मोदींची मुत्सद्देगिरी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर आहेत, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीही थेट झाले होते अन पंतप्रधानही थेट झाले. त्यांनी कधीही मंत्रिपद भूषविले नव्हते. त्यामुळे त्यांना प्रशासन सांभाळण्याचा अनुभव नाही, जे कधी गुजरातच्या बाहेर पडले नाहीत, ते देश काय सांभाळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण, त्या प्रश्नांची उत्तरे तोंडाने देत न बसता मोदी आपले काम करीत राहिले आणि आज त्यांनी सर्व आघाड्यांवर स्वत:ला यशस्वी सिद्ध केले. ज्या व्यक्तीने कधी राज्याबाहेरचे प्रशासन अनुभवले नव्हते, त्या व्यक्तीने म्हणजे मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार कसा हाताळला हे आपण पाहतोच आहोत. आज जगातल्या सगळ्या प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांशी मोदींनी राजनयिक संबंध प्रस्थापित केले आहेत आणि या राष्ट्रांशी भारताचे सलोख्याचे संबंध राहावेत, या दृष्टीनेही यशस्वी प्रयत्न केले आहेत. राजकीय मुत्सद्देगिरीत आपण कुठेही मागे नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिल्याने टीकाकारांची बोलती आपोआप बंद झाली आहे.
 
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताची विदेशनीती अतिशय मजबूत झाल्याचे तर पाहायला मिळतच आहे, शिवाय वेळोवेळी त्यात लवचिकताही अनुभवास येत आहे. प्रसंगानुरूप मोदी यांनी स्वत:मधील अंगीभूत गुणांचे प्रदर्शनही देशवासीयांना घडविले आहे. ज्या मोदींना देश चालविण्याचा अनुभव नव्हता, त्या मोदींनी जगभर दौरे करून भारताची प्रतिष्ठा वाढविण्याचे महत्कार्य करून सर्व टीकाकारांना समर्पक उत्तर दिले आहे. आताच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारताच्या दौर्‍यावर येऊन गेले. राजशिष्टाचार बाजूला सारत मोदी यांनी विमानतळावर त्यांची गळाभेट घेतली आणि जंगी स्वागतही केले. त्यामागेही मोदी यांचा विशिष्ट हेतू आहे. इस्रायलसारखा देश भारताचा कायम मित्र असला पाहिजे या जाणिवेतून मोदी यांनी राजशिष्टाचार मोडला असावा. त्यामुळे त्यांच्या या कृतीवर टीका करणार्‍यांनी विचारपूर्वक बोलायला हवे.
 
ज्या अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता, त्या अमेरिकेशी मोदी यांनी भारताचे अतिशय मित्रत्वाचे नाते तयार केले, ही काही साधारण बाब नाही. त्यासाठी मोदी यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचा पुरेपूर वापर केला. अमेरिका आज जागतिक महाशक्ती म्हणून ओळखली जाते. कोणत्याही मुद्यावर तातडीने आणि ताकदीने मत मांडण्याची अमेरिकेची क्षमता आहे. त्यामुळे अमेरिकेने मांडलेल्या मताच्या विपरीत भारताचे मत मांडणे तशी काही सोपी गोष्ट नाही. पण, मोदी यांनी याबाबतीतही धाडस दाखविले आहे. अमेरिकेला काय वाटेल, याचा विचार न करता भारताचे हित कशात आहे, याचा विचार करूनच मोदींनी वेळोवेळी मत व्यक्त केले आहे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असतानाचे अमेरिकी प्रशासन आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातले अमेरिकी प्रशासन यातही अंतर आहे. ओबामा यांच्याशी मोदी यांनी प्रयत्नपूर्वक मैत्रीचे संबंध स्थापित केले होते. ट्रम्प यांच्याशीही तसेच संबंध स्थापित करण्याचा मोदी यांचा प्रयत्न जरूर आहे. ओबामा यांना बराक या नावाने एकेरीत हाक मारण्याचे धाडस मोदी यांनी केल्याचे जगाने पाहिले आहे. पण, ट्रम्प यांच्याबाबतीत असे संबंध प्रस्थापित व्हायला कालावधी लागेल, हे निश्चित!
 
अमेरिकेशी टक्कर देण्याचा प्रयत्न आपला शेजारी देश चीन करीत आहे. जागतिक महाशक्ती बनण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. असा चीन आज आपला शेजारी आहे. डोकलाम वाद तात्पुरता मिटविण्यात भारताला यश आले असले तरी चीनकडून पुन्हा याच मुद्यावर तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे सहकार्य आपल्याला मिळणे आवश्यक आहे, हे न ओळखण्याइतपत मोदी अडाणी नाहीत. मोदींना यासंदर्भातले अमेरिकेचे महत्त्व माहिती आहे आणि इस्रायल व अमेरिकेचे संबंधही माहिती आहेत. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांचे स्वागत करताना राजशिष्टाचार मोडला असला तरी त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. शेजारी पाकिस्तान आणि चीनसारखे शत्रू असताना आपल्याला इस्रायल व अमेरिकेसारखे मित्र आवश्यकच ठरतात. हीच बाब हेरून मोदी यांनी भारताचे परराष्ट्र धोरण आखले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
एकीकडे अमेरिकेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करायचे, दुसरीकडे अमेरिकेच्या जवळ असणार्‍या इस्रायलशीही मैत्रिपूर्ण संबंध ठेवायचे आणि त्याचवेळी जगाला हेही दाखवायचे की आमचे परराष्ट्र धोरण हे आमच्या मर्जीने चालते. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशी ताकद आणि परिपक्वता दाखविण्यासाठी राजकीय कौशल्य अंगी असावे लागते आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, हे त्यांनी कृतीने दाखवून दिले आहे. कोणता देश आपला मित्र होऊ शकतो, संकटात कोण कामात येऊ शकतो, हे ओळखण्याची क्षमता मोदींनी स्वत:मध्ये विकसित केली आहे आणि त्याचाच लाभ ते आज देशाला करून देत आहेत, याला महत्त्व आहेच. मोदी यांच्या प्रामाणिकपणावर देशातील जनतेला कोणतीही शंका नाही. गेल्याच आठवड्यात एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर आला. आज निवडणुका झाल्यात तर पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती राहील, या प्रश्नाच्या उत्तरात ६३ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दर्शविली, तर राहुल गांधी यांच्या नावाला १३ टक्केच लोकांनी पसंती दर्शविली. यावरून मोदींची लोकप्रियता आपल्या लक्षात यावी.
 
गेलेली सत्ता परत मिळावी यासाठी काँग्रेसकडून सातत्याने मोदींवर टीकाच केली जाणार आहे. मोदी करीत असलेले काम मनातून कितीही पसंत असले तरी वरून त्यावर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नाही अन सोडणारही नाही. राजकारणात कुणी येतो तो सत्ता मिळविण्यासाठीच. त्यात काँग्रेसने सर्वाधिक काळ देशावर राज्य केले आहे. काँग्रेसची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. मोदींसारखी राजकीय परिपक्वता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे नाही. त्यामुळे पुढल्या निवडणुकीतही ते काँग्रेसला यश मिळवून देतील याची काँग्रेसलाही खात्री नाही. त्यामुळे त्यांनी मोदी, संघ, भाजपा यांच्यावर टीका करणे समजू शकते. मोदींना न आलेले अपयश जनतेपुढे आणणे ही त्यांची गरज आहे. त्यामुळे जनतेने स्वतंत्रपणे आकलन करून आपले मत निश्चित करणेही तितकेच आवश्यक ठरते.
 
असो. मुद्दा आहे मोदींच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा. मध्यंतरी इस्रायलची राजधानी जेरुसलेम करण्यासंदर्भात अमेरिकेने घोषणा केली आणि अमेरिकी दूतावास तिथे हलविण्याचेही जाहीर केले. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे आश्वासन दिले होते. त्यामुळे ते आश्वासन पाळण्यासाठी त्यांना घोषणा करणे आवश्यक होते. आता अमेरिका भारताचा मित्र आहे म्हणून भारताने अमेरिकेची पाठराखण केलीच पाहिजे अशी अपेक्षा कुणी केली असेल तर ती चूक नव्हती. पण, भारताने आशियाई देशांची बाजू घेत अमेरिका आणि इस्रायलच्या विरुद्ध मत दिले. विशेषत: पंतप्रधान मोदी काही दिवसांपूर्वीच इस्रायलचा दौरा करून परतले होते आणि त्यानंतर भारताने अशी भूमिका घेणे, सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे होते. इस्रायलने जेरुसलेमला राजधानी करावे अन तशी घोषणाही अमेरिकेने करावी हे मध्य आशियातील देशांना मान्य नव्हते. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांनी परस्पर सामंजस्यातून हा प्रश्न सोडवावा असा जो प्रस्ताव मध्य आशियातील देशांनी मांडला होता, त्याच्या बाजूने भारताने मतदान केले होते. याला धाडस लागते आणि राजकीय मुत्सद्देगिरीही लागते. ती दाखवूनही भारताने इस्रायलशी असलेले संबंधही कायम ठेवले आणि अमेरिकेशी असलेले मैत्रिपूर्ण संबंधही बिघडू दिले नाहीत. हे लक्षात घेतले तर मोदी परराष्ट्र धोरणातही किती परिपक्व आहेत, हे दिसून येते.
 
 
- गजानन निमदेव
 
@@AUTHORINFO_V1@@