विषमुक्त शेतीसाठी ‘दत्त’मार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |

सरसंघचालकांच्या प्रबोधनाने प्रभावित बनगिनवार यांचा सेंद्रीय शेती प्रयोग

रासायनिकच्या तुलनेत २५ टक्के खर्च


दिग्रस : राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून यवतमाळ जिल्हा कुप्रसिद्ध आहे. त्यातच कापसावरील बोंडअळीने व त्यावरील रासायनिक फवारणीमुळे जिल्ह्यात अनेक शेतकरी व मजूर मृत्युमुखी पडले. त्यामुळे हा जिल्हा आता विषबाधीत जिल्हा म्हणूनही कुख्यात झाला आहे. मात्र, अशाही अवस्थेत ‘दत्त’मार्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दाखवून दत्तात्रय बनगिनवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तालुका संघचालक दत्तात्रय तुकाराम बनगिनवार यांची मांडवा येथे २५ एकर शेती आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे पारंपारिक शेतीवरील प्रबोधनाने प्रभावित होऊन ते सेंद्रीय शेतीकडे वळले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक फायदा झाला. यामुळे उत्साहित झालेले बनगिनवार शेतीवर नवनवीन प्रयोग करून पीक घेत आहेत. 

गेल्या तीन वर्षांत त्यांनी पारंपरिक नैसर्गिक सेंद्रीय शेती करून परिसरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी घेतलेल्या पिकांपैकी उडीद, तूर, सोयाबीन व कापूस हे उत्तम दर्जाचे व फायदेशीर झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग न करता केवळ पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने वार्षिक खर्चा पैकी ७५ टक्के खर्च वाचला असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच रासायनिक शेतीच्या तुलनेत २५ टक्के खर्चात बनगिनवारांनी सेंद्रीय शेती यशस्वी केली.

दरवर्षी रासायनिक व कीटकनाशक औषधांवर बनगिनवार १ लाख ३० हजार रुपये खर्च करायचे. तरीसुद्धा समाधानकारक उत्पन्न होत नव्हते. सेंद्रीय शेतीला सुरवात केल्यावर त्यांचे केवळ १७ हजार रुपये खर्च झाले. उत्पन्न तितकेच, परंतु दर्जेदार व विषरहित. लोकांनी उडीद, मूग, तूर, सोयाबीन शेतात जाऊन विकत घेतल्याने घरबसल्या फायदा झाला. विशेष म्हणजे दरवर्षी लागणारे १ लाख ३० हजार रुपये वाचल्याने ही रक्कम त्यांना ‘बोनस’ ठरली. यावर्षी त्यांनी २५ एकर शेती सेंद्रीय पद्धतीने केल्याने अल्प पावसातही त्यांना फायदाच झाला. त्यांचे हे यशस्वी नियोजन पाहून परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीचा ‘दत्त’मार्ग जाणून घेत आहेत. 

रासायनिक शेतीमुळे अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. शेतीची सुपिकता तर जातेच परंतु मानवी शरिरात अन्नधान्य व भाज्यांमधून अनेक हानीकारक कीटकनाशक जात असल्याने अनेक आजार बळावले आहेत. शिवाय शेतातील पिकाला रासायनिक खते टाकल्यावर हे घटक पावसामुळे वाहत जाऊन नदी नाले, तलाव, विहीर व हातपंपाच्या पाण्यात मिसळत असल्याने पिण्याचे पाणीही दूषित झाले आहे.  त्यामुळे निसर्गाला टिकवायचे असेल तर आज नैसर्गिक पारंपरिक शेती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे दत्तात्रय बनगिनवार सांगतात.
-अभय इंगळे 
@@AUTHORINFO_V1@@