भारतातील सायबर गुन्ह्यांत तीन वर्षांत साडेतीनशे पटींनी वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 

 
नाशिक : भारतात सायबर गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांत ३५० पटींनी वाढ झाल्याची माहिती अजय गोटखिंडीकर यांनी दिली. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे व्यवसायवृद्धीसाठी सोशल मीडिया प्रभावी यंत्रणा या राज्यस्तरीय कार्यशाळेचा समारोप सायबर सुरक्षातज्ज्ञ अजय गोटखिंडीकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.
 
अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप बेलगावकर कार्यवाह, से.हिं.मि.ए. सोसायटी, नाशिक होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या गुणवत्ता कार्यक्रमाअंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीराम झाडे हे उपस्थित होते.
 
अजय गोटखिंडीकर यांनी आपल्या भाषणात ’’सायबर सुरक्षा भारतासाठी हा राष्ट्रीय सुरक्षेइतकाच महत्त्वाचा विषय आहे. आपल्या देशात डिजिटल साक्षरतेत मोठ्या प्रमाणत वाढ होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टी आता इंटरनेटच्या साहाय्याने एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक सुरक्षेचे उपाय आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही वाढ गेल्या तीन वर्षांत ३५० पटींनी वाढली आहे. वेगाने वाढणार्‍या सायबर सुरक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
 
या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी, आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना गौरविण्यात आले. सोशल मीडिया क्विझ व पोस्टर स्पर्धेमध्ये आदित्य भालेराव यास प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. समारोपप्रसंगी कार्यशाळेवर आधारित सीडीचे प्रकाशन करण्यात आले. यात सोशल मीडियावरील विविध लेख, संशोधन पेपर्स व माहितीचे संकलन करण्यात आलेले आहे. कार्यशाळेचा अहवाल कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. शीतल गुजराथी यांनी सादर केला. आभारप्रदर्शन कार्यशाळेच्या सचिव प्रा. राजेश्वरी रसाळ यांनी मानले. सूत्रसंचालन राखी हरियानी यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@