चित्रपट गीतातूनही डोकावतो सूर्य..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |

 
 
‘नित्य उगवे नारायण अर्घ्य देती किती जण’
 
‘निर्मल कलंक’ या नव्या कोर्‍या संगीत नाटकातील कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेले हे पद सूर्योपासना करणार्‍या, पर्यायाने बलोपासना करणार्‍यांना उद्देशून आहे. सूर्य म्हणजे प्रकाश-तमातून तेजाकडे मानवाला नेणारा ‘मित्र’. होय मित्र! सूर्याची तेरा नावे बहुतेक सर्वांना माहित असतीलच - मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पुष्णी, हिरण्यगर्भ, मरिची, आदित्य, सवितृअर्क, भास्कर अन् श्री सवितृसूर्यनारायण. आरोग्यं धनसंपदा प्राप्त करायची असेल तर उगवत्या सूर्याला नमस्कार करा! अन् स्वरसंपदा मिळवायची असेल तर पहाटेचा रियाज करा... हे काय भलतंच? सूर्योपासनेकडून असं अचानक स्वरोपासनेकडे? होय. संगीताच्या क्षेत्रात ‘चंद्रावर’ म्हणजे चंद्र या विषयावर हजारो गाणी सापडतील पण सूर्य मात्र इथे चक्क अंधाराच्या पखाली वाहतो. आठवा - ‘उषःकाल होता होता, काळरात्र झाली’. पण गड्यांनो, अंधाराच्या साम्राज्यातूनच स्वरभास्करासारखं पं. भीमसेनजींसारखं भारतरत्न आपल्याला मिळालं. अंधाराचं साम्राज्य का तर रागदारीचे बहुतेक कार्यक्रम ते रात्र रात्र भर करायचेत ना!
 
 
रामदास कामतांसारख्या खड्या आवाजाच्या गायकाने ‘हरि ऊँ प्रणव ओंकार देवा, हृदयात उजळू दे सूर्य दिवा’ सारख्या भक्तीगीतातून सूर्याला आळवलंय. ‘उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला’ - घनश्याम सुंदरा... ही भूपाळी काय किंवा ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्य देव नाव, प्रभातीस येशी सारा जागवीत गाव’ हे भावगीत सूर्याचीच वंदना करतात ना! ‘ज्योतिकलश छलके, हुवे गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के ’ हे गीतही सूर्यदेवाची आळवणीच तर आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘तेजोनिधी लोह गोल भास्कर हे गगनराज’ हे पं. भानुशंकरांचं पद तरी दुसरं काय आहे? सूर्यस्तुतीच ना! कविवर्य ना. धों. महानोर आपल्या काव्यात म्हणतात - ‘सूर्यनारायणा नित्य नेमाने उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा.’
 
 
चित्रपटक्षेत्रही सूर्याला सात सुरात अडकवण्यात मागे नाही हं. ‘पूर्व दिशेला अरुण रथावर, ध्वज सोन्याचा झळकत सुंदर’ हे आशा भोसलेंनी गायिलेलं नितांत सुंदर गीत. ‘दिव्य तुझी रामभक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया’ हे महेंद्र कपूर यांनी गायिलेलं गीत. ‘रविकिरणे वेणीत गुंफून’ हे आशाताईंचं चित्रपट गीत. ‘गगन सदन तेजोमय’ ही प्रार्थना. ‘ऊठ मुकुंदा ऊठ श्रीधरा’ या गीतातील - ‘प्राचीवरती शतकिरणांतून रविराज उगवला’, ‘भोर आई गया अंधियारा’ हे ‘बावर्ची’ चित्रपटातील मन्ना डेंनी म्हटलेलं अजरामर गीत. त्यांनीच गायिलेल्या ‘भोर भी आस की किरन न लाई, पुछो ना कैसे...’ या गीतातील उदासी दूर करते तेही सूर्याच्याच साक्षीने. तर गजलकार हसरत मोमानी (?) म्हणतो - ‘दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिये, वो तेरा कोठे पे नंगे पॉंव आना याद है चुपके चुपके’. शायर साहेबांनी धरलं ना वेठीला ‘माध्यान्हीच्या सूर्याला’?
 

 
 
सूर्याचं सर्वातसुंदर रुप जे मला भावलं ते - अशोक पत्की या सिध्दहस्त संगीतकारांनी सर्वशिक्षा अभियानासाठी तयार केलेल्या उपदेश गीतातून - ‘पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा जागा जग सारा’- गायिका कविता कृष्णमूर्तींचा मधाळ स्वर अभिनयाची उंची दाखवतो. ‘दिव्य स्वातंत्र्यरवी आत्मतेजोबली प्रकटता अवनीवरी कोणत्या लोपवी’ हे दीनानाथांचं गाजलेलं नाट्यगीत वा फैय्याज यांनी गायलेलं गीत - ‘पूर्व दिशा उजळली राजसा उषःकाल झाला’ हे तेजोमयाची आळवणी करणारं गीत पहाट गहिवरात भिजलेलं आहे, तर पं. जितेंद्र अभिषेकींनी गायिलेली प्रार्थना - ‘आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा - सर्वात्मका सर्वेक्षरा.. हे खर्‍या अर्थाने संगीतातील पसायदानच आहे. भैरवीसम रागातील तेही उगवत्या ‘सूर्यनारायणाच्या’ साक्षीने!
 
 
आकाशवाणी जळगावतर्फे काही वर्षांपूर्वी ‘ऊँ सूर्याय नमः’ नावाचं संगीत रुपक प्रसारित केलं होतं. ‘उगवले नारायण झाली मंगल पहाट, सनईचा ध्वनी मनी चैतन्याची लाट’ अशा काव्यपंक्तींनी सूर्याला वंदन केलं गेलं होतं. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झालाय. मकर संक्रांत ही त्याचंच द्योतक. ‘तम निशेचा सरला अरुण कमल प्राचीवर फुलले, परिमळ हा गगनी भरला-पावन शिव जग अवघे झाले, तव दयेचा दीप रे’ - अर्थात ‘मित्रा’ ही तुझीच कृपा!
 
 
‘सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा जाणीव दे प्रकाशाची’, असं संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत संबोधित केलंय. ज्ञानेश्‍वरांना कदाचित सूर्य-प्रकाश यांचा संदर्भ ‘ज्ञान’ म्हणून द्यायचा असेल. अज्ञानांधःकाराच्या क्षितीजावर ज्ञानसूर्य उगवला तरच - ‘दुरितांचे तिमिर जावो विश्‍वस्वधर्म सूर्ये पाहो’ हे वचन सत्य होईल, नाही का? ‘सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार’ - ‘विंचू चावला’ या नाथांच्या भारुडातनं तरी दुसरं काय सांगितलं? दंभ अहंकाररूपी विंचवाचं विष उतरणं महाकठीण. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सररूपी षड्विकारांचं रूप म्हणजेच ही इंगळी. भारुडकार देखील किती खुबीने ती इंगळी उतरविण्याचे उपाय सांगतात. या सार्‍या तमाला दूर करण्याचे श्रेय सूर्याचेच ना? काहीही असो, सूर्याच्या सार्‍याच छटा मानवी भावनांशी जोडल्या गेलेल्या आढळतात. ‘मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा - जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या...’ असं जरी असलं तरी ‘अंधारात प्रभा तुझी गिळे प्रभाकर, दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर, सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव, प्रभातीस येशी सारा जागवित गाव’ ही आशेची किरणं जीवनात घेऊन येणारा सूर्यनारायणा सर्वांच्या जीवनात प्रकाशो अन् जीवन समृध्द होवो.
 
 
- दुष्यंत जोशी
@@AUTHORINFO_V1@@