ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |


नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाचे सध्याचे निवडणूक आयुक्त असलेले ओम प्रकाश रावत यांनी आज आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या २३ जानेवारीला रावत हे सध्याची मुख्य निवडणूक आयुक्त ए.के.जोती यांच्याकडून आयोगाचा पदभार स्वीकारतील. यानंतर आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणून ते काम पाहतील.

आयोगाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ए.के.जोती यांचा कार्यकाळ उद्या संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज एक दिवस अगोदर रावत यांची नवे आयुक्त म्हणून घोषणा करण्यात आली आहे. तसेच रावत यांच्या जागी निवडणूक आयुक्त म्हणून वित्त सचिव अशोक लवासा यांची निवड करण्यात आली असल्याचे देखील आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लवासा हे देखील येत्या २३ जानेवारीलाच आपला पदभार सांभाळतील.

ओम प्रकाश रावत हे १९७७ च्या मध्य प्रदेश कॅडर बॅचचे आईएस अधिकारी आहेत. सध्या ते निवणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असून या अगोदर विविध मंत्रालयांच्या सचिव पदी देखील त्यांनी कार्य केले आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर लगेच पुढील महिन्यात त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुका सुरु होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांची पूर्ण जबाबदारी ही रावत यांच्या खांद्यावर येणार आहे.

गेल्या जुलै महिन्यामध्ये ए.के.जोती यांनी निवडणूक आयोगाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांच्याकडून निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. यावेळी निवडणूक आयोग आणि इव्हीएम मशीनसंबंधी देशात राजकीय पक्षांकडून अनेक गैरसमज पसरवण्यात आले होते. अशाच परिस्थितीमध्ये हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका पार पडल्या होत्या.
@@AUTHORINFO_V1@@