अमोल पालेकर, सत्यशील देशपांडे, सुभाष अवचट यांना ‘गोदागौरव’ पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |

कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी पुरस्कारांचे वितरण

 
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार्‍या ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केली आहे. यावर्षी, गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे.
 
पुरस्कार वितरणाचे हे १४ वे वर्ष आहे. यंदा १० मार्च रोजी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे.
 
यावर्षी, गायन या प्रकारात गायक, सत्यशील देशपांडे, लोकसेवा प्रकारात मेळघाट येथे आदिवासी जमातीत राहून सेवा बजावणारे दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, नाट्य आणि चित्रपट प्रकारात अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर, ज्ञान या प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्र या प्रकारात चित्रकार सुभाष अवचट तसेच मुंबईत नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेत सुमारे २०० लोकांचा जीव वाचविणारे पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जाणार आहे.
 
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. यापूर्वी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार्‍या जनस्थान आणि गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा मुंबईत केली जात होती. यंदापासून मात्र कुसुमाग्रजांच्या गावीच पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त संजय पाटील, आ. हेमंत टकले, लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, विनायक रानडे, अरविंद ओढेकर आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@