फुसक्या बारांची कार्यकारिणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2018
Total Views |

राष्ट्रीय कार्यकारिणी स्वत:च्या पक्षाच्या वाढीसाठी होती की नरेंद्र मोंदीच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी, हे उद्धव ठाकरेंनाच ठाऊक. ‘‘बाळासाहेबांच्या पुण्याईने भाजपला हे यश मिळाले,’’ असा दावा आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी केला. आता ही पुण्याई इतकी मजबूत आहे तर नुकत्याच झालेल्या गुजरात आणि त्या आधी गोव्यात झालेल्या विधानसभेत ती खुद्द शिवसेनेच्याच कामी का आली नाही, हे कडेच आहे.
 

 
 
 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एक नेता (शिवसेना पक्ष संघटनेच्या संज्ञेनुसार) रा. स्व. संघाच्या एका मोठ्या पदाधिकार्‍यांच्या घरी गेला होता. शिवसेना-भाजप युती तुटली होती आणि दोघांनीही स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. मोदी लाटेचा अंदाज नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत आला होता. भाजपची वाढलेली ताकद स्पष्ट दिसत होती, पण ती ताकद शिवसेना काही केल्या मानायला तयार नव्हती. अखेर जे व्हायचे तेच झाले. म्हणजे, या नेत्याचेही तेच झाले. ‘‘हिंदुत्वाच्या मुद्‌‌द्यावर तुम्ही मला पाठिंबा दिला पाहिजे,’’ असे या नेत्याचे आर्जव होते. निवडणुकीपूर्वी युतीचे जे झाले ते या नेत्याचे निवडणुकीनंतर झालेच, पण ज्येष्ठतेमुळे मंत्रिपद मात्र मिळून गेले. चिंरजीव आदित्य आता ‘नेते’ म्हणून संघटनेत सामील झाले आहेत. तेच त्यावेळी युतीची बोलणी करीत होते. त्यावेळी प्रकाश जावडेकरांची या विषयावरची टीका बरीच मार्मिक होती. ते म्हणाले,‘‘त्यांनी त्यांच्याकडचा सगळ्यात समजदार नेता बोलणी करण्यासाठी पाठविला.’’ हा सगळा घटनाक्रम पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, नुकतीच पार पडलेली शिवसेनेची कार्यकारिणी. ही कार्यकारिणी ‘राष्ट्रीय’ होती. काही महानगरपालिका आणि मागावून युतीत शिरून मिळवलेली सत्तेची लाचार पदे हीच काय ती राजकीय मिळकत असणार्‍या या पक्षाची ही ‘राष्ट्रीय कार्यकारिणी’ होती. लोकशाहीत कोणीही राष्ट्रीय कार्यकारिणी घेऊ शकते. वांद्य्राहून सी लिंक पकडून वरळीला पोहोचण्यापुरता लवाजमा, झेंडे फडकविणारे कार्यकर्ते असले की राष्ट्रीय नेता होता येते. राष्ट्रीय कार्यकारिणी स्वत:च्या पक्षाच्या वाढीसाठी होती की, नरेंद्र मोंदीच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी हे उद्धव ठाकरेंनाच ठाऊक. बाळासाहेबांच्या पुण्याईने भाजपला हे यश मिळाले, असा दावा आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी केला. आता ही पुण्याई इतकी मजबूत आहे, तर नुकत्याच झालेल्या गुजरात आणि त्या आधी गोव्यात झालेल्या विधानसभेत ती खुद्द शिवसेनेच्याच कामी का आली नाही, हे एक कोडेच आहे. या दोन्ही राज्यांत शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. ‘भाजप काठावर पास झाला,’ असा सेनेच्या मुखपत्राचा मथळा होता. मात्र, स्वत:ला भोपळादेखील फोडता आला नाही याचा मागमूसही बातमीत नव्हता. अशा राष्ट्रीय कार्यकारिणींमध्ये या करंट्या अपयशासाठी आत्मचिंतन व्हायला हरकत नाही. मात्र, सगळेच मोठे नेते एकाच घरातून जन्मणार असल्याने पुन्हा खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे, हा प्रश्नच उभा राहिला असता. गुजरातमध्ये उद्धव ठाकरे प्रचाराला गेल्याचे ऐकिवात नाही. गोव्यात मात्र त्यांनी सुपुत्रासह रोड शो केला होता. मनोहर पर्रिकरांच्या वाटेत जेवढे काटे पेरता येतील ते पेरायचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. गंमत अशी की, गोव्यात उद्धव ठाकरेंच्या रोड शोला जेवढे लोक होते, तेवढीही मते निवडणुकीत सेनेला मिळाली नाही. आता कोणी कोणाला मूर्ख बनविले हे कदाचित उद्धव ठाकरेच सांगू शकतील. आता शिवसेनेने एकटे लढण्याचा ठराव पास केला आहे. खरेतर हा ठराव ‘मातोश्री क्रमांक एक’वरच केला गेला होता.


तीन वर्षे खिशात ठेवलेल्या सेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासारखाच हा ठराव आहे, हे वेगळे सांगायला नको. मात्र, सुरुवातीलाच ज्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत लिहिले आहे, तीच स्थिती शिवसेनेच्या उमेदवारांची होणार आहे. कारण, लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या खासदारांनी मोदींचे नाव लावून जिंकली होती. त्यांच्या नावाचा कैवार मागतच हे लोक लोकसभेत शिरले होते. सेनेच्या मंत्र्यांनी शपथाही त्यांच्यासमोर उभ्या राहूनच घेतल्या होत्या आणि मग आवडते खाते मिळाले नाही म्हणून नाटकंही केली होती. आता तर स्थिती अधिकच बिकट आहे. सेनेचे अनेक खासदार जिथून निवडून गेले आहेत तिथले आमदार, नगरसेवक आणि ग्रमपंचायतीदेखील भाजपच्या आहेत. म्हणजेच, स्थानिक स्तरावर मिनतवार्‍या करण्याशिवाय या मंडळींसमोर कोणताच पर्याय नसेल. नेतृत्व इतके हुशार की, आपल्या कार्यकर्त्यांना चक्रव्यूहात टाकून सुट्टीवर निघून जाणार आहे. आज मोठ्या आवाजात शिवसेनेने हा ठराव मांडला असला तरी तो उद्या परतही घेतला जाईल. सत्तेेत राहून विरोधकांसारखे वागायचे, मग एकदमचूप होऊन जायचे. मुखपत्राच्या संपादकाने एक बोलायचे आणि नेत्यांनी काही दुसरेच! इतक्या कोलांट्या उड्या मारणारा महाराष्ट्रातल्या राजकारणातला शिवसेना हा पहिलाच पक्ष असावा. ममता बॅनर्जी, हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल, शरद पवार ज्यांचे ज्यांचे म्हणून शक्य होईल, त्यांचे पाय पकडण्याचे उद्योग शिवसेनेने मधल्या काळात केले आहेत. पण, सत्तेचा गोंद इतका मजबूत आहे की, काही केल्या तो सुटत नाही.
 
 
तोंडाने बाळासाहेबांच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या आणि नंतर सत्तेच्या खुर्च्या उबवतच राहायचे, असे सध्याच्या शिवसेनेचे धोरण आहे. मुंबई महानगरपालिकेतील सत्ता जाईल, अशा भयगंडाने पछाडून गेलेले उद्धव ठाकरे स्वत:च्या भावाचा पक्ष फोडतात आणि इतरांना उपदेश करायचा उद्योग करतात, तेव्हा हसावे की रडावे तेच कळत नाही. राजकारणात कुणीही कुणाचे कायमचा शत्रू नसते किंवा मित्रही नसते. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली असली तरी आता सारेच राजकीय संदर्भ बदलून गेले आहेत. मोदींसारखे कडवे राजकीय आव्हान असताना शिवसेनेने स्वत:च्या विधानसभेत स्वत:च्या जागा वाढविल्या खर्‍या, पण तर्काने विचार केला तर यापेक्षा अजून किती आणि कशा जागा शिवसेना वाढवू शकते? एकहाती सत्ता आणि सत्तेच्या ज्या सोन्याच्या ताटाची वारंवार आठवण उद्धव ठाकरेंना येत असते, तिथपर्यंत पोहोचायचे असेल तर गरळ ओकण्यापेक्षा अनेक ठिकाणी ठाणे-मुंबई वगळता लोकांनी शिवनेनेला का नाकारले, याचा विचार केला पाहिजे. मुंबईची महानगरपालिका देखील शिवसेनेने कशीबशी राखली आहे. अपात्रतेचा धोका तर शिवसनेच्या महापौरांवरही टांगलेला आहे. असे असताना उसनेपणाचा जो काही आव उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात आणला तो नक्कीच पारितोषिकास पात्र आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@