याची व्यवस्था नसते म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या छात्रालय स्थापन केले. सध्या या शाळेत साडेसतराशे शिक्षण घेत आहेत. या सर्व संस्था अनुदानित आहेत. शिक्षक आणि अन्य कर्मचारी मिळून ४३ जणांचा स्टाफ तेथे आहे. या संस्थेमार्फत बालसंस्कार केंद्र, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे बी. ए. साठीचे अभ्यास केंद्रदेखील चालविले जाते. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी महाराष्ट्र राज्य तेलबिया उत्पादक महासंघाचे चेअरमनपद देखील भूषविले आहे. तसेच दुसाणे येथील श्री त्र्यंबकेश्वर पाणी वापर सहकारी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्षदेखील आहेत.
 
सध्या दादाभाऊ यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला असून शाळेचा कारभार आपले पदवीधर असूनही शेती करणारे चिरंजीव रोहित दादाभाऊ भदाणे यांच्याकडे सोपविला आहे. दादाभाऊ मात्र नाशिकमध्ये राहतात. नातवंडे सांभाळण्यात रमतात. त्यांच्या शिक्षणाची सोय नाशिकमध्येच केलेली आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, धार्मिक कार्यक्रमात दादाभाऊ सदैव अग्रेसर. जगातील बहुतेक देशांतून त्यांनी भ्रमण केले असून अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. परदेशात गेल्यावर इंग्रजीचे ज्ञान अल्प असल्याने काही अडचणी येतील, असे त्यांना वाटले होते. मात्र, एका ठिकाणी पाकीट हरविल्यावर आलेला अनुभव वगळता चांगले अनुभव मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यावेळी देखील तेथील पोलिसांनी लगेच दखल घेऊन तातडीने मदत करून सोय करून दिल्याबद्दल ते कृतार्थभाव व्यक्त करतात.आपल्याला जे प्राप्त झाले ते शिक्षणामुळेच, अशी त्यांची भावना आहे. शिक्षणामुळे आपले वर्तन, चालणे, बोलणे सुधारले, विविध कामे आपण करू शकतो, असे त्यांना वाटते. ‘‘आपल्या देशातील भेदभाव आता कमी झाले असून शिक्षणाने नवी क्रांती झाली आहे. पूर्वीची गुलामगिरीची भावना आता राहिलेली नाही. शिक्षण नसते तर आपली गुलामगिरी कायमराहिली असती. गुलामगिरीची मनोवृत्ती कमी होण्यासाठी शिक्षणाची मदत झाली,’’ असे शिक्षणाशी संबंधित त्यांचे थोर विचार आहेत. आपण सामाजिक कार्य करू शकलो, याचे कारण आपली लोकशाही आहे, असे त्यांना वाटते. अजूनही निरामय ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरूच असते. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदेच्छा...
 
- पद्माकर देशपांडे 
@@AUTHORINFO_V1@@