भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेचा १६ वा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
ठाणे : दि. २१ जानेवारी रोजी भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेचा १६ वा गौरव पुरस्कार सोहळा राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ. विवेकानंद वडके हे खाद्यतेल निर्मिती क्षेत्रातील तसेच अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ, सल्लागार असून रा. स्व. संघाचे ठाणे जिल्हा संघचालक आहेत. त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपद भूषविले व त्यांच्या हस्ते गौरवमूर्तींचा सत्कार झाला.
 
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम रा. से. समितीच्या दिवंगत प्र. संचालिका व उषा चाटी यांचे पुण्यस्मरण करून त्यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षा डॉ. विद्या नानल यांनी त्यांच्या प्रास्ताविकात महिला वसतिगृह, कमलिनी कर्णबधीर विद्यालय, योग स्वास्थ्य केंद्र, रुग्ण सहाय्यिका प्रशिक्षण, सुदृढ बालक प्रकल्प इ. उपक्रमांची माहिती सांगून गौरव पुरस्काराच्या उपक्रमाविषयी सांगितले. मंजुषा शेंडे यांनी गायलेल्या ‘समायानुकूल चिंतन’ या वैयक्तिक गीतानी सुंदर वातावरणनिर्मिती झाली.
 
तब्बल वीस वर्षांपासून ओरिसा प्रांतात अत्यंत विषम परिस्थितीत समितीकार्य करणार्‍या समितीच्या प्रचारिका लतिका पाधी यांना लक्ष्मीबाई केळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ’’माओवाद्यांच्या वर्चस्वाखालील वनवासी क्षेत्रात जाऊन काम करताना काय अडचणी येतात. तसेच वनवासी क्षेत्रांमध्ये आजच्या काळातही काय प्रथा आहेत, त्यांच्या काय गरजा आहेत याचा विचार करून केल्या जाणार्‍या कार्याबद्दलचा गौरव हा माझा एकटीचा नसून माझ्या सार्‍या सहयोगींचाही आहे,’’ असे मनोगत लतिका पाधी यांनी व्यक्त केले.
 
’’जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यांमध्ये ज्या बालिकांनी आपले आप्त व पालक गमावले आहेत, ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत त्यांचा सांभाळ, शुश्रूषा व पुनर्वसन ही कार्ये रा.से. समितीच्या जम्मूमधील छात्रावस्तांमध्ये केली जातात. या छात्रावासातील मुलींचे पालकत्व सांभाळून रुग्णांची सेवा करणार्‍या शीला गोडिया यांचा सन्मान सरस्वतीबाई आपटे सेवा पुरस्कार देऊन करण्यात आला. श्रीफळ, मानचिन्ह, मानवस्त्र व रु. ३५ हजारचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
मतिमंद मुलांचा सांभाळ, पुनर्वसन व त्याविषयी जनजागरण करणार्‍या नागूपरच्या २५ वर्षे जुन्या संज्ञा संवर्धन संस्थेला बकुळ देवकुळे शुभेच्छानिधी देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या ट्रस्टी डॉ. शैला देशपांडे यांनी जिथे देवाचे कार्य संपते तिथे मानवतेचे कार्य सुरू होते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत श्रीफळ, मानचिन्ह, मानवस्त्र व रु. ५०हजार रुपयांचा धनादेश संस्थेच्या वतीने स्विकारला. तसचे संस्थेच्या कार्याची ओळख करुन दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@