पानिपताच्या अंगाराला वंदन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |
 
 
 
मागील काही दिवस आपल्या राज्यात थंडीने जोर धरला आहे. सकाळी धुक्यात हरवणारी वाट आणि थंड झोंबणारा वारा हे असे आल्हाददायक दिवस म्हणजे पर्यटनासाठी उत्तम असा काळ ओळखला जातो. त्यात थंड हवेची ठिकाणं गजबजून जातात. आपल्या राज्यात खंडाळा, महाबळेश्‍वर, माथेरान आणि उत्तरेत जम्मू-काश्मीर, शिमला व कुलू-मनाली म्हणजे पर्यटकांची हक्काची ठिकाणं! पण उत्तरेत असे एक ठिकाण आहे जिथे आपण सर्वांनी निदान एकदा तरी जाणे आपले कर्तव्य आहे. हो! मी तर तीर्थक्षेत्रच मानतो त्या भूमीला! ती माती म्हणजे मराठ्यांच्या रक्तात न्हाऊन निघालेला अंगारा आहे. तब्बल २५७ वर्षांपूर्वी दिनांक १४ जानेवारी १७६१ ला एक घमासान युद्ध सदाशिवभाऊ आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झाले. या त्यांचा स्मृतीदिनाला व त्या युद्धाच्या स्मरणदिवसाला मागच्या रविवारी नुकतीच २५७ वर्ष पूर्ण झाली. सर्वसामान्यांसाठी युद्धाचा निकाल फक्त हार आणि जीत यांतच गुंफला जातो पण जो इतिहास जाणतो आणि मनापासून अभ्यासतो त्यांच्यासाठी हार-जीत नसते तर तत्कालीन परिस्थितीत लढले जाणारे युद्ध व राजकीय विचार करता त्यातून होणारे दुरगामी परिणाम जाणून जे कागदावर उतरते ते महत्वाचे असते.
 
दिनांक १४ जानेवारी १७६१ रोजीच्या तुंबळ अशा युद्धाचे वर्णन फक्त एका ओळीत करायचे झाले तर ते म्हणजे २ मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला, याची गणती नाही. असे होते. याचा अर्थ सदाशिवभाऊ आणि विश्‍वासराव अशी मोत्यासारखी माणसे गेली तर बाकी खंदे सरदार आणि समर्थक हरवले व आपली फौज किती गेली याची गणती नाही. एकंदरीत युद्ध हरले असा शब्दप्रयोग आज झटकन करून मोकळे व्हाल परंतु तसे नसते. समोरच्या शत्रु पक्षाचेसुद्धा तितकेच नुकसान झाले, हे विसरता येणार नाही. हे युद्ध झाल्यानंतर त्या खैबरखिंडीतून एकही इस्लामी आक्रमण हिंदुस्थानावर आलेलं नाही. हे ही तितकेच खरे! आणि तेव्हापासून दिल्ली मराठ्यांच्या टापाखाली होती, हाच आपला विजय आहे. मराठेशाहीला संपवण्याचे कट जिथे शिजले तसेच हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी जिथून मोहिमा निघाल्या, इतकेच काय तर स्वतः पातशाह त्याची राजधानी म्हणजे लाल किल्ला सोडून दख्खनेत आला तोच किल्ला या युद्धानंतरसुद्धा मराठ्यांचाच मांडलिक राहिला तर असा महाराष्ट्रधर्म वाचवणार्‍या या मंडळींची स्मृती जपण्यासाठी विचारांचा हा लेखप्रपंच....
 
पानिपतची भूमी रक्तरंजित आहे. तिचा स्वभाव रक्तपिपासू होताच. हिंदुस्थानात अशी ही एकमेव भूमी आहे जिथे तीन मोठी युद्धे झाली आणि तिन्ही युद्धात स्थानिक राजसत्तांनाच मार पडला. पहिले युद्ध इ.स. १५२६ ला बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झाले त्यात लोदी हरला आणि या हिंदुस्थानात हिरवी पाळंमुळं रुजायला सुरुवात झाली. दुसरे युद्ध १५५६ ला अकबर आणि हेमूचंद्रमध्ये झाले त्यात हेमूचंद्र हरला आणि अकबर दिल्लीचा बादशहा म्हणून गादीवर आला. मोघलशाहीने तग धरला तो नेमका इथूनच! या दोन्ही युद्धात स्थानिक राजसत्तांच्या बाबतीत हार शब्द येतो कारण त्यांची सत्ता संपूर्णतः संपली. तिसरे युद्ध १७६१ ला अब्दाली आणि सदाशिवभाऊंमध्ये झाले, या युद्धात आपले खंदे लोकं धारातीर्थ पडले, हे जरी खरे असले तरीही आपण हरलो नाही कारण मराठेशाहीने महाराष्ट्रधर्म वाचवला होता. त्यानंतरसुद्धा दिल्लीची जबाबदारी मराठ्यांकडेच राहिली. ही रक्तपिपासू भूमी तिच्या स्वभावाला जागली होती आणि हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करता, तिचा स्वभाव नाकारता येणार नाही.
 
युद्धात छोटी छोटी आव्हानं असतात ती आपण पार करायची असतात. साहजिकच हार आणि जीत इथे प्रत्येक युद्धाच्या बाबतीत गुंफता येत नाही. या युद्धानंतर अब्दालीच्या हाताला काहीही लागले नाही कारण आपला खजिना हा कधीच रिता झाला होता. अफाट संख्येचे सैन्य आणि बाकी लोकांचा विचार करता, लाखोंच्या घरात ती संख्या आढळते. महाराष्ट्रातून निघताना कडाक्याचे ऊन, माळव्यात लागलेला पाऊस आणि दुथडी भरून वाहणार्‍या थंड पाण्याच्या नदीला पार करताना झालेले नुकसान पण जिद्द आणि चिवटपणापुढे ते नैसर्गिक आक्रमण तोकडे पडते. सरते शेवटी उत्तरेत हा फौजफाटा दाखल झाला तेव्हा रक्त गोठवणार्‍या थंडीने तिथे जोर धरला होता. ऊन, वारा आणि तत्कालीन परिस्थितीचा विचार केला असता सैन्यात कपड्यांची वानवाच होती तरीही कोणतीही तक्रार न करता मराठे इथे शत्रूचा बदला घ्यायला आले होते. प्रत्येकाच्या मनात ती बदल्याची आग लागली होती साहजिकच या धगधगत्या अग्निकुंडापुढे थंडी फिकी पडली. चिवटपणा काय असतो ते पानिपत वाचल्याशिवाय समजणार नाही तसेच फक्त वाचून उपयोग नाही तर आपल्याला त्या भूमीला वंदन करायला एकदा तिथे जाणे गरजेचे आहे. त्या भूमीत पराक्रम गाजवणार्‍या मंडळींच्या रक्ताचा अंश आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून मनापासून जर पाहिले तर तिथे गर्जना ऐकायला येईल व हे युद्धसुद्धा डोळ्यांसमोर तरळेल इतकी अदृश्य शक्ती तिथे जाणवते. पानिपत हरलो म्हणून संकोचलेले विचार घेऊन नाकर्तेपणाला दोष देणारे लोकं जेव्हा दिसतात तेव्हा मात्र त्यांना सांगावेसे वाटते की, पानिपत हा महासंग्राम होता आणि त्यात माझ्या महाराष्ट्राचा सहभाग होता, याचा मला मनस्वी अभिमान आहे कारण त्याची लाज वाटून मला दीड लाख मराठी देहांचे बलिदान व्यर्थ जाऊन द्यायचे नाही.
 
उत्तरेत थंड हवेच्या ठिकाणी जसे आपण पर्यटनासाठी जातो त्या वाटेतच हे पानिपत स्टेशन येते. कधी गेलात तर नक्की तिथे उतरून त्या भूमीवर जायला विसरू नका. हरियाणा सरकारने फार उत्तम अशा त्या ऐतिहासिक खुणा जपल्या असून तिथे या युद्धाचे स्मारक उभे केले आहे. तो काला आम आजही त्या आठवणीत रमला आहे. जवळच यमुनेचा तो नाला पाहता येतो जिथे भाऊंनी बांध घालून अब्दालीचे पाणी तोडले होते तसेच आजूबाजूच्या परिसरात छोट्या छोट्या समाध्या दिसतात ज्यामध्ये आपला महाराष्ट्रधर्म वाचवणारे वीर चिरनिद्रा घेत आहेत. काही हाकेच्या अंतरावर पानिपत युद्धाच्या खुणा जपणारे संग्रहालय उभे आहे. पाहताना डोळ्यांत पाणी तरळते कारण संग्रहालयात नोकरी करणारा माणूस जेव्हा सांगतो की, इथे कोणीही येत नाही. तेव्हा मनांत चर्र होतं. मराठे कशा परिस्थितीत इथपर्यंत आले आणि लढले हे तेथील वस्तू पाहताना विलक्षण वाटते. संग्रहालयात आपल्या काही तोफा आज तिथे थंड आणि निपचित पडल्या आहेत. या सर्व मुक वस्तू पाहताना वाटतं राहते की, महाराष्ट्रातून मराठ्यांच्या बरोबर त्या इथे आल्या आणि त्यांच्याच जोरावर मराठ्यांनी महाराष्ट्रधर्म वाचवला. आज एकांतवास आलेल्या आणि इतिहास याची डोळा पाहणार्‍या त्या मुक गोष्टींना तसेच भूमीला आणि मराठ्यांच्या जिद्दीला मनोमन वंदन करावेसे वाटते. जवळच सदाशिवभाऊंच्या नावाने त्याकाळी वसलेले भाऊपुर असून तिथे एक मठ आहे त्यात आजही १४ जानेवारीला स्मृतीदिनानिमित्त आठवणी जपल्या जातात. पराक्रमी भाऊंच्या नावाचे पोवाडे घरोघरी गायले जातात. तर असे हे महाराष्ट्रधर्म वाचवणार्‍या मराठ्यांचे ऐतिहासिक ठिकाण आपण सर्वांनी पाहावे म्हणून हा लेखप्रपंच !
 
 
- सागर मधुकर सुर्वे (7718891448)
 
@@AUTHORINFO_V1@@