'परराष्ट्र धोरणातील मोठी कसर मोदींनी भरून काढली !'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |

मुंबई तरूण भारत आयोजित मुक्त संवाद

विजय चौथाईवाले यांचे प्रतिपादन





पुणे : नेपाळमध्ये १७ वर्षांत, श्रीलंका, फिलिपाईन्समध्ये २७ वर्षांत, कॅनडात ४२ वर्षांत तर युएईमध्ये ३४ वर्षांत भारताच्या पंतप्रधानांचा दौरा झाला नव्हता. मंगोलिया-इस्राएलमध्ये तर कोणीच कधीच गेले नव्हते. परराष्ट्र धोरणातील ही मोठी कसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरून काढली, भारतीय हितसंबंधांचा विचार करून या व अनेक देशांशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र नीती विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी केले. दै. मुंबई तरूण भारतद्वारा पुणे येथे आयोजित 'मुक्त संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्यातील डेक्कन भागात पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित या कार्यक्रमाला व्यासपीठावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन व पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, भारतीय विचार दर्शनचे विश्वस्त विनायक बापट, दै. मुंबई तरूण भारतचे संपादक किरण शेलार आदी उपस्थित होते. तसेच पुण्यातील सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी या मुक्त संवादात सहभाग घेत भारताच्या परराष्ट्र धोरणावर विजय चौथाईवाले यांच्याशी संवाद साधला. चौथाईवाले यांनी परराष्ट्र धोरणाशी संबंधित विविध मुद्यांवरील प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा वाईट कालखंड सुरू होता. त्यात पुन्हा एका राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधान पदी पोहोचलेला, अमेरिकेने एकेकाळी व्हिसा नाकारलेल्या या माणसाला परराष्ट्र धोरण काय कळणार असे अनेकांना वाटले. मात्र, शपथविधी समारंभातच मोदींच्या परराष्ट्र धोरणाची चुणूक पहायला मिळाली, व त्यानंतरचा प्रवास केवळ अद्भुत असे चौथाईवाले म्हणाले.

भारताच्या शेजारील देश, विशेषतः चीन, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांबाबतच्या प्रश्नांना चौथाईवाले यांनी विस्तृत उत्तरे दिली. ते म्हणाले की, चीनच्या ओबोर प्रकल्पाला पर्यायी आणि तितक्याच ताकदीचे उत्तर देण्यासाठी भारताचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आदी देशांसोबत त्यावर काम सुरू झाले आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढवून भारताला घेरण्याचा प्रयत्न चीन करत आहे. मात्र, याला उत्तर म्हणून मोदींनी दक्षिण-पूर्व (साऊथ-ईस्ट) आशियाशी संबंध वाढवले आहेत, हे मोदींचे दौरे पाहिल्यावर लक्षात येईल, असे त्यांनी नमूद केले. २०१६ हे वर्ष भारत-चीन संबंधांसाठी सुवर्ण वर्ष होते. २०१७ मध्ये डोकलाम वादानंतर दोन देशांमधील राजनैतिक संबंधांनी तळ गाठला. आजही चीनशी व्यापारी संबंध आहेतच, ते पुढेही राहतील. मात्र, डोकलाम वाद निवळल्यानंतर भारतासोबतचे राजनैतिक संबंध पुन्हा सुधारण्याची आता चीनचीही इच्छा दिसत असल्याचे चौथाईवाले यांनी सांगितले.

नेपाळसोबतच्या संबंधांबाबत भारताचे धोरण थोडे कमी पडत असल्याची कबुली चौथईवाले यांनी दिली. मोदींच्या पहिल्या नेपाळ भेटीनंतर नेपाळशी चांगले संबंध होते मात्र, आज नेपाळमधील राजकारण प्रचंड विभागले गेले असून त्यामुळे संवादात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, श्रीलंकेत राजपक्षे सत्तेतून दूर झाल्यावर श्रीलंकेचे परराष्ट्र धोरण भारताच्या जवळ येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानबाबत बोलताना चौथाईवाले म्हणाले की, पाकिस्तान हा देश अस्तित्वात राहणार हे आपण मान्य केले पाहिजे. तसेच पाकिस्तान हे आपल्यासाठी यापुढे अधिकाधिक उपद्रवी बनत जाणार आहे. त्यामुळे पाक हे शत्रूराष्ट्र असल्याचे मानूनच आपल्याला पावले उचलावी लागणार असल्याचे ते म्हणाले. हे सर्व धोरण या सरकारपुढे स्वच्छ, स्पष्ट आहे, त्यामुळेच आता अमेरिकाही पाकिस्तानच्या विरोधात जात आहे तसेच कोणतेही अरब राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूने बोलत नसल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानला दिलेल्या 'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जालाही आज वास्तवात काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात अनिवासी भारतीयांचे त्यांच्या त्यांच्या देशात वजन वाढले असून आता अनेक देशात भारतीय समाज राजकीयदृष्ट्याही प्रभावी ठरू लागला असल्याचे चौथाईवाले यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रशंसा करताना ते म्हणाले की, ५ वर्षांपूर्वीचे भारतीय दूतावास आणि आजचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. ८०-९० टक्के अनिवासी भारतीय हेच सांगत असल्याचे चौथाईवाले म्हणाले. आधी देशात २६ पासपोर्ट कार्यालये होती, आता ती ९० च्या आसपास असून २०१९ पर्यंत ते २०० पर्यंत जातील, असेही त्यांनी सांगितले. पासपोर्ट बनवण्याची प्रक्रियाही वेगवान झाली असून अनेकांना केवळ ४८ तासांत पासपोर्ट घरपोच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे 'डिप्लोमॅट्स'ची संख्या कमी असल्याचे सांगितले जात असले तरी, आता नवी फळी या प्रक्रियेत आली असून त्यामुळे येत्या ३-४ वर्षांत हे लोक परराष्ट्र खात्यात प्रमुखपदी येऊन परराष्ट्र धोरणावरही त्याचा अमूलाग्र परिणाम दिसून येईल असा दावाही चौथाईवाले यांनी यावेळी केला.

भारत-इस्त्रायल संबंधांबाबत चौथाईवाले म्हणाले की, भारत आता इस्त्रायलचा मित्रदेश म्हणवून घ्यायला घाबरत नाही. आधी केवळ संरक्षण क्षेत्रात सहकार्य होते, आता ते व्यापार, संस्कृती, व्यक्तीव्यक्तींमधील संवाद अशा परिपक्वतेकडे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. माध्यमांनीही हा विषय समजून घेण्याची गरज असून भारत इस्त्रायल संबंध प्रस्थापित होत आहेत म्हणजे भारताने सर्व अरब राष्ट्रांना शत्रू मानायला सुरुवात केली असा होत नसल्याचे विजय चौथाईवाले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक बापट यांनी केले तर सूत्रसंचालन संपादक किरण शेलार यांनी केले. दै. मुंबई तरूण भारतचे बिझनेस हेड रविराज बावडेकर यांनी आभार व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@