राष्ट्रकूट घराणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |
 

भारतातील प्राचीन व इतिहास प्रसिद्ध असे राजघराणे म्हणजे राष्ट्रकूट. साधारण इ. स. ७५२ ते ९७५ या दरम्यान महाराष्ट्र व त्यालगतच्या परिसरामध्ये राष्ट्रकूटांची सत्ता होती. राष्ट्रकूट हे एक प्राचीन अधिकारपद होते. प्राचीन ताम्रपटात ग्रामकूटांप्रमाणे राष्ट्रकूटांचा उल्लेख होतो. त्यावेळी राज्याच्या एका मोठ्या विभागाला ‘राष्ट्र’ म्हणत. गावाचा मुख्य तो ‘ग्रामकूट’ आणि राष्ट्राचा (राज्याचा) मुख्य तो ‘राष्ट्रकूट’ (प्रशासक)असे संबोधले जात असे. राष्ट्रकूटांची अनेक घराणी महाराष्ट्रात राज्य करीत होती. पण परस्परांशी संबंधित नव्हती. राष्ट्रकूटांचे सर्वात पहिले घराणे हे सर्वात प्राचीन व ज्ञात असलेले कुंतल देशात कृष्णानदी खोर्‍यात राज्य करीत होते. या घराण्याचा मूळपुरुष मानांक (इ.स.पूर्व ३५०-७५) हा होता. मानांकने ’मानपूर’ नगर स्थापून कालांतराने तीच राजधानी घोषित केली. असे म्हटले जाते की, हे मानपूर म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण-मानपूर असावे.
 
राष्ट्रकूट नृपतींच्या नावापुढे ’कुंतलेश्वर’ ही मानाची पदवी लावली जात असे. विदर्भाचे वाकाटक आणि कुंतलचे राष्ट्रकूट राज्ये लागून असल्याने त्यांच्यात वाद होत. मानांकाने विदर्भाला त्रस्त केल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या ’पांडुरंगपल्ली’ ताम्रपटात आढळतो. मानांकाचा पुत्र देवराजच्या कालखंडात गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने राजकवी कालिदासाला राष्ट्रकूट दरबारी पाठविले. त्याप्रसंगी कालिदासाने ’कुंतलेश्वरदौत्य’ रचले होते. बादामीच्या दुसर्‍या पुलकेशीच्या काळापर्यंत मानपूर येथे हे घराणे टिकले. पुलकेशीने त्यांचा पराभव करून त्यांचा प्रदेश खालसा केला.
 
दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतकात कलचुरींचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्यासंदर्भातील काही ताम्रपट नंदीवर्धन, अकोला, मुलताई येथे सापडले. कलचुरींनी प्रचंड त्रास दिल्यानंतर त्यांनी बदामीच्या चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले. मात्र, काही काळानंतर याच चालुक्यांना त्यांनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मांडलिक बनविले. या राष्ट्रकूटांच्या राजधानीचे शहर एकच स्थिर नव्हते. ते बदलत राहिले. या राजधान्यांची शहरे अनुक्रमे नंदिवर्धन, भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर व शेवटी अमरावती येथील अचलपूर ही होती. हे घराणे दहाव्या शतकापर्यंत टिकले.
 
अत्यंत कीर्तिमान असे राष्ट्रकूटांचे तिसरे घराणे हे औरंगाबाद येथे उदयास आले. त्यांच्या आरंभीच्या राजधानीबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. ’तिसरा गोविंद’ या राजाच्या काळात मात्र राजधानी मयूरखंडी ही होती. सुरुवातीला बदामीच्या चालुक्यांचे मांडलिक असलेल्या या घराण्याच्या विख्यात राजा दंतिदुर्ग याने ७५३च्या कालखंडात चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यात मान्यखेत (मालखेड) ही आपली राजधानी बनवली. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने स्वातंत्र्य मिळवले व पुढे जवळपास ४५ वर्षे त्याने राज्य केले. त्याने दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ हे प्रदेश आपल्या राज्याला जोडले. नंतर मालवा, कौसल, कलिंग, श्रीशैलम या प्रदेशांवर स्वार्‍या केल्या. त्याने चालुक्य कीर्तिवर्म्याचा इ.स. ७५३ मध्ये पराभव केला.
 
राष्ट्रकूट घराण्याचा राजा पहिला अमोघवर्ष हा पराक्रमी राजा होता. तो राजा झाला तेव्हा त्याचे वय अवघे १५-१६ वर्षांचे होते. त्याच्या कारकिर्दीत अनेक बंडं झाली. पूर्वचालुक्य विजयादित्यने आपली गादी परत मिळवली. गंगांनी राष्ट्रकूटांना गंगवाडीतून हाकलून लावले. अमोघवर्षचे वडील तिसरा गोविंद यांनी गुजरातेत स्थापलेल्या राष्ट्रकूट शाखेनेही स्वातंत्र्य युद्ध पुकारले. अमोघवर्षने यापैकी बहुतेकांना काबूत आणले. अमोघवर्षच्या काळात विद्येला उत्तेजन मिळाले. त्याने स्वतः लिहिलेल्या ’कविराजमार्ग’ या साहित्यशास्त्रीय ग्रंथाची कन्नड भाषेतील आद्यग्रंथात गणना केली जाते.
 
एकदा मोठ्या साथीच्या निवारणाकरिता अमोघवर्षने आपल्या हाताचे बोट कापून ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख तत्कालीन कोरीव लेखात आहे. त्याच्या दरबारी असलेल्या अनेक जैन कवींनी त्याकाळी ग्रंथ रचले. जिनसेनाचे आदिपुराण, महावीराचार्यांचे गणित सारसंग्रह याच कारकिर्दीतील आहेत.
 
राष्ट्रकूटांची प्रमुख भाषा कन्नड होती आणि त्यांनी कन्नड भाषेलाच राजाश्रय दिला होता. तत्कालीन बर्‍याचशा अभिलेखांमध्ये राष्ट्रकूटांना ’लट्टलूरपूर -वराधीश’ अर्थात लातूर या सुंदर नगरीचे स्वामी म्हटले गेले आहे. निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रांतांपैकी लातूर हे तेव्हा एक छोटेसे नगर होते. राष्ट्रकूटांचा असाही दावा होता की, ते महाभारतकालीन यदुवंशीच कृष्णाचे वंशज आहेत. राजा दंतिदुर्ग हा पराक्रमी राष्ट्रकूट राजा होता. राष्ट्रकूटांचा प्रभाव दंतिदुर्गाच्या काळातच वाढला. त्याने आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत चालुक्य साम्राज्य संपवून आपला साम्राज्यविस्तार केला. त्याने कांचीचा पल्लवराज, कलिंगराज आणि श्रीशैल या राज्यांचा राजांचा पराभव केला. त्याने उज्जैनमध्ये हिरण्यगर्भ नावाचा यज्ञ केला होता. ज्यात मालव प्रांताच्या प्रतिहार राजाने द्वारपालाची भूमिका बजावली. दंतिदुर्गाने महाराजाधिराज, परमभट्टारक, परमेश्वर यासारख्या उपाध्या धारण केल्या होत्या. अरब राष्ट्रांचे आक्रमण विङ्गल केल्यानंतर चालुक्यसम्राट विक्रमादित्याने त्याला ’पृथ्वीवल्लभ’ अशी उपाधी बहाल केली होती. दंतिदुर्गला मुलगा नसल्याने त्याच्यानंतर त्याचा काका कृष्ण प्रथम हा इ.स.७५८ मध्ये सिंहासनारूढ झाला. कृष्णा प्रथम याने दंतिदुर्गने ज्यांचा पराभव केला होता अशा चालुक्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत केले. त्याने आपला मुलगा दुसरा गोविंद याला वेंगीच्या चालुक्यांवर सैन्य घेऊन पाठविले, युद्धापूर्वीच वेंगीचा चालुक्य नरेशने आत्मसमर्पण केले. कृष्ण प्रथम याने एलोरा येथील पर्वतांमध्ये शिवमंदिराचे (कैलाशनाथ)निर्माण केले. त्याला ‘राजाधिराज’ ही उपाधी लावली जात असे.
 
इतर भारतीय राजांप्रमाणे राष्ट्रकूटांनी धर्म, विद्या व कला यांना उदार आश्रय दिला. त्यांच्या काळी बौद्धधर्माची पिछेहाट झाली असली तरी त्यांच्या साम्राज्यात एक दोन ठिकाणी बौद्धविहार असल्याचे उल्लेख आढळतात. गुजरातेतील सामंत राष्ट्रकूट शाखेच्या दंतिवर्म्याने कांपिल्य तीर्थातील विहाराला ग्रामदान केले होते. पहिला अमोघवर्ष आणि त्याचा पुत्र दुसरा कृष्ण यांनी जैन देवालयांना देणग्या दिल्या होत्या. या काळात हिंदू धर्म उर्जितावस्थेत होता. पहिल्या कृष्णाच्या काळात वेरूळ येथील जगातले एक आश्चर्य म्हणून गणले गेलेले कैलास लेणे कोरले होते. राष्ट्रकूट राजांनी अनेक महादाने करून पंचमहायज्ञांच्या अनुष्ठानाकरिता शेकडो गावे आणि हजारो सुवर्ण आणि द्रम्म नाणी दिली होती. राष्ट्रकूट सम्राटांपैकी एक चौथा गोविंद याला त्याच्या अनन्यसाधारण दातृत्वामुळे ’सुवर्णवर्ष’ हे बिरूद मिळाले होते. राष्ट्रकूट राजांनी बौद्ध, जैन, शैव, वैष्णव या सर्वांना समभावाने वागविलेच, पण त्याचबरोबर मुस्लीम धर्माच्याही बाबतीत त्यांनी उदार धोरण अवलंबिले होते. त्यांना मशिदी बांधण्यास परवानगी दिली होती व कित्येक प्रदेशांवर तर मुसलमानी प्रांताधिपती नेमले होते. यासाठी मुस्लीम लेखकांनी राष्ट्रकूटांची उघड प्रशंसाही केली आहे.
 
राष्ट्रकूटांनी विद्वानांनाही आश्रय दिला होता. पहिला अमोघवर्ष आणि दुसरा कृष्ण यांचा जैनधर्माकडे ओढा असल्याने त्यांच्या दरबारी अनेक जैन पंडित होते. अकलंकदेवाची ‘अष्टशती टीका’, जिनसेनाचा ‘हरिवंश’, ‘आदिपुराण’, शाकटायनाची ‘अमोघवृत्ती’, वीराचार्याचा गणितसारसंग्रह इ. ग्रंथ राष्ट्रकूटांच्या आश्रयाखाली रचण्यात आले.
 
त्यांच्या काळात स्थापत्त्य आणि शिल्पकलांनाही उत्तेजन मिळाले. राष्ट्रकूटांनी आपल्या राज्यात अनेक मंदिरे-वास्तू बांधल्या, मंदिरांसाठी पूजाअर्चेसाठी देणग्या दिल्या. राष्ट्रकूटकालीन मंदिरे भारतातील विविध प्रदेशांत विखुरलेली आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे राष्ट्रकूट राजे परमभक्त होते. तत्कालीन बर्‍याच मंदिरांची पडझड झाली, काहींचे केवळ अवशेष राहिले.
 
मान्यखेड, मार्कंडादेव, रामेश्वरम इ. ठिकाणची मंदिरे मात्र आजही सुस्थितीत असून वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना ठरली आहेत. मंदिरांप्रमाणेच त्यांनी कान्हेरी, घारापुरी, वेरूळ या ठिकाणीही गुंफा खोदल्या आणि तेथे सुशोभित अशा शिल्पाकृती निर्माण केल्या. राष्ट्रकूटांनी १८ शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख कोरीव लेखांतून आढळतो.
 
औरंगाबादची वेरूळची लेणी ही राष्ट्रकूट राजांची जगाला दिलेली अतुलनीय अशी देणगी आहे. येथे गुंफांचे साधारण तीन समूह आढळतात. त्यात अनुक्रमे बौद्ध, हिंदू, जैन या धर्मातील देवीदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. दक्षिणेला बौद्ध, उत्तरेला जैन लेणी असून हिंदू लेणी मध्यभागी आहेत. कैलास लेणे ही एक अद्वितीय तसेच स्तंभित करणारी अलौकिक सुंदर अशी कलाकृती आहे. वेरूळ येथील सर्वात मोठे आणि सुरेख शैलमंदिर म्हणून याचा उल्लेख होतो. हे संपूर्ण शिवमंदिर अखंड खडकातून सभोवतालच्या ओवर्‍यांसह खोदून काढलेले आत्ते. ते दोनमजली असून दोन्ही मजल्यांवर राष्ट्रकूट शैलीचे प्रचंड स्तंभ आहेत आणि दुसर्‍या मजल्याच्या द्वारापाशी भव्य द्वारपाल आहेत. यातील काही भागांवर चित्रकाम केलेले असून पूर्वी हे मंदिर अंतर्बाह्य रंगविलेले असावे. कैलासला पूर्वी ‘कृष्णेश्वर’ म्हणत असत. दंतिदुर्गाच्या वेळी याचे काम सुरू झाले आणि पहिला कृष्ण याने ते पूर्ण केले. पट्टदकल येथील विरुपाक्ष आणि कांचीपुरम येथील कैलासनाथ या दोन मंदिर वास्तूंचा आदर्श या शैलमंदिरात आढळतो.
 
राष्ट्रकूट साम्राज्याने विद्या, धर्म, कला, साहित्य यांना दिलेला उदार आश्रय आणि सर्व धर्मांनी दिलेली समान वागणूक यामुळे त्यांची कीर्ति अजरामर झाली आहे.
 
 
- रश्मी मर्चंडे 
 
@@AUTHORINFO_V1@@