...सारे जहाँ से अच्छा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |
 
 
 
आज २४ जानेवारी आहे, याचा अर्थ परवा २६ जानेवारी आहे. आता २६ जानेवारी म्हणजे नेमके काय आहे, हे विचारले तर अनेकांना ते कळत नाही. कळण्याचे तसे काही कारणही नाही. काही माध्यमे दरवर्षी ही गंमत करत असतात. तरुण पिढीला, आज २६ जानेवारी आहे म्हणजे नेमके काय आहे, असे विचारले जाते. दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि वर्तमानपत्रांत मग तरुणाईने दिलेली धमाल उत्तरे प्रसारित, प्रकाशित केली जातात. प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमके काय, हे बहुतांना माहिती नसते. अगदी भारतीय घटना हा अस्मितेचा विषय करणार्‍यांना आणि ती अस्मिता वारंवार डिवचण्यात ज्यांना मजा येते अशांनाही प्रजातंत्राची स्थापना आणि म्हणून या दिवसाचे गांभीर्य माहिती नसते.
 
विविधतेत एकता, या नावाने आपण आपली पाठ सतत थोपटून घेत असतो. आमचे रंग वेगळे, गंध वेगळे, जात आणि धर्मानुसार आमचे महापुरुष, संत, महात्मे आणि देव वेगेवगळे आहेत. आमची चेतनास्थळेही वेगळी आहेत. अगदी खानपानही वेगळे आहे. विवाहाच्या पद्धती वेगळ्या आहेत. आमचे जीवनप्रवाह आणि पद्धतीही सारख्या नाहीत. वेगळेपण, विविधता हा निसर्ग असला, तरीही निसर्ग नियमानुसार सारेच प्रवाह कुठेतरी एका ठिकाणी एकत्र येत असतात. मिसळून जात असतात. पाण्याचे सर्व प्रवाह समुद्र होतात. सगळे जड पदार्थ माती होतात. सार्‍याच वायूंचे मिलन होऊन त्याचे आभाळ होते... माणसांचे काय? माणसांनी त्यांची ही विविधता अनैसर्गिक पद्धतीने निर्माण केली आहे. त्या विविधतांचा डंभाचार माजविला आहे. त्यांच्या अस्मिता इतक्या टोकदार केल्या आहेत की, त्यावरून सतत युद्धं सुरू असतात. वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेतूनच नव्हे, तर विचारश्रेष्ठत्वाच्याही भावनेतून सतत टकराव होत असतात. हे असे जगातच सुरू असते, भारत त्याला अपवाद नाही, पण किमान त्यात आघाडीवर तर असायला नको. विविधतेत एकता, ही आता गंमत ठरते आहे. सगळेच प्रवाह अगदी समांतर धावत सुटले आहेत आणि ते कुठेतरी एका बिंदूला छेदून जाण्याची काही चिन्हेही दिसत नाहीत. या विविधतेचा संगम केवळ स्वातंत्र्य दिनाच्या अन् प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येच देखावा म्हणून निर्माण केला जावा काय?
 
मी जन्माने काय असलो पाहिजे यावर माझे काहीच नियंत्रण नाही... हे खरे आहे. मग हिंदू असतो, मुसलमान असतो, ख्रिश्चन, बौद्ध... असे काहीही असतो. मात्र, तसाच मी कुठल्या देशात जन्म घ्यायचा, हेही माझ्या हातात नसते अन् मग त्या न्यायाने मी भारतीयदेखील असतो. प्रश्न हा आहे की, मी आधी भारतीय असतो की हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त...? गेल्या काही वर्षांत माझे वर्तन भारतीय म्हणून किती आणि अमक्या धर्माचा- जातीचा म्हणून किती? आधी धर्मराज्य की आधी राष्ट्रधर्म? आमच्या राष्ट्रीय अस्मितांचे काय? त्यात तर एकतानता असायला हवी की नाही? राष्ट्रीय प्रतीकं आणि त्यांच्या सन्मान, आदराच्या पद्धती तरी एक असायला नको का? की त्यातही नाना तर्‍हाच? राष्ट्रगीत निनादत असताना त्याच्या सन्मानार्थ उभे राहणे अन् मानवंदना द्यायला हवी, यावरही आमची एकवाक्यता नाही. राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिले नाही याचा अर्थ आम्ही राष्ट्रद्रोही कसे, असा सवाल केला जातो. राष्ट्रगान म्हणणे आमच्या धर्माला मान्य नाही, या देशाची माती कपाळाला लावणे म्हणजेच काही देशभक्ती नाही, आमची वेगळी पद्धत असू शकते देशभक्ती दाखविण्याची, हेही मान्य करता येईल एखाद्यांचे; पण ते आमच्या धर्माला मान्य नाही, असे म्हणून त्याला नकार देणे हे कुठल्या नैतिकतेच्या सूत्रात बसते? प्रजासत्ताक आहे, याचा अर्थ ते सार्‍या भारतीयांनी ठरविले आहे. ते सार्‍यांना मान्य आहे. एकदा ते मान्य केल्यावर वारंवार आपले वेगळेपण अन् तेही धार्मिक वेगळेपण ठसविण्यासाठी राष्ट्र म्हणून जी काय अस्मिता आहे, अस्तित्व आहे त्यावर घाला घालण्यात काय अर्थ आहे? त्यातून नेमके काय साध्य करायचे आहे? राष्ट्र या बिंदूपाशी तरी आम्ही एक यायला नको का? भारतमाता म्हणून नाही तर काय म्हणून तुम्ही नतमस्तक होणार, ते ठरून जायला हवे. अमक्या ठिकाणी तिरंगा फडकविलेला आमच्या धर्माला चालत नाही, तमक्या ठिकाणी आणि तमक्या जीवनपद्धतीत देशाचे कायदे चालणार नाहीत... मग केवळ विविधताच राहील, एकता निर्माण होणारच नाही.
 
 
आमचे सहजीवन आहे की सहअस्तित्व? त्यातून एकमेकांच्या मनात असुरक्षितताच निर्माण होते. तो माझ्या वाटचे राखून ठेवलेले हक्क हिसकावून नेईल, ही दुसर्‍याला भीती. याच्या धर्माची मिरवणूक निघाली, तर दुसर्‍याला ते शक्तिप्रदर्शन वाटते. मग तो त्याच्यापेक्षाही मोठी रॅली काढतो. आता देखावेही शक्तिप्रदर्शनाचे केंद्र ठरत आहेत. आम्ही आमच्या धर्मांचेच प्रदर्शन करत असतो- घरात आणि बाहेरही. आमच्या वर्तनावरही धर्मप्रेरणांचाच अधिभार असतो. देशी भावनांचे, विचारांचे साधे पडसादही जाणवत नाहीत. त्यातून अहिताची भावना निर्माण होते आणि देश म्हणून एकत्र येण्याची, संगमित होण्याची संधी आम्ही दवडत असतो. एकमेकांचा द्वेष करण्याचीच कारणे सतत शोधत असतो. त्यासाठी काहीतरी वेगळेपण शोधत असतो. आम्ही एकाच देशात राहणारे असलो तरीही मग वेगळ्या धर्माचे आहोत, एकाच धर्माचे असलो तर वेगळ्या जातीचे आहोत, मग जात एकच असली तर पोटजात असते, सामाजिक स्तर असतो, गाव, मोहल्ला... असे वेगळेपण शोधून ‘तो आपला नाही’ची कारणे शोधतो आणि मग एकमेकांचा मनसोक्त द्वेष करतो, तरीही जागतिक महासत्ता होण्याच्या बाता करतो!
 
 
आम्ही सण, उत्सव आणि आनंदही धार्मिक किंवा जातीयच मनवतो. राष्ट्रीय दिवस असतो. तो अजून सण झालेला नाही. त्यांचे साजरे केले जाणे हे सरकारी आहे. सरकारी कार्यालय, विधिमंडळे आणि संसदेपुरतेच ते मर्यादित आहे. कणाहीन कर्मचारी पाठीचा वाक कसाबसा सरळ करीत या दिवशी तिरंग्याला सलाम करतात आणि पुटपुटल्यागत राष्ट्रगीत म्हणतात. त्यात आत्मविश्वास नसतो. ओळी चुकल्या तर? घरोघरी राष्ट्रीय सण म्हणून हे दिवस का साजरे होत नाहीत? दिवाळीला जशी घरांवर रोशणाई होते, इदेला जशी मिठाई वाटली जाते तसे स्वातंत्र्य दिनाला, प्रजासत्ताक दिनाला का नाही होत? सगळ्याच धर्मांच्या प्रार्थनास्थळांवर का नाही फडकविला जात तिरंगा या दिवशी? अजान आणि आरतीसोबत या दिवशीतरी किमान का नाही म्हटले जात राष्ट्रगीत? का असत नाही या प्रार्थनास्थळांत राष्ट्रदेवतेला स्थान?
 
तिरंगा घेऊन गावोगावी लोकांनीच रॅली काढल्या तर त्यात एकताच असेल. हिरवा, भगवा, निळा... असे रंग नसतील. ही रॅली पाहून कुणालाच असुरक्षितता वाटणार नाही. हे बेटे शक्तिप्रदर्शन करीत आहेत, असेही वाटणार नाही... आम्ही आम्हालाच एका कोंदणात बसवून घेतले आहे. आमच्या सुरक्षित कोपर्‍यातून आम्ही सारेच अंतिम सत्य सांगत असतो. दुसरे मात्र फसवणूक करत असतात. तोही आमचाच एक रंग आहे अन् विविधतेत एकता आहे, तर मग कधीतरी इतक्या आयुष्यात दुसर्‍यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन नतमस्तक होणे वेगळे, पण किमान जाऊन तरी आलो आहे का आम्ही? इतके नावेबोटे ठेवतो, त्याच्याच साठी भांडतो तर पाहून जावे, जाऊन यावे, असे नाही वाटले आम्हाला. सिनेमागृहांत राष्ट्रगीत वाजवावे की नाही, यावर वाद घालतो. आध्यात्मिक बुवा-बाबांच्या सत्संगांत अखेरीस का म्हटले जाऊ नये राष्ट्रगीत? आम्हाला कुठल्या बाबांच्या पोथ्या पाठ असतात. त्याची हजारोंच्या संखेत पारायणे केली जातात. किमान राष्ट्रीय सणांना शहीदांची पोथी का वाचली जाऊ नये? त्याची पारायणे का झाली नाही आजवर? तरीही ‘...सारे जहाँसे अच्छा!’
 
 
- श्याम पेठकर
 
@@AUTHORINFO_V1@@