ठाण्याला डिजिटल संजीवनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |

ठाणे ठरले देशातील पहिले तर जगातील दुसरे शहर

 

 

ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इस्त्रायल दौर्‍याच्यावेळी सुरू झालेल्या डिजिटल ठाण्याच्या प्रवासाला मंगळवारी एक पूर्णत्व प्राप्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या अभिवादनाला प्रतिसाद देत ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल, पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर मीनाक्षी शिंदे यांनी डिजिटल ठाण्याचा देशातील पहिलावहिला प्रयोग मंगळवारी प्रत्यक्षात आणला.
 
शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाणे तसेच इस्रायलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय यांच्या उपस्थितीत मंगळवारी ’डिजी ठाणे अ‍ॅप’चे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतरचा पहिल्या अर्ध्या तासात जवळपास एक हजार ठाणेकरांनी ’डिजी ठाणे अ‍ॅप’ डाऊनलोड केले.
 
ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, इस्रायलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ठाणे शहराच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, आ. रवींद्र फाटक, टीसीएलचे संचालक परमबीर सिंग, उपमहापौर रमाकांत मडवी, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, स्मार्ट सिटी ठाणेचे संचालक व ठामपा भाजप गटनेते मिलिंद पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
इस्रालयमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर डिजिसिटी प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांसाठी व्यवस्थापनामध्ये बदल, नागरिकांना प्राथमिक, नागरिक केंद्रित प्रशासकीय बदल या स्तरावर आमूलाग्र बदल होणार असून सिटीकार्ड, मोबाईल अ‍ॅप, संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधता यावा यासाठी शाश्‍वत दुहेरी मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. तेल अवीव महानगरपालिका आणि फॉक्सबेरी या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये देशातील पहिला प्रकल्प राबविण्यात येत आहे. डीजी ठाणे हे या सर्व घटकांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होणार असून याचा ठाणे शहराला फायदा होणार आहे.
 
या डिजिसिटी प्लॅटफार्मच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा, नागरिकांचा सक्रिय सहभाग, विविध विभागांशी समन्वय, पारदर्शी कार्यपद्धती, सरकारी यंत्रणा आणि नागरिक आणि व्यावसायिक यांच्यामध्ये समन्वयाचे रिंगण तयार करण्यात येणार असून या माध्यनातून महापालिकेची मूल्यवर्धित सेवा, नागरिकांना व्यावसायिक फायदे मिळणार आहेत. सरकारी सुविधा, माहिती नागरिकांना तात्काळ मिळणार आहे.
 
इस्रायलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, ”भारतातील अनेक शहरांतील लोकांनी अशा डिजिसिटीच्या प्रकल्पाबाबत स्वारस्य दाखवले. मात्र आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या एक वर्षात अविश्रांत मेहनत घेऊन डिजिटल ठाणेच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविले.”
 
@@AUTHORINFO_V1@@