‘गांधारी’ची मुलं झाली सुयोधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |

 स्टडी सर्कलमुळे आडगावातील तरुण प्रशासनांत अधिकारी



रिसोड : महाभारतात गांधारीने पतीव्रता म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिची मुलं नाव सुयोधन असूनही दुर्योधन झाली... आडरानांत असलेल्या खेड्यांमध्ये शिक्षण, अभ्यास, स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाचा अभाव यांचे अंधळेपण असल्याने तिथल्या तरुणाईच्या वाट्याला अंधारच येतो, मात्र रिसोड तालुक्यातील ‘गांधारी’ या गावच्या तरुणांनी आठ वर्षांपूर्वी स्टडी सर्कल स्थापन करण्याचा डोळस निर्णय घेतला आणि बघता बघता या गावचे अनेक तरुण प्रशासनांत सुशासन देणारे अधिकारी झाले आहेत.

बारावी पर्यंतचे शिक्षण श्री सखाराम महाराज विद्यालयात घेवून पुढील शिक्षण रिसोड, मेहकर, लोणार येथे कसेबसे घ्यायचे हेच नशिबी आलेले. गरीब परिस्थिमुळे मोठ्या शहरात शिक्षणाला जाणे परवडणारे नव्हते. पदवीप्राप्त केल्यावर करायचे काय, हा प्रश्न होताच. गावातील पाच सहा युवक एकत्र आले. त्यांनी गावातीलच एका घरच्या खोलीची निवड केली. साधारण खोलीला नवे रूप देण्याचा प्रयत्न करून स्टडी सर्कलची १ जानेवारी २०१२ ला मुहुर्तमेढ रोवली. सुरूवातील पुस्तकांची वनवा. मग वृत्तपत्र वाचन करणे, चर्चा करून जनरल नॉलेज मिळविणे सुरू झाले. थोडे थोडे पैसे जमा करून काही पुस्तके आणली त्याचे वाचन सुरू झाले. अभ्यासाच्या साहित्याची जमवाजमव सुरू झाली. 

गावाचा ठाव कुणाला लागत नाही. चांगले काम करणार्‍या या तरुणांची टवाळी होऊ लागली; पण हे युवक मागे हटले नाही. स्टडी सर्कलमध्ये केलेल्या मेहनतीचे, केलेल्या अभ्यासाचे फळ मिळाले. रवि चाटे या युवकाची जलसंपदा विभागात निवड झाली. त्या पाठोपाठ माधव जाधव, गजानन चाटे यांची राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली. धांगड हा युवक आरोग्य सेवक झाला. केशव चाटे पोलिस झाला. दोघे शिक्षक झाले. पांडुरंग आंधळे हा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला. हे युवक आज नोकरीवर आहेत. हे स्टडी सर्कलचे फलीत आहे.

स्टडी सर्कलच्या माध्यमातून लहान विद्यार्थ्यांना मोफत शिकविले जात आहे. पाच वर्षांपूर्वी लावलेले हे स्टडी सर्कलचे रोपटे छान बहरले आहे. गजानन चाटे, शिवाजी टाकरस, राजेंद्र चाटे, पांडुरंग चाटे, बळीराम केंद्रे हे नेहमी मदत करतात. स्टडी सर्कलमुळे या गांधारी गावाला अधिकार्‍यांचे गाव अशी नवी ओळख मिळाली.
जयंत वसमतकर 
@@AUTHORINFO_V1@@