दादा इदाते राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचा अहवाल केंद्रसरकारने संकेतस्थळावर आणावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |

भटके विमुक्त हक्क परिषदेची विभागीय बैठकीत मागणी

 

नंदुरबार : केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ९ जानेवारी २०१५ रोजी कर्मवीर दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय भटके विमुक्त आयोगाची ३ वर्षाकारिता स्थापना केली होती. ८ जानेवारी २०१८ रोजी केंद्रीय अहवाल केंद्र सरकारकडे सोपविण्यात आला असून ५७१ विमुक्त जाती, १०६२ भटक्या जमाती व २५ अर्धभटक्या जमातींची नोंद आयोगाने केली आहे. आयोगाने सादर केलेला अहवाल तात्काळ केंद्र सरकारने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन देशाच्या संसदीय पटलावर चर्चा घडवत आयोगाने सादर केलेल्या सर्व शिफारशींसह आयोग केंद्राने स्वीकारून लागू करावा व गेल्या ७० वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित जीवन जगणार्‍या या समूहास न्याय द्यावा, अशी मागणी भटके विमुक्त हक्क परीषदेच्या विभागीय बैठकीत व्यक्त करण्यात आली.
 
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम काळे होते. तसेच धुळे जिल्हाध्यक्ष साहेबराव गोसावी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुपडू खेडकर, जळगाव जिल्हाध्यक्ष शालीक पवार, नाशिक जिल्हा संघटक वैभव नागरे, मोरसिंग काका राठोड, राजेंद्र गुंजाळ व्यासपीठावर उपस्थित होते.
 
हक्क परिषदेने गेल्या ३ वर्षापासून केलेल्या कार्याचे अहवालाचे वाचन काळे यांनी केले. प्रत्येक जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. हक्क परिषदेच्या वतीने मंत्रालयात झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सांगण्यात आले. संघटन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असेही सांगण्यात आले. देशातील भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या समस्यांची, उणिवांची, गरजांची जीवनमान उंचविण्यासाठीची माहिती संकलित करुन उचित शिफारशी केंद्र सरकारकडे सादर करणेकामी आयोगाने देशातील संपूर्ण राज्यांचा अभ्यासदौरा पूर्ण करुन विविध समाज, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांची प्रतक्ष्य भेट घेऊन त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन समस्यांचे निवेदने स्वीकारून त्यावर उचित शिफारशी आपल्या अभ्यासपूर्ण अहवालात सादर केल्या असून देशाच्या इतिहासात मागासवर्गाकरिता यापूर्वी ६ आयोग गढीत करण्यात आले होते.
 
हा सातवा आयोग असून केवळ आयोग तयार करायचे, त्यावर करोडो रुपये खर्च करायचे, आयोग पूर्ण मेहनतीने अभ्यास करुन अहवाल सादर करतात. परंतु त्यातील एकही शिफारस शासन मान्य करीत नाही. आतापर्यंत या भटके विमुक्त समाजाची प्रत्येक सरकारने दिशाभूल केली असून त्यांच्या पदरी काहीही मिळालेले नाही. भटके विमुक्त समाजाबाबतच्या प्रश्नांवर कोणताही लोकप्रतिनिधी विधानसभेत व लोकसभेत यावर बोलताना दिसत नसल्याने या समाजाचा कुणीही वाली नसल्याची भावना निर्माण होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. विद्यमान केंद्रसरकाने राज्य सरकारने या समाजास न्याय द्यावा, अन्यथा यानंतर कोणत्याही सरकारवर भटके विमुक्तांचा विश्वास बसणार नाही, या करिता संघर्षास तयार राहण्याचे आवहान काळे यांनी केले.
 

बैठकीतील महत्वपूर्ण ठराव :
 
१. नाशिक विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील खासदारांना आयोग संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन संसदीय पटलावर चर्चा घडवून आणण्यासाठी निवेदन दिली जाणार आहेत.
 
२. विभागात भटके विमुक्त समाजास आयोगाबाबतची जाणीव जागृती होण्यासाठी ५ मार्चपासून जागर भटक्या विमुक्तांच्या समस्यांचा या विशेष अभियानास प्रकाशा (ता.शहादा) येथून सुरुवात केली जाणार असून सर्वांनी सहभागी होण्याचे आवहान काळे यांनी केले. विभागातील प्रत्येक गाव, वस्ती, तांड्यापर्यंत कार्यकर्ते पोहचणार असून आतापर्यंत निवेदने देऊन झालीत, यानंतर संघर्षास तयार राहावे.
 
आपले अधिकार व हक्क आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलनात सक्रिय होण्याचे आवहान काळे यांनी केले. शालीक पवार यांनी आपल्या समाजाला शौर्याचा इतिहास असून आपण तो वाचला पाहिजे, असे सांगत सर्वांनी लढ्यात सामील होण्याचे आवहान केले. वैभव नागरे संदीप शेगर यांनीही मनोगत व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत, नगरपालिका निवडणुकीत विजयी लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. त्यात सर्वात कमी विसाव्या वर्षी लोकनियुक्त सरपंच झालेल्या शेवगे बहाळ (ता.पारोळा) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला.
 
अभिनंदनाचा ठराव :
 
१. कर्मवीर दादा इदाते यांनी संपूर्ण देशात दौरा करुन विहित कालावधीत अभ्यासपूर्ण असा केंद्रीय अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्त केल्या बद्दल विभागाच्यावतीने कर्मवीर दादा इदाते यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
२. राज्यातील एमपीएससीने घेतलेल्या परीक्षेत खुल्या प्रवर्गात उत्तीर्ण झालेल्या, परंतू मूळ संवर्ग एनटी असल्याने नाकारलेल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते अजय मुंढे, अॅड. सुधाकर आव्हाड, अॅड. चेतन नागरे यांनी न्यायालयात धाव घेऊन त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल विभागाच्या वतीने त्यांचा देखील अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
 
बैठकीचे प्रास्तविक सूत्रसंचालन रामकृष्ण मोरे यांनी केले. दिलीप ढाकणे पाटील यांनी आभार व्यक्त केले. बैठक यशस्वीतेसाठी धर्मा राठोड, मनोज चव्हाण, पोपट शिंदे, राजु जाधव, राजेंद्र गुंजाळ, महेंद्र साठे, राहुल आघाव, संजय गारुंगे, देवा चव्हाण, ज्योतीमल पवार, सुनील पवार, संजय पवार, संदीप घुगे, सुनील धनगर, किशोर सानप आदींनी परिश्रम घेतले. बैठकीस नंदुरबार, जळगाव, नाशिक येथील जिल्हा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@