वादांच्या पिंजर्‍यात ‘पद्मावत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |
 
 
कोणत्याही चित्रपटवाल्याचा खूपच मोठा आनंद म्हणजे आपल्या चित्रपटाची प्रदर्शनपूर्व चर्चा रंगली तर त्याचा चित्रपटाला प्रारंभिक प्रतिसाद मिळण्यास खूप फायदा होईल, अशी अपेक्षा वाटणे हाच असतो. सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन पहलाज निहलानी यांना पायउतार करण्यात आल्यानंतर त्याजागी प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात आलेल्या ’इंदू सरकार’ या चित्रपटाबाबत असाच वाद उफाळून आला. सेन्सॉर त्याला कट्‌स सुचवणार, हे स्पष्ट होते. कारण, हा चित्रपट आणीबाणीवर आधारित होता. २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू झाली. ती १९ महिने होती. या वादग्रस्त कालखंडावरील चित्रपटातील काही संदर्भ/नावे सेन्सॉरला आक्षेपार्ह वाटली व चौदा कट्‌स सुचविण्यात आले होते. आत्ता येऊ घातलेला ’पद्मावत’ सिनेमा हादेखील वादाचा विषय ठरत आहे. त्यामुळे २५ जानेवारी रोजी प्रेक्षक जो सिनेमा चित्रपटगृहात पाहतील, तो आता संपूर्णतः काल्पनिक कथानकावर बेतलेला असेल. कारण, चित्रपटातून महत्त्वाच्या ठिकाणांची नावे वगळण्यात आल्यामुळे ही ऐतिहासिक घटना नेमकी कुठे घडली होती, ते कळणार नाही. अलाउद्दीन खिलजी कोठून आला आणि राजपुतांसोबत त्याचे युद्ध कुठे झाले, याचा संदर्भ चित्रपटातून वगळण्यात आला आहे. खरेतर ‘पद्मावत’ चित्रपट १ डिसेंबर २०१७ ला प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, चित्रपटाला होत असलेला विरोध आणि भन्साळी तसेच दीपिकाला आलेली जीवे मारण्याची धमकी यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटामध्ये काही बदल सुचवत २५ जानेवारीला ‘पद्मावत’ प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. या पाच बदलांमध्ये चित्रपटाचे शीर्षक ‘पद्मावती’ वरून ‘पद्मावत’ असे करण्यात आले. तरीही ’पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनावरील बंदी उठविण्याच्या आदेशात बदल करण्याची मागणी करत मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये या सिनेमावरील बंदीचा त्या-त्या राज्य सरकारचा निर्णय रद्द केला होता. दरम्यान, येत्या २५ जानेवारी रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तरीही ‘पद्मावत’ला विरोध कायमआहेच. त्यामुळे आयत्या वादांमुळे ‘पद्मावत’ची बरीचशी फुकट प्रसिद्धी झालीच आहे, त्याचा फायदा या सिनेमाला कितपत होतो, ते पाहायचे.
 
फायदा नेमका कोणाला?
 
’ माय नेम इज खान’, ’उडता पंजाब’, ’यह दिल है मुश्किल’ आणि आता ’पद्मावत’ या चित्रपटाला होणारा विरोध आणि त्यामुळे चित्रपटाचे रखडलेले प्रदर्शन यामुळे त्या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढते. चित्रपट बनवताना त्या त्या दिग्दर्शकाला पुढे उद्भवणार्‍या वादाची खात्री असतेच. तरी ते न कचरता अशा चित्रपटांचे दिग्दर्शन करतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही जाळपोळ, सिनेागृहांची तोडफोड यासारख्या घटना घडतात. तरी कोणत्याही वादविवादातून मिळणार्‍या प्रसिद्धीचा कुठेतरी नक्कीच फायदा होतो. हे गमक वापरून चित्रपट वादग्रस्त करण्याकडे हल्ली कल असतो. ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’ ही काळाची गरज असल्याप्रमाणे ‘पद्मावत’च्या आधीचे हे सारेच चित्रपट रग्गड कमाई करूनच बॉक्स ऑफिसवरून खाली उतरले. काहींनी तर परदेशात आपला गल्ला जमवण्याकडे सारे लक्ष केेंद्रित केले. एक असा व्यावसायिक डावपेचाचा पर्याय आज उपलब्ध आहे. ’यह दिल है मुश्किल’ चित्रपटातील फवाद खानच्या भूमिकेवरून काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेत आंदोलने केली. तरी दिवाळीत त्याचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाच. ’उडता पंजाब’ सारख्या चित्रपटाबाबतीतील सेन्सॉरसोबत रंगलेला वाद हा त्याच्या प्रसिद्धीच्या चांगलाच पथ्यावर पडला. ’इंदू सरकार’ने देखील पहिल्या आठवड्याच्या अंती साडेतीन कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे चित्रपटनिर्मिती म्हणजे प्रेक्षकांचे दोन घटका मनोरंजन ही कल्पनाच कालबाह्य झाली आहे. आता निर्मितीमागे अनेक प्रकारचे फंडे असतात. ‘पद्मावत’च्या निर्मितीमागेही ते असणारच. देशाच्या एखाद्या भागात चित्रपटाला होणारा विरोध इतरत्र फायद्याचा ठरू शकतो, हे आत्तापर्यंतच्या उदाहरणांवरून पाहता येते. चित्रपटनिर्मिती हा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यात आल्यानंतर त्या तयार झालेल्या निर्मितीतून जास्तीत जास्त कसा नङ्गा मिळवता येईल, याचाच विचार या निर्मितीमागे असलेल्या व्यावसायिकांचे असतात. त्यामुळे कलाकृती म्हणून आणि रसिकांसाठी मनोरंजन म्हणून चित्रपटगृहात येणारी ’हलती चित्रे’ आता केवळ व्यवसायाचे साधन होऊन बसली आहे. ’पद्मावत’ २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या निर्मितीमागील असलेले फंडे आता किती यशस्वी ठरतात आणि किती गल्ला ’पद्मावत’ जमवतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
- तन्मय टिल्लू 
@@AUTHORINFO_V1@@